चंद्रपूर :- चंद्रपूर वनवृत्त अंतर्गत वने आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धन प्रभावीपणे होण्यासाठी तसेच मानव - वन्यजीव संघर्षाच्या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर लगेच घटनास्थळी पोहचण्यास लागणारा प्रतिसाद वेळ कमी करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर येथे सुसज्ज वन नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाचे तसेच सायबर सेलचे उद्घाटन राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार देवराव भोंगळे, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक प्रभुनाथ शुक्ला, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, आनंद रेड्डी, श्वेता बोड्डू आदी उपस्थित होते. वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, पोलिस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर वन विभागाने वन नियंत्रण कक्ष तयार केला आहे. वनांशी संबंधित जिल्ह्यात घडणा-या घटना, वाघांचे व बिबट्यांचे हल्ले, आगी लागण्याचे प्रमाण आदी माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा ॲक्टीव्ह करण्याचे काम येथून केले जाईल. चंद्रपूरचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतरही संवेदनशील भागात व प्रत्येक सर्कलमध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी वनमंत्र्यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. वन नियंत्रण कक्षाची माहिती सदर नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक (१८००३०३३) हा आहे. या कक्षातून चंद्रपूर वनवृत्तातील विभागाविषयी माहिती, विभागातील कामकाजाविषयी माहिती मिळण्यास मदत होते. तसेच काही तक्रार असल्यास त्याचे निराकरण या कक्षाच्या माध्यमातून केले जाईल. या कक्षाच्या माध्यमातून चंद्रपूर वनवृत्त व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मधील सर्व वन कर्मचाऱ्यांचे तसेच शासकिय वाहनांचे रिअल टाईम लोकेशन मिळण्यास मदत होते. जेणेकरून कुठे घटना घडल्यास जवळपास असलेल्या कर्मचाऱ्यांचे लोकेशन बघून घटनास्थळी लवकर पोहचता येईल. वन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून येथे 24 तास कमर्चारी उपस्थित आहेत. सदर कक्षामार्फत वन कमर्चाऱ्यांकरीता फॉरेस्ट कंट्रोल नावाचे ॲन्ड्राईड ॲप तयार करण्यात आले आहे. सदर एप्लीकेशन हाताळण्याबाबत वनरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकारी पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाला एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यास सदर घटनेची माहिती तात्काळ संबंधित वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना ॲपच्या माध्यमातून लगेच प्राप्त होते. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे वनरक्षकास तात्काळ घटनास्थळी पोहचून कार्यवाही करण्यात मदत मिळते. कार्यवाही पूर्ण झाल्यावर ॲपच्या टिकिटमध्ये घटनेविषयी संपूर्ण माहिती भरली जाते. तसेच सदर माहिती कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित भरली किंवा नाही याची खात्री संबंधित वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी करून नंतर टिकिट बंद केल्या जाते. वन नियंत्रण कक्षाद्यारे शासकीय वाहनांमध्ये सुद्धा कन्सोल स्क्रीन बसविण्याचे काम करण्यात आले आहे. या स्क्रीनमध्ये फॉरेस्ट कंट्रोल ॲपचे लॉगिन करण्यात आले आहे. यामुळे अधिकारी दौऱ्यावर असल्यास त्यांच्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या घटनांची माहिती शासकीय वाहनात मिळण्यास मदत होते. तसेच एखाद्या ठिकाणी मोठी घटना घडल्यास सदर घटनास्थळाच्या जवळपास असणाऱ्या वाहनास नियंत्रण कक्षाद्यारे माहिती देऊन लवकरात लवकर घटनास्थळावर पोहचता येईल.
