निर्भय बनून संविधानाच्या रक्षणार्थ, नव्यानं कटिबद्ध होणं हीच काळाची आर्त हाक...! (The need of the hour is to become fearless and re-committed to protect the Constitution...!)

Vidyanshnewslive
By -
0
निर्भय बनून संविधानाच्या रक्षणार्थ, नव्यानं कटिबद्ध होणं हीच काळाची आर्त हाक...! (The need of the hour is to become fearless and re-committed to protect the Constitution...!)


वृत्तसेवा :- गेले काही दिवस अनेकार्थानं महत्त्वपूर्ण आणि वैचारिक घुसळणीचे ठरले. साहित्यिक विचारवंतांच्या घरासमोर करण्यात आलेले निदर्शने असोत वा ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव, ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांना झुंडशाहीचा करावा लागलेला मुकाबला सारं काही मन सुन्न करणारं होतं. या विरोधात ज्या मोजक्या विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला त्यांना सोशल मीडियात ज्या पद्धतीने ट्रोल केलं गेलं ते अभूतपूर्वच म्हणावं लागेल. कळस तर तेव्हा झाला जेव्हा या ठोकशाहीचे नेतृवाकडूनच जाहीर समर्थन केलं गेलं. गंमतीची आणि अनाकलनीय बाब म्हणजे झुंडशाहीचा मुकाबला करणा-यांना एकाचवेळी मनूवादी आणि भक्तांच्या रोषाला बळी पडावं लागलं ! एकीकडे निर्भय बनो म्हणत काही माणसं भारत जोडो अभियानाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पुरस्कार करत सोशल मीडियावर समता, स्वातंत्र्य, बंधुता या संविधानिक मूल्यांचा जयघोष करत समताधिष्ठित भारतनिर्माणाची बेंबीच्या देठापासून हाक देत होते; तर दुसरीकडे मनूवादी आणि आपलेच म्हणविणारे काही साक्षात संविधानाच्या सरनाम्यालाच बेमालूमपणे पुन्हा पुन्हा आव्हान देत होते. ह्या सगळ्या घटना थेट संविधान आणि संविधानदत्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी निगडित आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष शासकीय पातळीवरून देशभर साजरे केले गेले. संविधानावर मंथन करून त्याच्या देश एकसंध ठेवण्याच्या परिणामकारकतेवर संसदेतही नव्याने शिक्कामोर्तब करण्यात आले. पण फारसं काही हाती लागलं नाही किंबहुना ते अपेक्षितही नव्हतं ही कटू वस्तुस्थिती होय. 
              आज 26 ऑक्टोबर. आजपासून बरोबर एक महिन्याने, अर्थात 26 नोव्हेंबरला देशभर 'संविधान दिन' साजरा करण्यात येणार आहे. घर घर तिरंगाच्या धर्तीवर‌ संविधानप्रेमींनी लावून धरलेल्या मागणीवरून लाजेकाजे का होईना महाराष्ट्रात घर घर संविधान हे अभियान राबविण्यात येणार आहे. कारण याच दिवशी 1949 ला संविधान देशाला अर्पित करण्यात आले होते. त्यावेळी केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी अनेक गंभीर इशारे दिले होते. परंतु पुढील काळात राज्यकर्त्यांनी ते फारसे गांभिर्याने न घेतल्याने आणि मागील 10 वर्षात तर उलटा प्रवास सुरू झाला असल्याने आज देश यादवीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे जाणवत आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषमता आजही आहेच; किंबहुना ती झपाट्याने वाढत आहे. पण धर्मनिरपेक्षता तत्वाविरोधी संघाने सोडलेला विषाणू हा देशासाठी सर्वाधिक घातक होय. संघाला जे हिंदुत्व अभिप्रेत आहे ब्राह्मण्याधिष्ठित असून धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेतील समान न्याय, समान संधी हेच त्यांना मान्य नाही हे वारंवार दिसून येते. फक्त ते थेट बोलत नाहीत तर शब्दच्छल करून समाजाला संभ्रमित करत असतात... आणि त्याचवेळी अनुषंगिक पावलंही टाकत असतात. संघाच्या प्रत्येक उक्ती आणि कृतीला व्यापक अर्थ आणि उद्देश असतो हे देशाने अनेकदा अनुभवले आहे. संविधानाकडून परत मनुस्मृतीकडे नेण्याचा त्यांचा अजेंडा असून बाबरी पाडण्यासाठी त्यांनी निवडलेली तारीख त्याचं ठळक उदाहरण होय. 1992 च्या 6 डिसेंबरला असा कोणता 'शुभ मुहूर्त' होता ? कुठलाही मुहूर्त नव्हता; तर तो संविधानाचे शिल्पकार अर्थात बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन होता ! अतिरेक्यांनी मुंबईवर 2008 मध्ये केलेला हल्ला... तारीख होती 26 नोव्हेंबर ! संविधान दिन !! ह्या दोन्ही घटना थेट संविधानालाच रक्तबंबाळ करणा-या होत हेही आपण समजून घेतलं पाहिजे. जर संविधानावरच असे आणि इतर बेमालूम घाले घातले जात असतील तर देश एकसंध ठेवणे ही समस्त संविधानप्रेमींची प्रथम गरज असून त्यासाठी आपसी भाईचारा हा एकमेव उपाय होय. हे असंच चालू राहिलं तर क्रिया आणि प्रतिक्रियांच्या आगीत अवघा देश होरपळून जाईल, कुणाच्याच हाती काही लागणार नाही ! आणि मग येणारी पिढी सतत आपणास जाब विचारेल... संविधानासारखा राष्ट्रीय धर्मग्रंथ असताना धर्माच्या नावावर आपण देशाचे वाटोळं कसं होऊ दिलं ? आपणास कधीच माफ करणार नाही ती पिढी ! आणि म्हणून सुजाण, सद्सद्विवेक बुद्धी जागृत असणा-या जनतेने हे ध्यानात घेऊन निर्भय बनत संविधानाच्या रक्षणार्थ नव्यानं कटिबद्ध होणं ही काळाची गरज आणि आर्त हाक असून हीच ती वेळ होय. अन्यथा वेळ निघून गेलेली असेल...!!

संकलन :- भीमप्रकाश गायकवाड, 'मूकनायक'
रविराजपार्क, परभणी

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)