अस्पृश्याना समानतेची दारे मोकळी करून देणारा महाडचा सत्याग्रह, 'हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाही, तर मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे (Mahad's Satyagraha opens doors for equality for untouchables, 'This struggle is not just for water, but for basic human rights')
वृत्तसेवा :- 'हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाही, तर मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे', अशा क्रांतिकारी विचाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे पाणी पेटवले, तो सत्याग्रह म्हणजे महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह. भारतामध्ये जातिव्यवस्था त्या काळी उच्च आणि नीच अशी विभागली होती. निसर्गाचे अनमोल देणगी असलेले पाणीही अस्पृश्यांना मिळणे कठीण होते. सार्वजनिक पाणवठ्याच्या ठिकाणी अस्पृश्यांना पाणी देणे नाकारले जायचे. त्यांचा केवळ एकच दोष, की ते एका विशिष्ट जातीत जन्मले होते. ही जातिव्यवस्था भारतीय एकोप्याला खीळ घालणारी होती. याविरोधात सामाजिक न्याय प्रस्थापित करणे गरजेचे होते, हे लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरू केला आणि त्याला यश आले. ऑगस्ट १९२३ मध्ये सरकारी, सार्वजनिक, स्थानिक तळी सर्वांसाठी खुली करण्यात यावी असा ठराव मुंबई कायदेमंडळाने केला. महाड नगरपालिकेनेही जानेवारी १९२४ ला तसा ठराव केला आणि सार्वजनिक तळी सर्वांसाठी खुली केली, परंतु रूढी-परंपरांमध्ये अडकलेल्या समाजाने ठरावाचे पालन केले नाही. डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडला बहिष्कृत हितकारणीची परिषदही झाली. या परिषदेत सवर्ण वर्गातील सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे इत्यादी मंडळींही सहभागी होती. सभेला मोठा जनसमुदाय जमला होता. सभा मंडपातून डॉ. बाबासाहेब बाहेर पडले. महाड बाजारपेठेतून तळ्याकडे मिरवणूक निघाली आणि २० मार्च १९२७ ला चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क बजावून बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचे जोखड तोडले.
चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे अस्पृश्यांना समतेची द्वारे खुली झाली आणि जगभर सामाजिक न्यायाचा संदेश पोहोचला. २० मार्च १९२७ ला घडलेल्या या सत्याग्रहातून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्कही मिळाला. येत्या २० मार्चला सत्याग्रहाला ९८ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न. चवदार तळे पूर्वी खूप मोठे होते. संपूर्ण शहराची पाण्याची गरज तळे भागवायचे. १९८९ ला तळ्याचे सुशोभीकरण झाले. तळ्याभोवती पथदिव्यांची सोय, रोषणाई करण्यात आली. सभागृह व दोन्ही बाजूला उद्यान साकारण्यात आले. तळ्याच्या मध्यभागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १० फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. रस्ते व सुशोभीकरणासाठी तळ्याचा पूर्वीचा काही भाग बुजवला गेला. सध्या तळे अडीच एकरमध्ये असून, १३६ मीटर लांब आणि ९७ मीटर रुंद; तर साडेपाच मीटर खोल आहे. रात्री संपूर्ण तळे विजेच्या प्रकाशात झगमगून निघते. शहराच्या मध्यवर्ती असलेले हे क्रांतिस्थळ आजही दिमाखात उभे आहे. चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिनी देशभरातून हजारो अनुयायी या ठिकाणी भेट देतात. विविध संघटनांकडून अभिवादन सभा घेतल्या जातात. चवदार तळे सत्याग्रहानंतर डॉ. आंबेडकर यांना न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागले होते. चवदार तळे सार्वजनिक नाही तर खासगी आहे, असा दावा करत हा खटला दाखल केला होता, परंतु डॉ. आंबेडकर न्यायालयीन लढाईही जिंकले आणि हा सत्याग्रह इतिहासात अजरामर झाला. सत्याग्रहाच्या प्रसंगी डॉ. बाबासाहेब म्हणाले होते, 'चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपर्यंत चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो, तरी आपण काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जायचे ते केवळ पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत, हे सिद्ध करण्याकरिताच आपल्याला तळ्यावर जायचे आहे.' चवदार तळे सत्याग्रह वर्धापनदिनाच्या दिवशी तळ्याच्या पायऱ्यांवर पाणी प्राशन करणाऱ्या प्रत्येक अनुयायांचा ऊर आजही या वाक्याने भरून आल्याशिवाय राहत नाही.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या