रामाळा तलावाच्या संरक्षण भिंतीच्या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी, काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना (MLA Kishore Jorgewar inspects the protective wall work of Ramala Lake, instructs to complete the work with quality and on time)

Vidyanshnewslive
By -
0
रामाळा तलावाच्या संरक्षण भिंतीच्या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी, काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना (MLA Kishore Jorgewar inspects the protective wall work of Ramala Lake, instructs to complete the work with quality and on time)


चंद्रपूर : चंद्रपूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या रामाळा तलावाच्या संरक्षणासाठी 30 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या संरक्षण भिंत बांधकामाची आमदार किशोर जोरगेवार यांनी काल रविवारी पाहणी केली. या पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. या कामामुळे तलावाचे जतन, सौंदर्यीकरण आणि परिसरातील सार्वजनिक सुरक्षिततेची खात्री होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी चंद्रपूर महानगरपालिकेचे अभियंता शिडाम यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक देवानंद वाढई, प्रदीप किरमे, प्रशांत चौधरी, शिवसेना शहरप्रमुख बंडू हजारे, रामाळा तलाव बचाव संवर्धन संघर्ष समितीचे जुगल सोमानी, सुधीर बजाज, विनोद सोन, राशिद हुसेन, नकुल वासमवार, संजय बोरघाटे, कार्तिक बोरेवार, आदी उपस्थित होते. रामाळा तलाव हा शहराच्या मध्यवर्ती भागात असून, शतकानुशतकं पासून नागरिकांच्या जीवनशैलीशी निगडित आहे. तलावाच्या नैसर्गिक आणि ऐतिहासिक हत्त्वामुळे त्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने शासनाच्या 30 कोटी रुपयांच्या निधीतून संरक्षण भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांना कामाच्या दर्जावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. हे काम दर्जेदार, मजबूत आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या भावना या तलावाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे या कामात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. भिंतीच्या बांधकामामुळे तलावाच्या किनाऱ्यांचे संरक्षण होईल आणि तलावात गाळ जाण्याचे प्रमाण कमी होईल. परिणामी, तलावाचे पाणी शुद्ध राहील आणि परिसरातील जैवविविधतेलाही चालना मिळणार आहे. तलावाच्या संरक्षणाच्या या प्रकल्पामुळे केवळ चंद्रपूरच्या ऐतिहासिक ओळखीचेच नव्हे, तर जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी मोठी मदत होईल. रामाळा तलाव हे चंद्रपूरचे भूषण आहे. या तलावाचे जतन करण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी अधिकारी आणि अभियंते सातत्याने प्रयत्नशील आहेत. नागरिकांची अपेक्षा आणि तलावाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)