नागपुरात पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याचा प्रयोग ? नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी रिपाई चे १३ गट एकत्र : वंचित बहुजन आघाडीला ही सहभागी होण्याचे आवाहन !

Vidyanshnewslive
By -
2

नागपुरात पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याचा प्रयोग ?  नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी रिपाई चे १३ गट एकत्र : वंचित बहुजन आघाडीला ही सहभागी होण्याचे आवाहन !

नागपूर : महापालिका निवडणुकीत कधीकाळी रिपब्लिकन पक्ष हा गजराजासारखा उभा होता. परंतु, गटांतटात विभागल्याने रिपाइं आघाडीची शक्ती कमी झाली. यामुळे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शक्ती दाखविण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय १३ रिपाइं गटानी घेतला आहे. तसेच भारतीय जनता आणि कॉंग्रेससोबत युती करण्यापेक्षा स्वतंत्र लढण्यासाठी सर्वांनी एकत्र लढण्याचे आवाहन करण्यात आले. रिपब्लिकन जनतेचा उमेदवार देण्यासाठी १३ रिपब्लिकन गटांची एकत्र मोट बांधली आहे. भाजप कॉंग्रेससोबत आता युती करून लढणार नाही. मात्र, आंबेडकरी विचारांच्या पक्षांनी या संयुक्त आघाडीत सामील होऊन संघटीत पणे लढू या, असे आवाहन करून २४ प्रभागात ७५ उमेदवार लढवण्याचा निर्धार संयुक्त रिपब्लिकन आघाडीने पत्रकार परिषदेत केला आहे. रिपब्लकन नेत्यांनी नागपूर सयुक्त रिपब्लिकन आघाडीला साथ देण्याचा आणि स्वतंत्र शक्ती दाखवण्याची संधी असेल तर एकत्र यावे, असे सुतोवाच केले. तसेच 'एकत्र व्हा, एकत्र लढा' अशी मागणी जनतेमधून जोर धरत आहे. आघाडीत नव्याने रिपब्लिकन सेक्युलर, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी रिपब्लकन पक्ष सहभागी झाले आहेत. आघाडीत सहभागी होण्यासाठी वंचितशी संपर्क साधण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला खोरिपाचे अमृत गजभिये, दिनेश गोडघाटे, दिनेश अंडरसहारे, प्रकाश कुंभे, यशवंत तेलंग, प्रा. राहूल मून, प्रा.प्रदीप बोरकर, बाळूमामा कोसरकर, विनोद थुल, राजन वाघमारे, निरंजन वासनिक, अशोक बोंदाडे, विश्वास पाटील, शेषराव गणवीर, अशोक भिवगडे, मनोज मेश्राम, निलेश टेंभूर्णे, दीपक डोंगरे, सुधाकर ढवळे, कृष्णा पाटील महेंद्र सोनारे, सुनील इलमकर, रामदास गजभिये, गोपीचंद अंभोरे, यांच्यासह अनेक गटांचे प्रमुख कार्यकतें उपस्थित होते. ११ नगरसेवक आले होते निवडून २००७ मध्ये शहरातील सर्व रिपब्लिकन्स एकत्र आल्यानंतर ९ नगरसेवक व २ समर्थित असे एकूण ११ नगरसेवक निवडूण आले होते. त्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार, असा दावा यावेळी केला. समाजात या एकत्रिकरणाचे स्वागत होत आहे. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना या पक्षांसोबत युती करण्यात येणार नाही, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर कार्यकर्त्यांची उत्तर नागपुरातील टेकानाका येथील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात २६ फेब्रूवारीला कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. सर्व गटनेत्यांना आमंत्रित करण्यात आले असून निवडणूकीचा शंखनाद करण्यात येईल. रिपब्लिकन जनसंपर्क अभियान सुरू करण्यात येईल, असे रिपाई नेते भूपेश थुलकर यांनी सांगितले. एकंदरीत नागपुरात पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याचा प्रयोग राबविण्यात असला तरी येणाऱ्या काळात रिपाई च्या १३ गटांच व यात सहभागी होण्याऱ्या पक्षांचं ऐक्य किती काळ टिकून राहील हे पाहणे ओसुत्याचे ठरेल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

2टिप्पण्या

  1. नागपुर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने रिपाई चे नागपूरातील 13 गट एकत्रित येउन नागपूर महानगरपालिका लढवू इच्छीतात.ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे. मात्र हे किती दिवस टिकनार ह्याचा कांहीच भरोसा नहीं. धन्यवाद!👍

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा