जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान केंद्रांचा शोध घेऊन कारवाई करा - जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे निर्देश (Search for illegal fetal sex determination centers in the district and take action - District Collector Vinay Gowda's instructions)

Vidyanshnewslive
By -
0
जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान केंद्रांचा शोध घेऊन कारवाई करा - जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे निर्देश (Search for illegal fetal sex determination centers in the district and take action - District Collector Vinay Gowda's instructions)


चंद्रपूर :- गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे, गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे. जिल्ह्यात असे अवैध गर्भलिंग निदान केंद्र असतील तर ते शोधून काढावे तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्टींग ऑपरेशनची संख्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी संदर्भात आढावा वैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे आदी उपस्थित होते. दर तीन महिन्यांनी नियमितपणे सर्व सोनोग्राफी केंद्राची तपासणी करावी, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व कागदपत्रे, अहवाल, दैनंदिन नोंदवही अतिशय गांभीर्याने तपासावेत. यात कुठेही निष्काळजीपणा होऊ देऊ नका. तसेच अवैध रित्या चालणारे केंद्र शोधून काढण्यासाठी स्टींग ऑपरेशनची संख्या वाढविणे आवश्यक आहे. यासाठी पोलिस विभाग किंवा इतर शासकीय कर्मचा-यांचे सहकार्य घ्यावे. 12 आठवड्यांच्या वर गर्भपात होत असलेल्या केंद्राला आवर्जुन भेट देऊन तपासणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. खबऱ्यासाठी तसेच स्टींग ऑपरेशन करीता बक्षीस योजना : गर्भलिंग निदान चाचणी करणा-या व्यक्तिची माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. तसेच त्याने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने खातरजमा करून संबंधित व्यक्ती / सोनोग्राफी केंद्रावर खटला दाखल झाल्यावर माहिती देणा-या व्यक्तिस राज्य शासनातर्फे 1 लक्ष रुपये व चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे 25 हजार असे एकूण 1 लक्ष 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच स्टींग ऑपरेशनसाठी सहभागी होणा-या गर्भवती महिलेस न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर शासनातर्फे 1 लक्ष रुपये आणि चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. नागरिकांना आवाहन जन्मापुर्वी मुलगा किंवा मुलगी आहे, हे जाणून घेणे कायद्याने गुन्हा आहे. असा गुन्हा करणा-या सोनोग्राफी केंद्राची माहिती टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 18002334475 वर, टोल फ्री क्रमांक 104, www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर, मनपा टोल फ्री क्रमांक 18002574010, व्हॉट्सॲप क्रमांक 8530006063 किंवा https://grievance.cmcchandrapur.com/complaint_registration/add या तक्रार निवारण ॲपवरही करता येऊ शकते

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)