विभागीय आयुक्तांकडून निवडणूक पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा (Review of Election Revision Program by Divisional Commissioner )

Vidyanshnewslive
By -
0
विभागीय आयुक्तांकडून निवडणूक पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा (Review of Election Revision Program by Divisional Commissioner )
चंद्रपूर :- भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या अंतर्गत नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले असून श्रीमती बिदरी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा नागपूरवरून दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., उपजिल्हा निवडणूक अधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, रविंद्र माने, शिवनंदा लंगडापुरे आदी उपस्थित होते.
        यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी म्हणाल्या, 18 ते 19 या वयोगटातील नवमतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी शाळा – महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करावे. मतदान प्रक्रियेत महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यांची नोंदणी करावी. तसेच जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचून त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करा. नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता व इतर बाबींमध्ये बदल करणे, मयत नावे वगळणे आदी बाबी त्वरीत पूर्ण कराव्यात. तसेच अचूक मतदार याद्या प्रसिध्द होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सुचना त्यांनी केल्या. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सादरीकरणात सांगितले की, जिल्ह्यात 211 मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करण्यात आले असून आता एकूण मतदान केंद्रांची संख्या 2032 झाली आहे. तसेच जिल्ह्याला प्राप्त 84702 इलेक्ट्रॉनिक फोटो आयडी कार्ड पैकी 83554 कार्डचे वितरण झाल्याचे सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाद्वारे घेण्यात आलेले विशेष शिबीर, प्रलंबित दावे व हरकती निकाली काढण्यासाठी केलेल्या उपाययोजना, विशेष ग्रामसभा, निवडणूक विभागात असलेल्या रिक्त जागा आदींबाबत माहिती दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)