...आणि भीमा कोरेगावचा जयस्तंभ शिवराम कांबळेंनी जगासमोर आणला ! जाणून घ्या भिमा कोरेगाव चा इतिहास (...and the Jaistambh of Bhima Koregaon was brought to the world by Shivram Kamble! Know the history of Bhima Koregaon)

Vidyanshnewslive
By -
0
...आणि भीमा कोरेगावचा जयस्तंभ शिवराम कांबळेंनी जगासमोर आणला ! जाणून घ्या भिमा कोरेगाव चा इतिहास (...and the Jaistambh of Bhima Koregaon was brought to the world by Shivram Kamble! Know the history of Bhima Koregaon)


वृत्तसेवा :- कोणत्याही महापुरुषाचे राजकारण हे त्या काळाचे अपत्य असते. त्या महापुरुषाला समजून घ्यायचे असेल तर त्याकाळचे समकालीन राजकारण समजून घेतले पाहिजे. 1900 ते 1920 या काळामध्ये पुण्यात ब्राम्हण -अब्राम्हण संघर्ष प्रचंड टीकेला पोहोचला होता. याब्राम्हण -अब्राम्हण संघर्षात अस्पृश्यांचे प्रश्न कुठेच दिसत नव्हते. सावित्रीबाई फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ पूर्णपणे ढासळली होती. "मूकनायक'ची सुरुवात करताना डॉ. आंबेडकर म्हणतात, येथे केवळ ब्राम्हण- ब्राम्हणेतर वाद नाही तर तिसराही एलिमेंट आहे आणि त्या तिसऱ्या एलिमेंटची सुरवात खऱ्या अर्थाने शिवराम कांबळे यांनी सुरू केली होती! पुण्याच्या रे मार्केट समोरील मैदानात मद्यपान निषेधासंबंधी एक जंगी जाहीर सभा भरली होती. लोकमान्य टिळक आणि खाडिलकर वगैरे प्रमुख मंडळी त्या सभेचे प्रमुख मार्गदशक होते. समोर बसलेल्या जमावातून एक चिट्ठी स्टेजवर आली. "मला सभेत बोलण्याची परवानगी द्याल का? अशी विचारणा करून त्या चिठ्ठीत खाली एक नाव लिहिले होते. ते नाव वाचून टिळकांनी त्या मुलाला स्टेजवर बोलावून बोलण्याची संधी दिली होती. पेशव्यांच्या राजधानीत सभोवार हजारो ब्राह्मणांचा समाज असताना त्यामध्ये घुसून त्यांच्यापैकी जे परममान्य नेतृत्त्व होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची व भूमिका मांडण्याची हिंमत दाखवणारी ती व्यक्ती होती "शिवराम जानबा कांबळे'... परंतु या स्मारकाचा इतिहास आणि त्याचा दलितांच्या शौर्याशी..आत्मसन्मानाशी काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी अगोदर शिवराम जाणबा कांबळे जाणून घ्यावा लागेल… प्रतिकाचा दलित मुक्तीशी असलेला संबध या बाबतची पहिली भूमिका ही शिवराम जाणबा कांबळे यांनीच मांडली होती!

 
         महात्मा फुले यांच्यानंतर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगोदर दलितांच्या बाबतीत काय घडते होते हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी परशुराम कांबळे हा एक महत्त्वाचा सेतू आहे. फुलेंनंतरच्या सत्यशोधकांनी दलितांच्या प्रश्नाला सोडून दिले होते.त्या काळात शाळा काढणे,अस्पृश्यांसाठी हॉस्टेल चालवणे, ग्रंथालय काढणे, वर्तमानपत्र चालवणे, देवदासी मुरळी प्रथेविरुद्ध लढा उभारणे, अस्पृश्य अत्याचाराच्या बाबतीत चळवळ उभी करणे हे महात्मा फुले यांचे काम शिवराम कांबळे पुढे घेऊन जात होते. "गणपती मेळे विरुद्ध शिवाजी मेळे' आणि "महात्मा फुलेंचा पुतळा विरुद्ध मस्तानीचा पुतळा' असे सांस्कृतिक प्रतिकात्मक राजकारण सुरू असण्याच्या त्या काळात शिवराम कांबळे संस्थात्मक काम करत होते. 1902 साली लॉर्ड किचेनेर हे ब्रिटिश सैन्याचे "कमांडर इन-चीफ इंडिया' म्हणून भारतात कार्यरत होते. त्यांनी येथील सैन्याची नवीन रचना केली आणि त्यात अस्पृश्य समाजाला लष्कराच्या भरती मधून वगळले. या निर्णयाविरुद्ध शिवराम कांबळे यांनी सासवड येथे 24 नोव्हेंबर 1902 साली 51 गावाच्या महार जातींची सभा भरवली आणि अस्पृश्यांच्या हितासाठी सरकारने काय कार्य करावे, या बद्धलची ठोस मागणी करणारा अर्ज तयार केला, त्यावर 1588 महारांच्या सह्या घेऊन तो अर्ज भारत सरकार कडे पाठवला. शिवाय या अर्जाच्या प्रति त्यांनी इंग्लड आणि भारतातील अनेक प्रमुख लोकांकडे आणि वर्तमानपत्राकडे पाठवल्या. अस्पृश्य समूहातर्फे सरकारला गेलेला हाच पहिला अर्ज होता. परंतु सरकारने या अर्जाला सकारत्मक प्रतिसाद दिला नाही. 1910 साली पुण्यातील अस्पृश्य मानलेल्या शाळेच्या बक्षिस समारंभाच्या प्रसंगी शिवराम कांबळे यांनी मुंबई सरकारचे माजी कौन्सिलर सर रिचर्ड ल्याब यांना आमंत्रित केले होते. सर रिचर्ड ल्याबने आपल्या भाषणात सरकारने महारांची सैन्यासारख्या प्रतिष्ठित मार्गातून हकालपट्टी केली याबद्धल खेद प्रदर्शित केला. याप्रसंगी महारांच्या शौर्याची प्रशंसा करताना ते म्हणाले, "भीमा नदीकाठच्या कोरेगाव जवळच्या जयस्तंभाजवळ मी दरवर्षी पावसाळ्यात जात असतो; त्यावरील शिलालेख वाचत असतो; टीप करून ठेवत असतो. यावरून मला असे कळून आले आहे की अनेक महार सैनिकांनी इंग्रज फौजेच्या आणि स्पृश्य लोकांच्या खांद्याला खांदा भिडवून मोठ्या शौर्याने लढून आणि जखमी होऊन आपले प्राण धारातीर्थी अर्पण करून इंग्रजांना पेशवाई मिळवून दिली. मात्र तरीही या शूर सैनिकांना एका प्रतिष्ठित मार्गाने नावलौकिक मिळवण्याचे द्वार बंद केले गेले याचे मला दुःख वाटत आहे.' 

