चंद्रपूर :- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज (दि. 1) वन अकादमी येथे जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या 17 टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. जिल्ह्यात एकच एकलव्य निवासी स्कूल आहे. त्यामुळे आणखी एका एकलव्य शाळेची निर्मिती करावी. वनहक्क पट्टे वाटपाचे काम जिल्ह्यात अतिशय चांगले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू असल्यामुळे बांबूच्या उत्पादनांना चालना द्यावी. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा द्याव्यात. तसेच मनरेगाच्या माध्यमातून जिल्हा आदर्श करण्यावर प्रशासनाने भर द्यावा. पुढे ते म्हणाले, मानव - वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. पोलिस विभागाने पोक्सो कायदा, लैंगिक शोषणाबाबत जनजागृती, तसेच गुड टच बाद बॅड टच आदींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. यावेळी त्यांनी जिल्ह्यात शासकीय व खाजगी विद्युत प्रकल्प किती, ते पूर्ण क्षमतेने चालतात काय, शाळा, अंगणवाड्यांची स्थिती, प्रधानमंत्री आवास योजनेबाबत माहिती तसेच विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले सादरीकरण यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्याची भौगोलिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक व इतर माहिती सादर करतांना जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी योजना, जिल्ह्यात असलेले उद्योग, कृषी संदर्भातील माहिती, पर्यटन, सुरू असलेले प्रकल्प याबाबत राज्यपालांना अवगत केले. यात जलजीवन मिशन, शाळा अंगणवाड्यांची स्थिती, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, स्वामित्व योजना, किसान क्रेडिट कार्ड, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा, वन हक्क पट्टे सोबतच जिल्ह्यात सुरू असलेले मोठे प्रकल्प कॅन्सर केअर हॉस्पिटल, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत, बॉटनिकल गार्डन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, एस. एन. डी. टी. विद्यापीठ, चंद्रपूर फ्लाईंग क्लब आदींबाबत राज्यपालांना अवगत केले. विविध नामवंत व्यक्तीसोबत संवाद राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी जिल्ह्यातील उद्योग प्रतिनिधी, समाजसेवक, साहित्यिक, कलाकार, पर्यावरण तज्ञ, शासकीय व खाजगी महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडू, प्रगतिशील आदिवासी शेतकरी, पत्रकार यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमोर प्रामुख्याने जिल्ह्यात सुरू असलेली आणि भविष्यात आवश्यक असलेली विकास कामे, उद्योग विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास, उद्योगांच्या समस्या, पर्यटन विकासासाठी सुविधांचा विकास यासारखे विषय मांडण्यात आले. यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी चंद्रपूर थर्मल पावर स्टेशन, तसेच उद्योगांमध्ये प्रत्यक्षात कशा प्रकारची रोजगार निर्मिती आवश्यक आहे, त्याची माहिती जाणून घेतली. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल विद्यार्थी पालकांमध्ये जनजागृती करावी, जिल्ह्यातील खेळाडूंसाठी विशेष क्रीडा डॉक्टरची नियुक्ती करावी, खेळाडूंना उत्कृष्ट पोषणआहार, प्रोटीन युक्त पदार्थ योजनेच्या माध्यमातून देण्याची तरतूद करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या. यावेळी त्यांनी राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी यांच्याशी सुद्धा चर्चा केली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या