बुध्द पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना ;
सूत्राच्या माहितीनुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकप्लात 4918 वन्यप्राण्याची नोंद, तसेच 44 वाघ व 11 बिबट्याची नोंद झाल्याची माहिती.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पात झालेल्या मचाण सेन्सस दरम्यान 44 वाघांची तर 11 बिबट्यांची नोंद करण्यात आली आहे. बौध्द पौर्णिमेनिमित्त काल संध्याकाळी 6 ते आज सकाळी 6 पर्यंत या मचाण सेन्सस म्हणजेच निसर्गानुभवचा उपक्रम राबविण्यात आला होता. मुख्य म्हणजे मचाण सेन्सस दरम्यान अतिशय दुर्मिळ असलेल्या चांदी अस्वल चे ही प्रगणकांना दर्शन झालं आणि सात चांदी अस्वल दिसल्याची सेन्सस दरम्यान नोंद करण्यात आली. वाघ आणि बिबट्यांसोबतच ताडोबात 36 रानकुत्री, 22 अस्वल, 325 रानगवे, 1209 चितळ, 942 सांबर, 142 भेरकी, 10 चौसिंगा, 1269 रानडुकरं, 112 नीलगाई, 468 माकडं, 30 पाम आणि इंडियन सिव्हेट, सात चांदी अस्वल, सात रानमांजर, दोन साळींदर, 37 मुंगूस आणि 245 मोरांची देखील नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ताडोबात मचाण सेन्सस करण्यात आला नव्हता, मात्र कोरोना निर्बंध हटल्यामुळे या वर्षी मचाण सेन्सस घेण्यात आला आणि त्यासाठी राज्यासह देशभरातून हौशी पर्यटक ताडोबात दाखल झाले होते. या साठी दुपारपासूनच वनविभागाचे कर्मचारी, NGO चे प्रतिनिधी आणि हौशी पर्यटक त्यांना नेमून दिलेल्या मचानींवर रवाना झाले. खाण्या-पिण्याचं साहित्य, टॉर्च, नोंदवही आणि इतर आवश्यक साहित्य घेवून या लोकांनी रात्रभर मचानींवरून वन्यप्राण्यांचं निरीक्षण केलं. कॅमेरा ट्रॅप, ट्रान्झिट लाईन मेथड या सारख्या वन्यप्राणी गणनेच्या आधुनिक पध्दती वापरात येण्याआधी मचाण सेन्सस हीच वन्यप्राणी गणनेची सर्वमान्य आणि सोपी पध्दत होती. उन्हाळ्यात पानगळीमुळे जंगल विरळ होतं आणि वन्यप्राणी पाणवठ्यांवर गर्दी करतात. त्यामुळे लख्ख चंद्रप्रकाश असलेली बौध्दपौर्णिमेची रात्र या साठी निवडली जाते. ताडोबाच्या कोर आणि बफर झोन मध्ये असलेल्या काही मोजक्याच पाणवठ्यांवर हा मचाण सेन्सस करण्यात आला. त्यामुळे सेन्सस दरम्यान नोंद झालेल्या वन्यप्राण्यांची संख्या ही वास्तविक संख्येपेक्षा फार कमी आहे. मात्र मचाण सेन्ससच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना व हौशी वन्यजीव अभ्यासकांना जंगलाचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळते. या शिवाय प्राणी गणने दरम्यान करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या नोंदी या वनविभागाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाच्या ठरतात.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या