गोंडपिपरी येथे कार व दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी (Two killed and 2 seriously injured in an accident involving a car and a two-wheeler in Gondpipari)
चंद्रपूर :- गोंडपिपरी तालुक्यातील घडोली वेथील सुधीर चौधरी आपल्या कुटुंबासह धाबा येथे सुरू असलेल्या कोंडय्या महाराज यात्रेसाठी जात असताना सोमनपल्ली गावाजवळ कार व दुचाकीच्या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांचा करुण अंत झाला. तर दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही घटना १ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. धिरज सुधीर चौधरी (५) व विरज चौधरी (२) अशी मृतक चिमुकल्यांची नावे असून, सुधीर चौधरी (३४) व शिवानी सुधीर चौधरी (३०) गंभीर जखमी आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील घडोली येथील सुधीर चौधरी आपल्या कुटुंबासह धाबा येथील कोंडय्या महाराज यात्रेत सहभागी होण्यासाठी जात होते. दरम्यान, सोमनपल्ली गावाजवळ रस्त्यावर कार ने दुचाकीला धडक दिली. त्यात भीषण अपघात झाल्याने सुधीर चौधरी, शिवानी सुधीर चौधरी, मुलगा धिरज दुसरा मुलगा विरज गंभीर जखमी झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जखमींना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आले. दरम्यान, वाटेतच विरजने दम सोडला. १ फेब्रुवारीला त्याच्यावर घडोली येथे अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर दवाखान्यात उपचार घेत असलेल्या धिरजचा मृत्यू झाला. दुसऱ्या मुलावरही रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी दोन्ही मुलांचा अपघातात मृत्यू झाल्याने मातापित्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पती-पत्नी दोघेही गंभीर असून चंद्रपूर येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. या अपघाताचा पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या