 
           सर रिचर्ड ल्याबच्या भाषणातील "भीमा कोरेगाव' च्या उल्लेखानंतर शिवराम जाणबा कांबळे कोरेगाव स्तंभाच्या ठिकाणी जाऊन आले आणि पुढे आपल्या नंतरच्या आयुष्यात भीमा कोरेगाव स्मारकाचा सातत्याने गौरवाने उल्लेख करत राहिले. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर सैन्यदलात महार जातीला सामावून घेण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला. परंतु महारांचा हा आनंद अल्पजीवी ठरला. युद्ध संपल्यानंतर लगेच त्यांची सैन्यातील भरती थांबवण्यात आली. सैन्यातील अस्पृश्यांच्या शौर्याची दाखल घेतली जावी या साठी नव्याने मोहीम सुरू झाली. 1920 च्या नागपूरच्या अस्पृश्य परिषदेमधील भाषणात शिवराम कांबळे म्हणतात, "जातीभेदाचे थोतांड माजवून ब्राम्हण समाजाने आमच्या उन्नतीच्या मार्गात काटे पेरले आहेत. आमच्या ज्या पूर्वजांनी कोरेगावच्या लढाईत इंग्रज सरकारला जय मिळवून दिला त्यांच्याच वंशजांना सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून बाहेर काढा असे म्हटल्यावर सरकार आमच्या जातीभेदाकडे व धर्माकडे बोट दाखवून आम्ही त्यात हात घालत नाही असे म्हणते; परंतु त्याच जातीभेदाला कोल्हापूरचे छत्रपती धैर्याने हाकून आमच्या राज्यांत आम्हा अस्पृश्य वर्गाला समतेने वागवत आहेत त्याबद्धल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत.' कोरेगाव लढाईच्या वर्धापनदिनी 1 जानेवारी 1927 साली उपस्थित अस्पृश्यांच्या गर्दीला संबोधित करण्यासाठी शिवराम कांबळे यांनी डॉ.आंबेडकर यांना आमंत्रित केले आणि भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन करून आपल्या गौरवशाली इतिहासाचा स्मृतिदिन साजरा केला. हा स्मृतिदिन दरवर्षी विशेष थाटाने साजरा करण्याचे ही ठरविले आणि त्यानंतरच भीमा कोरेगाव दलितांच्या अस्मितेचे प्रतीक बनत गेले. अस्पृश्य समाजात स्वाभिमान ,आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करण्यासाठी या प्रतिकाचा शिवराम कांबळे यांनी सकारात्मक उपयोग केला. संघटित दलित राजकारणाची सुरुवात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून गृहीत धरतो. या संघटित राजकारणाची सुरुवात डॉ.आंबेडकर यांच्या प्रवेशाने झाली असली तरी ते राजकारण उभे करण्याची सुरुवात आणि ते लोकांत रुजवण्याची प्रक्रीया शिवराम कांबळे यांनी सुरू केली होती आणि त्यासाठी त्यांनी भीमा कोरेगाव जय स्तंभाचा सकारत्मक उपयोग करून घेतला. शिवराम कांबळे यांचे चरित्र 1908 साली मुंबईतील "जगतवृत' या पत्रात सचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यांचे विस्तारित चरित्र जेंव्हा ह.ना.नवलकर यांनी लिहण्यास घेतले तेंव्हा कांबळे नम्रपणे म्हणाले,"'मी अशी कोणतीही मोठी कामगिरी केलेली नाही की मी माझे चरित्र व्हावे. मी एक साधारण मनुष्य आहे. माझ्या जातबांधवांवर हजारो वर्षापासून अन्याय,जुलूम आणि छळ होतोय त्यातून त्यांची मुक्तता करण्याचा प्रयत्न करणे हेच माझे कर्तव्य आहे. यात मी विशेष काहीच केले नाही. मला माझ्या नावाचा गवगवा करणे आवडत नाही आणि प्रशस्तही दिसत नाही.''


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)