गत महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात अनेक जणांचे जीव गेले आहेत, ही अतिशय दु:खद घटना असून शासनस्तरावरून याची दखल घेण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम अधिक प्रभावशाली करणार असल्याची ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वन अकादमी येथे वनक्षेत्रातील महिलांची राष्ट्रीय परिषद ‘वनशक्ती – 2025’ चे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री देवराव भोंगळे, किशोर जोरगेवार, करण देवतळे, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता विश्वास, तेलंगणाच्या वनबल प्रमुख श्रीमती सुवर्णा, भारतीय वनीकरण संशोधन संस्थेच्या महासंचालक कंचनदेवी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते. मानव - वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम अधिक प्रभावशाली करू, असे सांगून वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सोबतच वन्यजीवांपासून शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कुंपण व सोलर कुंपनाचा लाभ देण्यात येईल. वनविभाग हा एक महत्त्वाचा विभाग असून जंगलात मजबूत गाड्यांची आवश्यकता आहे. अशा गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच वनपाल, वनरक्षक, आरएफओ यांच्या स्तरावरील कर्मचा-यांना स्वरक्षणासाठी हत्यारे देण्यात येतील. वनविभाग हा एक परिवार आहे. या परिवारांमध्ये सर्वांची काळजी घेण्याची वनमंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात वनविभाग अग्रेसर राहील. तसेच पुढील वन विभागाच्या भरतीमध्ये 50 टक्के भरती महिलांची करण्यात येईल. सध्या जिल्हास्तरावर मानद वन्यजीव रक्षक कार्यरत आहे. हे पद प्रत्येक तालुक्यात नेमण्यात येईल. तसेच महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगले प्रकल्प वनविभागात राबविण्यात येणार आहे. वन विभागाने तीन-चार अधिकाऱ्यांची टीम तयार करावी व वनांशी संबंधित अभ्यास करण्यासाठी त्यांना विदेशात पाठवावे. चंद्रपूरच्या योगदानातून वनांचे चांगले संरक्षण होत आहे. भद्रावती तालुक्यातील खुटवंडा प्रवेश गेट अतिशय चांगले करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यशाळेतून एक नवीन आत्मविश्वास मिळेल : वनविभागात कार्यरत असलेल्या महिलांची राष्ट्रीय परिषद चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यासाठी सुमिता विश्वास यांनी एक चांगला पुढाकार घेतला आहे. राज्यात पहिल्या प्रमुख तीन पदांवर महिला विराजमान आहेत. यात राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व वनबल प्रमुख यांचा समावेश असून मंत्रालयात मोठ्या प्रमाणात महिला सचिव आहेत. चंद्रपूर येथे होणाऱ्या दोन दिवसीय कार्यशाळेतून एक नवीन आत्मविश्वास जागृत होण्यास मदत होईल.
वनांवर आधारीत उद्योग यावेत आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर जिल्ह्यात महिलांची राष्ट्रीय परिषद होत आहे, ही अभिमानची गोष्ट आहे. या दोन दिवसात कार्यशाळेत चांगले मंथन होईल. ज्या कामात महिलांचा सहभाग असतो ते काम उत्कृष्टच असते. वनांचे संवर्धन व्हायला पाहिजे, मात्र मानव वन्यजीव संघर्ष हा मोठा प्रश्न आहे. पोलीस पाटील पदाच्या धर्तीवर वनपाटील आणि वनपाटलीन अशी नियुक्ती करावी. वनांवर आधारित उद्योग जिल्ह्यात यावे. त्यातून येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. महिला हे शक्तीचे रूप : आमदार देवराव भोंगळे महिलांच्या या कार्यशाळेला वनशक्ती असे नाव देण्यात आले आहे. ख-या अर्थाने महिला म्हणजे शक्तीचे रुप आहे, असे आमदार देवराव भोंगळे म्हणाले. आज प्रत्येकच क्षेत्रात महिलांनी आपले अस्तित्व निर्माण केले आहे. पर्यावरणाला पुढे नेण्यासाठी महिलांनी काय करावे, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मानव वन्यजीव हा प्रश्न अतिशय गंभीर असून पर्यावरणाचा ऱ्हास ही सुद्धा समस्या आहे. तसेच वन्यजीवांकडून शेतमालाचे होणारे नुकसान याबाबत वनविभागाने चांगल्या उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले. महिलांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा आमदार करण देवतळे आपल्या विधानसभा क्षेत्रात येणारे खुटवंडा सफारी गेट अतिशय प्राचीन आहे. त्याचे सुशोभीकरण करून येथे सफारींची संख्या वाढविण्यात यावी. वनविभागात मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत आहे. महिलांना प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्व महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार करण देवतळे यांनी केले, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले, आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती झाली आहे. वनविभागात काम करणे हे एक मोठे आव्हान आहे. कारण विस्तीर्ण भूप्रदेश, वन्यजीव यांचा मोठा धोका असतो. वनविभागाची नोकरी ही दुर्मिळ क्षेत्रातील नोकरी आहे. महिलांना एक संधी देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वागतपर भाषण वनबल प्रमुख शोमिता विश्वास यांनी केले. तर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुवर्णा आणि कांचन देवी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्रेया खाडीलकर यांनी तर आभार चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी मानले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या