मनपात बैठक, टँकर खरेदीसाठी ५० लाखांचा निधीची घोषणा, उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करा – आ. किशोर जोरगेवार (Municipality meeting, announcement of Rs 50 lakh fund for purchase of tankers, make effective planning to avoid water shortage in summer – Aa. Kishore Jorgewar)
चंद्रपूर :- उन्हाळा जवळ येत असताना शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी तातडीने नियोजन करून तात्पुरत्या पाण्याच्या टाक्यांमध्ये वाढ करावी, तसेच शहरातील गळती असलेल्या पाईपलाइन आणि टाक्यांच्या दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले आहे. मनपात झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेताना आ. जोरगेवार यांनी नवीन टँकर खरेदीसाठी ५० लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गरज पडल्यास आणखी निधी मंजूर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शहरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता विजय बोरिकर यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की, प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कोणतीही कमी ठेवू नये, उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या टाळण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येऊन जबाबदारीने वागावे, असेही ते म्हणाले. रमाई योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना या सर्व घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने पुन्हा एकदा शहर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेण्याचे निर्देशही आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.
शहरात सांडपाणी वाहिन्यांसाठी पुन्हा रस्ते खोदले जात आहेत. त्यामुळे काम पूर्ण होताच खोदलेल्या रस्त्यांची त्वरित डागडुजी करण्यात यावी. कचरा संकलनाच्या बाबतीत नव्याने धोरण तयार करून दररोज कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात यावे. बाबूपेठ येथे कबड्डी मैदान तयार करण्याची सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या आहे. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तयार करा शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महिलांसाठी विशेष स्वच्छतागृह तयार करण्यात यावीत, यासाठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून देऊ, असेही या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या