प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा - आर.विमला, जिल्हाधिकारी नागपूर

Vidyanshnewslive
By -
0

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा - आर.विमला, जिल्हाधिकारी नागपूर

नागपूर :- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी होण्यासाठी कामगारांनी सेवा केंद्रात नाव नोंदणी करणे आवश्यक असून महापालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती  व विविध विभागांशी संलग्न काम करणाऱ्या कामगारांना  या योजनेत सहभागी करण्यासाठी संबंधित विभागांनी पुढाकार घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या. योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील असंघटीत कामगारांना मानधन योजनेत समाविष्ठ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी त्याबोलत होत्या.

सहाय्यक आयुक्त कामगार निशा नगरारे, समन्वयक सरकारी कामगार अधिकारी संजय धात्रक, उद्योग निरिक्षक, सुविधा केंद्राचे नोडल अधिकारी, एलआयसीचे व्यवस्थापक, समाजकल्याण अधिकारी तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगार संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या योजनेसाठी १८ ते ४० वर्ष वयोगाटातील कामगार पात्र असून सीएससी सेवा केंद्रात त्यांनी नोंदणी करावी. योजनेची माहिती ग्रामपंचायतस्तरापर्यंत पोहचविण्यासाठी व्यापक मोहीम राबवून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या सदस्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाच्या विविध संस्थामध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांकडील कामगारांना प्राधान्याने या योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना दिले. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत जिल्हाधिकारी यांनी यावेळी आढावा घेतला. विविध क्षेत्रातील असंघटीत कामगारांना वयाच्या ६० वर्षानंतर निवृत्ती वेतन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असून वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत लाभार्थी मासिक ३ हजार रुपये निवृत्ती वेतनास पात्र ठरतात. या योजनेत असंघटीत क्षेत्रातील कामगार म्हणजे घरेलु कामगार, विटाभट्टी कामगार, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, फेरीवाले, रिक्षाचालक, शेतमजूर, मनरेगा मजूर, मासेमारी करणारे, इमारत व इतर बांधकाम कामगार, मध्यान्ह भोजन वर्कर्स, नाका कामगार आदी व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे सदर योजना ही देशभरात लागू असून या योजनेत १८ ते ४० वर्षापर्यंतचा कोणताही भारतीय नागरिक अर्ज करू शकतो.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)