चंद्रपुरात "इंडस्ट्रियल एक्सपो बिजनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉनक्लेव्ह"चे होणार आयोजन, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आयोजनाबाबत आढावा ("Industrial Expo Business and Investment Conclave" will be organized in Chandrapur, District Collector reviewed the project)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपुरात "इंडस्ट्रियल एक्सपो बिजनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉनक्लेव्ह"चे होणार आयोजन, 
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आयोजनाबाबत आढावा ("Industrial Expo Business and Investment Conclave" will be organized in Chandrapur, District Collector reviewed the project)
चंद्रपूर :- चंद्रपुरात "इंडस्ट्रियल एक्सपो बिजनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉनक्लेव्ह"चे आयोजन 1 व 2 मार्च रोजी करण्यात येत आहे. या एक्सपोच्या यशस्वी आयोजनाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील उद्योजकांसमवेत आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, तसेच जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, नागपूर येथे नुकतेच औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर चंद्रपुरात "इंडस्ट्रियल एक्सपो बिजनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉनक्लेव्ह"चे आयोजन करण्यात येत आहे. 1 व 2 मार्च या दोन दिवसीय कालावधीत वन अकादमी येथे सदर कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी उद्योग विभागाने प्लॅन करून योग्य नियोजन करावे. एमआयडीसी क्षेत्रासोबतच जिल्ह्यातील इतरही उद्योगांची यादी तयार करावी. एक्सपो कार्यक्रमाबाबत सर्व उद्योगांना कळवावे. तसेच जिल्ह्यातील विविध उद्योगांशी संबंधित असलेल्या संघटना व लोकांना एक्सपोमध्ये आमंत्रित करावे. जिल्हाधिकारी श्री. गौडा पुढे म्हणाले, सदर एक्सपोमध्ये 200 स्टॉल उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी जागा निश्चित करावी. जिल्ह्यातील मायनिंग आणि मिनरल्स, कोल, आयरन, स्टील, सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग, शिक्षण, एफ.आय.डी.सी, टुरिझम, पावरप्लांट, फ्लाईंग क्लब, बांबू आणि पेपर उद्योग आदी उद्योगांचे स्टॉल उभारणे अपेक्षित आहे. या एक्सपोमध्ये संबंधित उद्योगांवर आधारित मार्गदर्शकांचे मार्गदर्शनपर सत्र पार पडणार आहे. सदर सत्र विहित वेळेत पार पाडण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी बैठकीत दिल्या.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)