चंद्रपूर :- काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था आदी निवासी संस्था चालविण्यात येतात. या संस्थेत वास्तव्यास असणाऱ्या बालकांच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घ्यावी. याकरिता आरोग्य विभागाशी समन्वय ठेवून संस्थांना नियमित भेटी द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन, बालकल्याण समिती व बाल न्याय मंडळ यांची त्रैमासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष क्षमा बारसकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) पुनम गेडाम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, बालकांच्या आरोग्याशी संबधीत विशेष काळजी घ्यावी. बालकांचे पालन पोषणावर विशेष भर द्यावा. आरोग्य बिघडल्यास शासकीय रुग्णालयात दाखल करावे. तसेच संस्थात्मक अधिकाऱ्यांकडून प्रत्येक बालगृहाला नियमित भेटी द्याव्यात अशा सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मिशन वात्सल्य पोर्टल, जिल्ह्यातील थांबविण्यात आलेले बालविवाह, जिल्हास्तरावरील बालगृहे, अनाथ प्रमाणपत्र बाबत तसेच प्रतिपालकत्व बाबत माहिती, दत्तक प्रक्रिया, जिल्ह्यातील बालकांच्या गुन्ह्याबाबतची प्रकरणे आदींची माहिती जाणून घेतली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या