अधिवेशात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली मागणी, खाजगी कोळसा खाणींमुळे वाढलेल्या कोळसा माफियांवर निर्बंध लावा (Speaking at the meeting, MLA Kishore Jorgewar demanded that restrictions be placed on the coal mafia that has grown due to private coal mines.)

Vidyanshnewslive
By -
0
अधिवेशात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली मागणी, खाजगी कोळसा खाणींमुळे वाढलेल्या कोळसा माफियांवर निर्बंध लावा (Speaking at the meeting, MLA Kishore Jorgewar demanded that restrictions be placed on the coal mafia that has grown due to private coal mines.)
मुंबई/चंद्रपूर :- शासनाने कर्नाटक एम्टा, अरविंदो यांसारख्या काही खाजगी कोळसा खाणींना परवाने दिले आहेत. या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून, येथील कोळसा खुल्या बाजारात विकला जात असल्याने कोळसा माफिया सक्रिय झाला आहे. परिणामी, असामाजिक कृत्ये घडत असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या परिस्थितीवर निर्बंध लावण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणींचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. मात्र, त्याचे दुष्परिणामही आता समोर येत आहेत. या खाणींमुळे प्रदूषण, जनजीवनावरील परिणाम आणि गुन्हेगारीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. कोळसा खाणींच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आणि शेती व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. याबाबत अनेक तक्रारी आ. किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी लक्षात घेऊन, त्यांनी यापूर्वीच वेकोलिच्या सीएमडी यांची भेट घेऊन हा विषय उपस्थित केला होता. मात्र, ठोस कार्यवाही न झाल्यामुळे, त्यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा हा मुद्दा सभागृहात मांडला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना आ. किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर कोळसा खाणींमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. वेकोलीच्या वतीने अधिग्रहीत केलेल्या जमिनींचा मोबदला अद्याप दिला गेलेला नाही. तसेच, उर्वरित जमिनींची खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वेकोली प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांचे पांदण रस्ते अडवले जात आहेत, याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आणि यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली. बंराज कोळसा खाणीने वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून तिथून कोळशाचे उत्खनन सुरू केले आहे. या प्रकाराची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी अधिवेशनात केली. तसेच, अरविंद खाणीस विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी आणि स्थानिक जनतेच्या मागण्या ऐकून घेत ठोस निर्णय घ्यावा, अशीही त्यांनी अधिवेशनात जोरदार मागणी केली आहे .खाजगी कोळसा खाणींमुळे कोळसा माफिया सक्रिय झाला असून, अनेक ठिकाणी अवैध व्यवहार होत आहेत. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत आणि कोळसा खाणींवर निर्बंध लागू करावे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)