राजुरा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे सुभाष धोटे यांनी 6 बूथवरील व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मतमोजणीची मागणी (Subhash Dhote of Congress from Rajura assembly constituency demanded VVPAT and EVM vote counting at 6 booths.)

Vidyanshnewslive
By -
0
राजुरा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे सुभाष धोटे यांनी 6 बूथवरील व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मतमोजणीची मागणी (Subhash Dhote of Congress from Rajura assembly constituency demanded VVPAT and EVM vote counting at 6 booths.)
चंद्रपूर :- राजुरा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष धोटे यांनीसुद्धा सहा बुथवरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमची पळताळणी करावी यासाठी प्रशासनाकडे 2 लाख 83 हजार 200 रूपये शुल्क भरले आहे. दुसर्‍या क्रमांकाचे उमेदवार सुभाष धोटे यांनी व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मतमोजणीची मागणी केली आहे. निकाल लागल्यानंतर सात दिवसांच्या आत ही मागणी करणे बंधनकारक आहे. धोटे यांनी 29 नोव्हेंबर पूर्वीच पैसे भरून ही मागणी केली आहे. त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज करून दिली आहे. तसेच सहा बुथचे शुल्कदेखील निवडणूक अधिकारी कार्यालयात भरले असल्याची माहिती धोटे यांनी दिली. एका बुथसाठी 47 हजार 200 याप्रमाणे धोटे यांनी शंका घेतलेल्या सहा बुथचे शुल्क 2 लाख 83 हजार 200 रूपये सुभाष धोटे यांनी जमा केले आहे. अभियंता येऊन सर्वासमक्ष ईव्हीएम तपासणी करणार आहेत. यावेळी उमेदवार तथा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. जिल्हा निवडणूक अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली. येत्या 45 दिवसांत ही प्रक्रिया केली जाणार आहे. मतदार आणि राजकीय जाणकारांचा अंदाज चुकवित भाजपाचे देवराव भोंगळे या मतदारसंघातून 3 हजार 54 मतांनी विजयी झाले. तेव्हापासून त्यांच्या विजयाबाबत या मतदारसंघात शंका उपस्थित केली जात आहे. भोंगळेच्या उमेदवारीमुळे शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. वामन चटप आणि काँग्रेसचे सुभाष धोटे यांच्यातच लढत होईल, असे चित्र होते. परंतु, भोंगळे यांनी बाजी मारली. तेव्हापासून राजुरा मतदारसंघ चर्चेत आला आहे. 
            विशेष म्हणजे राजुरा मतदारसंघात निवडणुकीच्या पूर्वी बोगस मतदार नोंदणीचे प्रकरणदेखील समोर आले होते. व्होटर हेल्पलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून 6 हजार 861 बोगस मतदारांची नोंदणी झाली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी, अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपास सुरू आहे. संबंधित उमेदवारांकडून निश्चित केलेल्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्र (बीयू, सीयू आणि व्हीव्ही पॅट) एकमेकांशी जोडणी करून मतदान यंत्रांच्या अनुक्रमांकांची पडताळणी करण्यात येईल. तसेच मतदान यंत्राची चाचणी करण्यात येईल. बीईएल या उत्पादक कंपनीच्या नियुक्त अभियंत्याकडून व्हीव्हीपॅटमध्ये एसएलयूव्दारे डमी चिन्ह लोड केल्या जाईल. त्यानंतर बॅलटवर लावण्यात आलेले व व्हीव्हीपॅटमध्ये लोड केलेल्या डमी चिन्हांची प्रिंट काढून खात्री केली जाईल. उमेदवार यांनी निश्चित केलेल्या मतदान केंद्रावरील मतदानाच्या दिवशी झालेले मतदान कंट्रोल युनिटमधून 'क्लिअर' केले जाईल, त्यानंतर उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अभिरूप मतदान करता येईल. असे डमी मतदान जास्तीत जास्त 1400 एवढे केले जातील आणि त्यातून यंत्र योग्य स्थितीत काम करीत होते की नाही, हे पाहिले जाईल. कुठल्याही परिस्थितीत व्हीव्ही पॅटच्या मतांची मोजणी केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी  पत्रपरिषदेत दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)