अन्याय, अस्पृश्यतेविरुद्ध महारांनी पुकारलेले पहिले बंड म्हणजे भीमा कोरेगाव (Bhima Koregaon was the first revolt called by the Mahars against injustice and untouchability)

Vidyanshnewslive
By -
0
अन्याय, अस्पृश्यतेविरुद्ध महारांनी पुकारलेले पहिले बंड म्हणजे भीमा कोरेगाव (Bhima Koregaon was the first revolt called by the Mahars against injustice and untouchability)


वृत्तसेवा :- मराठेशाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर शूद्रांच्या गुणवत्तेस अत्यंत अल्प मूल्य व वाव होता. या कालखंडातील सर्व राज्यकर्त्यांनी महारादी सर्वच अस्पृश्य लढवय्या जातींचा फक्त आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. त्यांच्या शौर्याचे केवळ काठी, तोडे, कडे इत्यादी नगण्य इनाम म्हणून देऊन कौतुक केले. कधी कधी तर फक्त शाबासकी देऊनच बोळवण केली जाई. स्वराज्य व सुराज्याचा सक्रिय स्वाभिमान उरी बाळगणा-या महारांनी आपल्या पराक्रमाने मराठी मुलखाची शान भारतखंडात वाढवून भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फडकत ठेवला; पण त्यांची पायरी कधीच बदलली नाही. बाजी निंबाळकर व नेताजी पालकर या मुसलमान झालेल्या सरदारांना मोठ्या सन्मानाने हिंदू धर्मात घेतले. पुन्हा सरदारकी बहाल केली; परंतु अस्पृश्यांच्या गळ्यात मडके व कमरेला खराटा बांधून ठेवण्याचा जागतिक विक्रम केला. अशा अनेकानेक पशुतुल्य अन्याय, अत्याचार व अस्पृश्यतेच्या विरोधात त्या वेळी महारांचे सरदार दुसरे सिदनाक यांनी स्वाभिमान प्रकट करून श्रीमंत बाजीराव पेशव्यांना विनंती केली होती की पेशवाईत महारादी अस्पृश्य जाती-जमातींना अस्मितेने वागवले जावे. महार सैनिक मायभूमीसाठी प्राण देण्यास तयार आहेत; पण त्यांची ही विनंती पेशव्यांनी अतिशय तिरस्काराने अमान्य केली होती आणि म्हणून महारांची संख्या अल्प असूनही ते पेशव्यांविरुद्ध अत्यंत शौर्याने व त्वेषाने लढले. प्राणांची आहुती देऊन अस्पृश्यतेची अत्युच्च परिसीमा गाठलेल्या पेशव्यांचा अभूतपूर्व पराभव केला. यावरून स्पष्ट होते की महार सैनिक ब्रिटिशांच्या आमिषाला बळी पडून किंवा पोटासाठी पेशव्यांच्या विरोधात लढले नसून त्यांची लढाई समता, अस्मिता यासाठी होती. अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेले हे त्यांचे प्रथम बंड होते. भीमा-कोरेगावची लढाई एक निमित्त- हे युद्ध पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावरील भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात लढले गेले. या युद्धाचे स्वरूप मोठे विचित्र व भयानक होते. हे युद्ध इंग्रजांनी महारांच्या बळावर पेशवाईविरुद्ध लढले असले तरी याचे खरे स्वरूप अस्पृश्यता व अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई असेच होते. महार मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करणे हे त्यांचे एकच ध्येय होते. हजारो वर्षांच्या अन्यायाला कायमची मूठमाती देण्यासाठी पेटलेल्या मानसिकतेची जिद्द होती. या लढाईच्या निमित्ताने महारांना नामी संधी सापडली होती. 

   
          या युद्धाचे दुसरे एक वैशिष्ट्य असे होते की, पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या 30 हजार होती. यापैकी 5 हजार पायदळ व 25 हजार घोडदळ होते. त्यापैकी 20 हजार तर निवडक प्रशिक्षित अरब घोडेस्वार होते. त्या तुलनेत इकडे इंग्रजप्रणीत केवळ 834 महार सैनिक होते. तरीही निकराचा लढा देऊन त्यांनी आपल्यापेक्षा 40 पट जास्त असलेल्या पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवून दिला. 16 तास झुंज देऊन महार सैनिकांनी अखेर 1 जानेवारी 1818 च्या सायंकाळी 6 वाजता पेशव्यांच्या बलाढ्य सैन्यावर कब्जा केला. एवढ्या मोठ्या सैन्यापुढे एवढ्याशा सैन्याचा टिकाव लागणे अशक्यप्राय होते. तशी परिस्थितीसुद्धा निर्माण झाली होती; पण न्यायासाठी मरण पत्करू अशा बाण्याने महार सैनिक प्राणपणाने लढले. कारण त्यांना माहीत होते की कोणत्याही परिस्थितीत आपणास माणसाचे जगणे जगू दिले जात नाही. जगू दिले जाणार नाही. असे मृत जीवन जगण्यापेक्षा न्यायासाठी, हक्कासाठी लढत लढत मेलेले बरे. जगापुढे एक नवा इतिहास निर्माण होईल. ते पेटून उठले होते. भीमा कोरेगावच्या या लढाईत शूद्र-महार सैनिकांनी शेवटी इंग्रजांना विजय मिळवून दिला. इंग्रजांनी यापूर्वी पेशवाईशी दोन वेळा केलेल्या लढाईत इंग्रजांना मोठी हार पत्करावी लागली होती. कोरेगावच्या या लढाईत 834 शूद्र-महार सैनिकांपैकी 275 तर पेशव्यांच्या 30 हजारपैकी 600 सैनिक कामी आले. क्रांतिस्तंभाची निर्मिती - ज्या महार अस्पृश्य सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली, त्यांच्या व त्या दिवसाच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक भव्य ऐतिहासिक असा क्रांतिस्तंभ निर्माण केला व समतेच्या या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा संगमरवरी शिलेवर मराठी व इंग्रजी भाषेत कोरली. 1795 मध्ये खर्ड्याची लढाई पेशव्यांना जिंकून देणारे, प्रतापगड, वैराटगड, रायगड, जंजिरा, पुरंदर इत्यादी ठिकाणी मराठी मातीचे इमान राखणारे महार कोरेगावच्या लढाईत 1818 मध्ये म्हणजेच अवघ्या 23 वर्षांत पेशवाईविरुद्ध का लढले? ब्रिटिशांसारख्या परकीय सत्तेला विजय मिळवून देण्यात महारांचे प्रयोजन काय? मराठी मुलखाबद्दलची त्यांची अस्मिता अचानक का बदलली? ते देशद्रोही, फितूर होते काय? अशा प्रश्नांची उत्तरे हा दीपस्तंभ- क्रांतिस्तंभ देत राहील यात शंका नाही. क्रांतिस्तंभाला डॉ. आंबेडकरांची मानवंदना - 1 जानेवारी 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांतिस्तंभाला प्रथम भेट देऊन आपल्या सहका-यांसमवेत मानवंदना देऊन त्या वर्षी स्मृतिदिन साजरा केला. या ऐतिहासिक मानवंदनेनंतर दरवर्षी 1 जानेवारीला लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी व सैनिक तसेच मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी कुटुंबासह विजयस्तंभाला भेट देऊन मानवंदना देऊन आदरांजली अर्पण करतात. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)