जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन85 लक्ष शेतक-यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा – कृषीमंत्री धनंजय मुंडे, जंगलालगत गावातील शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर कुंपन - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Inauguration of district level agricultural festival, installment of Namo Shetkari Yojana deposited in the accounts of 85 lakh farmers - Agriculture Minister Dhananjay Munde, Kumpan on 90 percent subsidy to farmers in villages near forests - Guardian Minister Sudhir Mungantiwar)

Vidyanshnewslive
By -
0
जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन
85 लक्ष शेतक-यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा – कृषीमंत्री धनंजय मुंडे, जंगलालगत गावातील शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर कुंपन - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Inauguration of district level agricultural festival, installment of Namo Shetkari Yojana deposited in the accounts of 85 lakh farmers - Agriculture Minister Dhananjay Munde, Kumpan on 90 percent subsidy to farmers in villages near forests - Guardian Minister Sudhir Mungantiwar)
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे कापूस उत्पादन संशोधन केंद्र असून येथे 23 प्रकारच्या कपाशीची लागवड केली जाते. असेच एक संशोधन केंद्र भाजीपालाकरीता असावे, असा विचार गत महिन्यात ऐकार्जुना येथील शास्त्रज्ञ शेतकरी संवाद कार्यक्रमात आला. त्यानुसार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि एक महिन्यातच ही मागणी फळाला येऊन आज जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात भाजीपाला संशोधन केंद्र मान्यतेचा कागद हाती आला. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार असल्याचा आनंद आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार किशोर जोरगेवार, म.रा. खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, बांबू बोर्डाचे अध्यक्ष श्रीनिवास राव, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, विनीता व्यास, हरीश शर्मा, राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, नरेंद्र जिवतोडे आदी उपस्थित होते.
            चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाला हा हैद्राबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा येथून येतो, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कापूस उत्पादन संशोधन केंद्राप्रमाणेच भाजीपाला संशोधन केंद्र जिल्ह्यात असावे, असा विचार गत महिन्यातच आला. त्यानुसार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि एका क्षणात त्यांनी ऐकार्जुना येथे भाजीपाला संशोधन केंद्राला मान्यता दिली. त्यासाठी मी कृषीमंत्री श्री. मुंडे यांचा व्यक्तिश: आभारी आहे. पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जगामध्ये कितीही तंत्रज्ञान विकसीत झाले तरी शेतमाल हा मातीतच पिकविला जातो. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आता तांत्रिक शेती, बांबु शेती, वनशेती, रानभाजी शेती असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. सरकार शेतक-यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून 1 रुपयांत पीक विमा देणारे महाराष्ट्र हे जगात एकमेव उदाहरण आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे जंगल क्षेत्र असलेल्या गावातील शेतक-यांना राज्य सरकारकडून 90 टक्के अनुदानावर कुंपन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. जिल्हास्तरीय कृषी महोत्सव पाच दिवस चालणार असून यात पशुप्रदर्शनी, 6750 किग्रॅ खिचडीचा विक्रम, 43 इंचाची पुंगनुर गाय, नोंदणी केलेल्या शेतक-यांना लकी ड्रॉ द्वारे शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षीसे, सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण आहे. राज्याचा वित्तमंत्री असतांना प्रत्येक जिल्ह्यात कृषी प्रदर्शनीसाठी 20 लक्ष रुपये देण्याचा निर्णय सर्वप्रथम आपणच घेतला, असेही त्यांनी सांगितले.
          85 लक्ष शेतक-यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा कृषीमंत्री मुंडे केंद्र व राज्य सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अग्रेसर असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतक-यांना पी.एम. किसान योजनेंतर्गत 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला जोड म्हणून राज्य सरकारनेसुध्दा नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतक-यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त 6 हजार रुपये देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील 97 लक्ष शेतक-यांपैकी 85 लक्ष शेतक-यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. उर्वरीत शेतक-यांच्या खात्यात लवकरच हा हप्ता जमा केला जाणार आहे. पुढे ते म्हणाले, आज जग बदलले आहे. त्यामुळे शेतक-यांनी पारंपरिक शेतीऐवजी 21 व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती करावी व शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारावे. स्मार्ट प्रकल्प, स्टार्टअप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आदींमधून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतक-यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी एक महिन्याच्या आत राज्य सरकारच्या कृषी विभागाने मोठ्या कंपन्यांसोबत करार केला आहे. सोबतच पेरलेल्या आणि उगविलेल्या मालाला भाव देण्याचा अंदाज कृषी विभाग देणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील 1 कोटी 70 लक्ष शेतक-यांनी सहभाग नोंदविला असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.  यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, बचत गटाच्या महिला, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार किशोर जोरगेवार आदींनी कृषी महोत्सवातील विविध स्टॉलची पाहणी केली. जिल्ह्यात दोन मधाचे गाव  चंद्रपूर जिल्हा वाघ, साग, चिमूर क्रांती, कोळसा, वन यासाठी प्रसिध्द आहे. आता पिर्ली आणि मामला या दोन गावांची मधाचे गाव म्हणून निवड झाल्यामुळे चंद्रपूर जिल्हा हनी क्रांतीचा महत्वाचा भाग होईल. नोंदणी करणा-या शेतक-यांनाच धानाचा बोनस चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्यात 1 लक्ष 84 हजार हेक्टरवर धानाची शेती केली जाते. राज्य सरकारने धानाला 20 हजार रुपये प्रति हेक्टर बोनस जाहीर केला आहे. मात्र नोंदणी केलेल्या शेतक-यांनाच या बोनसचा लाभ मिळणार आहे. फर्निचर क्लस्टरकरीता 48 कोटी रुपये मंजूर एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर आता एफ. आय.डी.सी. ची निर्मिती होणार असून लाकडावर कोरीव काम करणा-यांसाठी 48 कोटी रुपये खर्च करून फर्निचर क्लस्टर तयार करण्यात येत आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बळीराजा समृध्दी मार्ग शेतपाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ, मधाचे गाव म्हणून पिर्ली (ता. भद्रावती) चे उद्घाटन, मिशन जयकिसान योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)