72 हजारापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्यावर उमेदवारी साठी भटकंती करण्याची वेळ (Time to wander for the candidature of MLA Kishorbhau Jorgewar, who won by more than 72 thousand votes.)

Vidyanshnewslive
By -
0
72 हजारापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्यावर उमेदवारी साठी भटकंती करण्याची वेळ (Time to wander for the candidature of MLA Kishorbhau Jorgewar, who won by more than 72 thousand votes.)


वृत्तसेवा :- २०१९ ची विधानसभा निवडणूक ७२ हजारांपेक्षा अधिकच्या मताधिक्क्याने जिंकणारे अपक्ष आमदार किशाेर जोरगेवार यांना यंदा मात्र अधिकृत उमेदवारीसाठी या पक्षातून त्या पक्षात, अशी दारोदारी भटकंती करावी लागत आहे. किशोर जोरगेवार यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपमधून केली होती. सुधीर मुनगंटीवार त्यांचे राजकीय गुरू. मात्र, उमेदवारी मिळाली नाही म्हणून २०१४ मध्ये गुरूचा हात सोडून जोरगेवार यांनी उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण हाती घेतला. त्या निवडणुकीत ५१ हजारांपेक्षा अधिक मते घेऊन जोरगेवार चर्चेत आले. यानंतर २०१९ ची निवडणूक जोरगेवार यांनी ७२ हजारांपेक्षा अधिक मतांनी जिंकली. या निवडणुकीत जोरगेवार यांना १ लाख १७ हजार ५७० मते मिळाली, तर भाजपचे नाना शामकुळे यांना ४४ हजार ९०९ मते मिळाली. दरम्यानच्या काळात जोरगेवार यांनी उमेदवारीसाठी दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीसाठी 'एबी फॉर्म'देखील आणला. त्याचवेळी त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनीही 'एबी फॉर्म' आणला होता. यामुळे गोंधळ झाला आणि जोरगेवार यांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले होते. नुकतीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. पवार यांनी त्यांना वाट बघण्याचा सल्ला दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस जवळ आल्यानंतरही जोरगेवार पक्षप्रवेश व उमेदवारीसाठी दारोदारी भटकंती करीत आहेत. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध असतानाही त्यांना एकही पक्ष उमेदवारी व पक्षप्रवेश देण्यास तयार नाही. या सर्व घडामोडी पाहता जोरगेवार यांना यंदाही अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागेल, असे बोलले जात आहे.
                 राजकीय विश्वासार्हता गमावून बसल्याने त्यांच्यावर ही वेळ आली. भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, असा प्रवास केलेल्या जोरगेवार यांच्यावर अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची वेळ येते की काय, अशी चर्चा सुरू आहे. आमदार झाल्यानंतरही जोरगेवार सुरुवातीला देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी, महायुती, एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटी, असा प्रवास करीत राहिले. कधीच एका पक्षासोबत निष्ठेने न राहिल्याने जोरगेवार राजकीय विश्वासार्हता गमावून बसले. भाजपश्रेष्ठी त्यांना चंद्रपुरातून उमेदवारी देण्यास तयार होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र दिल्याने भाजप नेते दुखावले. तिकडे राष्ट्रवादीच्या संपर्कात असताना भाजपच्या केंद्र व राज्य पातळीवरील नेत्यांशीही ते संपर्कात होते. यासोबतच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठीही सक्रिय होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्यानंतर किशोर जोरगेवार यांनी अखेरचा प्रयत्न म्हणून पुन्हा भाजपचे दार ठोठावण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. जोरगेवार समर्थकांची गुरुवारी सायंकाळी बैठक झाली, यात तशा सूचना करण्यात आल्या. जोरगेवार यांना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यास काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि पाच इच्छुक उमेदवारांचा विरोध आहे. यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी भाजपच्या दिल्लीस्थित वरिष्ठ नेत्यांकडे जाण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर, भाजपकडून तिकीट मिळावे, यासाठी जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विनंती केल्याचे बोलले जात आहे. एकूणच किशोर भाऊ जोरगेवार हे 2024 च्या निवडणुकीत कोणत्याही अधिकृत पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक  लढविणार असल्याचे चित्र दिसत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)