चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात वाघासह वन्यप्राण्यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेऱ्याचे जाळे
चंद्रपूर :- महाऔष्णिक वीज केंद्र, ऊर्जानगर व दुर्गापूर परिसरातील वाघ, बिबटय़ा व अस्वल या हिंसक वन्यप्राण्यांचा संचार धोकादायक वळणावर आला आहे. वनखात्याला एका वाघाला जेरबंद करण्यात यश आले असले तरी वाघीण, दोन वाघ तिथे आहेत. त्यामुळे आवश्यक उपाययोजना म्हणून या वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ११३० कॅमेरे व थर्मल सेंसर लावण्यात येणार आहे. तसेच वीज केंद्र, वेकोलि तथा वन विभागाचे संयुक्त कृतिदल स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या उपाययोजना केल्या जात असल्या तरी लगतच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून वीज केंद्र परिसरात तथा चंद्रपूर शहरालगत वन्यप्राणी येणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. गेल्या आठवडय़ात वाघांनी दोघांचा बळी घेतला, जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष आता अतिशय धोकादायक वळणावर आला आहे. त्याचे प्रमुख कारण ताडोबा तथा लगतच्या जंगलातील वाघ, बिबटय़ा, अस्वल व इतर वन्यप्राणी थेट मानवी वस्त्यांमध्ये चंद्रपूर शहरात दाखल झाले आहेत. वन विभागाच्या माहितीनुसार, चंद्रपूर शहराच्या चौफेर दहा वाघ कायम भटकंती करत असतात, तर बिबटय़ा व अस्वलांचा वावरही वाढला आहे. चंद्रपूर वीज केंद्रात तर पाच ते सहा वाघ म्हणजे वाघाचे अख्खे कुटुंबच वास्तव्याला आहे. वीज केंद्रातून एक वाघ जेरबंद केला असला तरी त्यानंतरही कॅमेऱ्यात वाघीण व इतर वाघांनी दर्शन दिले आहे. या भागातून ये-जा करणाऱ्यांना बहुसंख्य वेळा वाघाने दर्शन दिले आहे. वीज केंद्र परिसरात आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. वीज केंद्र व वन विभागाने कायम उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वीज केंद्राच्या ११ हजार २३७ हेक्टर विस्तीर्ण परिसरात ७५ कोटी खर्च करून इंटीग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम बसवण्यात येत आहे.
या आधुनिक सुरक्षा व्यवस्थेत ११३० कॅमेरे व थर्मल सेंसर लावण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये थर्मल सेंसर लेन्स राहणार असून वन्यप्राणी दिसताच फोटोसोबतच निश्चित वेळ दाखवणार आहे. फोटो व वेळेचा संदेश वीज केंद्र व्यवस्थापन व अधिकाऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर संबंधित क्षेत्रात वन्यप्राणी असल्याचे तात्काळ सतर्क केले जाणार आहे. तसेच यामध्ये अलार्म व्यवस्थाही राहणार आहे. यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे. एका वर्षांत ही संपूर्ण आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्यात येणार आहे. तसेच येथे औद्योगिक सुरक्षा बलही तैनात करण्यात आले आहे. या आधुनिक सुरक्षा यंत्रणेमुळे सुरक्षितेव्यतिरिक्त इतर प्राण्यांची चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरात हालचाल असल्यास माहिती मिळेल. वन विभाग समितीने ठरवून दिल्यानुसार रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. वन विभागाने सुचवल्याप्रमाणे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरात १० वनमजूर गस्तीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत. मोरघाट नाल्याच्या दोन्ही बाजूंनी साफसफाई केली आहे. विद्युत केंद्राच्या वसाहत व केंद्र परिसरातून पट्टेदार वाघ, बिबटय़ा व इतर हिंसक प्राण्यांना जेरबंद करून इतरत्र हलवण्याबाबत वन विभागाला वेळोवेळी विनंती केली आहे.
वन विभागाने सुचवल्यानुसार वीज केंद्र परिसरात ७५ कोटी रुपये खर्च करून सक्षम एकत्रित सुरक्षा प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासोबतच वाघांपासून कामगारांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत. वीज केंद्र परिसरात वाघ, बिबटय़ा व अस्वलापासून सावध राहावे, अशा आशयाचे फलक, बॅनर, पोस्टर लावण्यात आले आहे.
- पंकज सपाटे, मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, चंद्रपूर
हल्लेखोर वाघ जेरबंद केला आहे. इतर वाघ तथा बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. मानवी सुरक्षा ही अग्रस्थानी आहे. वीज केंद्रात पाच ते सहा वाघ आहेत. त्यामुळे नेमका हल्लेखोर वाघ शोधून त्याला जेरबंद करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात असा प्रकार पुन्हा होऊ नये या दृष्टीने वन विभागाच्या वतीने नियोजन केले जात आहे. -
एन.आर. प्रवीण, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर
वनविभागाने वीज केंद्र व ऊर्जानगर परिसर तात्काळ 'नो टायगर झोन' घोषित करावा व त्या परिसरातील वाघांना पकडून त्यांचे दुसरीकडे पुनर्वसन करावे, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे व सेंसर सिस्टीम बसवावी तसेच आजूबाजूला वाढलेली झुडपे काढण्याचे काम तातडीने सुरू करावे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर इंटलीजंट कॅमेरा टेक्नॉलॉजी याचा अभ्यास करून असे कॅमेरे लावावे. या कॅमेऱ्यांमध्ये अशी व्यवस्था आहे की त्या कॅमे-याजवळ कुठलाही वन्यप्राणी आला तर त्याचा एसएमएस संबंधित आरएफओला जाईल व तिथे सायरन वाजण्यास सुरुवात होईल. ज्यामुळे त्या प्राण्याची येण्याची सूचना वनविभागाला व आसपासच्या नागरिकांना मिळेल.
मा. सुधीर मुनगंटीवार, माजी वनमंत्री तथा आमदार
वीज केंद्रात वाघ, बिबटय़ा व अस्वलांचा वावर बघता वीज केंद्र व्यवस्थापनाने ९०० मीटर सुरक्षा भतीचे काम तात्काळ करावे. संयुक्त कृतिदल स्थापन करावा. वीज केंद्र, ऊर्जानगर परिसरातील सात वाघ इतरत्र हलवण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा. औद्योगिक व मानवी वसाहतीत फिरणाऱ्या वन्य श्वापदांना पकडण्याचे अधिकार क्षेत्र संचालकांना द्यावे.
मा. बाळू धानोरकर, खासदार, चंद्रपूर
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या