ब्रेकिंग न्युज : युक्रेन-रशिया युद्धात भारतीय विद्यार्थ्याचा हकनाक बळी

Vidyanshnewslive
By -
0

ब्रेकिंग न्युज : युक्रेन-रशिया युद्धात भारतीय विद्यार्थ्याचा हकनाक बळी 

नवी दिल्ली : रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना तेथून भारतात आणण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. यातच आता युद्धात *नवीन शेखरप्पा* या भारतीय विद्यार्थ्याचा हकनाक बळी गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही दुजोरा दिला आहे. अरिंदम बागची यांनी ट्विटरव म्हटले आहे की, खारकीव्ह येथे आज सकाळी बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही अतिशय दु:खदायी घटना आहे. या मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात परराष्ट्र मंत्रालय आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांशी संपर्क साधला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. याचप्रकारची मागणी भारताच्या रशिया आणि युक्रेनमधील राजदूतांनीही केली आहे. दरम्यान, युक्रेनची राजधानी कीव्हमधून तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन भारतीय दूतावासाकडून अडकलेल्या भारतीय नागरिकांना करण्यात आले आहे. मिळेल त्या वाहनाने कीव्ह सोडा, असं दूतावासाकडून स्पष्ट करण्यात आल्यानं भीती वाढत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाला आदेश दिले आहेत. कीव्हमध्ये रशियाकडून हल्ला केला जाण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. अजूनही अनेक विद्यार्थी कीवमध्ये अडकले आहेत. पण दुतावासाच्या आवाहनामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या भारतातील कुटुंबीयांचीही चिंता वाढली आहे. मागील सहा दिवसांपासून केंद्र सरकाकडून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एअर इंडिया व इतर खासगी विमान कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास दीड हजार नागरिक परत आले आहेत. युक्रेनमधील स्थिती अधिकच विदारक होत चालल्याने आता ऑपरेशन गंगा या मोहिमेचा वेग वाढवला जाणार आहे. त्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घेतली जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत हवाई दलाला आदेश दिले आहेत. त्यानुसार हवाई दलाची सी-१७ ही विमाने आज रवाना होऊ शकतात. या विमानांमध्ये एकावेळी ४०० नागरिक बसू शकतात. तसेच इतर मदत साहित्यही नेले जाऊ शकते. दरम्यान, भारताने आतापर्यंत सात विमानांमधून जवळपास दीड हजार नागरिकांना मायदेशी परत आणले आहे. तसेच जवळपास आठ हजारांहून अधिक भारतीयांना युक्रेन सोडलं आहे. अजूनही अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांनी सुरक्षित शहरांमध्ये जाण्याचे आवाहन यापूर्वीच दुतावासाकडून करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच युक्रेन सरकारने पश्चिम भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. पण आता दुतावासाच्या आवाहनामुळे भारतीयांनाही या युध्दाचा धोका वाढल्याचे संकेत मिळत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)