राज्याचे निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची नियुक्ती (Appointment of Dinesh Waghmare as State Election Commissioner)
मुंबई :- दिनेश वाघमारे यांची राज्य सरकारने राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. यू. पी. एस. मदान यांच्या सप्टेंबरमधील निवृत्तीपासून हे पद रिक्त होते. निवडणूक आयुक्तपदासाठी माजी मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह राजगोपाल देवरा, राजीव जलोटा, दिनेश वाघमारे यांच्या नावाची चर्चा होती. राज्य मंत्रिपरिषदेच्या गेल्या गुरुवारी झालेल्या बैठकीत या पदासाठी प्रमुख दावेदारांपैकी कोणाची निवड करायची याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले होते. मुख्यमंत्री यांच्या शिफारसीनंतर राज्यपालांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली असून, या संदर्भातील आदेश राज्य सरकारने जाहीर केला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे असते. आगामी एप्रिलमध्ये राज्यातील हजारो स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आयोगाची भूमिका महत्त्वाची असेल. दिनेश वाघमारे यांचा आयुक्त पदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. एमएससी, एम.टेक पर्यंत शिक्षण झालेले वाघमारे हे १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव म्हणून ते निवृत्त झाले. त्या आधी त्यांनी गृह विभाग, सामाजिक न्याय, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिले. राज्य वीज पारेषण कंपनीचे ते अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होते. पिंपरी चिंचवड, नवी मुंबईचे महापालिका आयुक्त आदी विविध पदांवर त्यांनी काम पाहिले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या