मोठी कारवाई ! किडनी रॅकेटचे जाळे उघड ; चंद्रपूर पोलिसांना आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात मोठे यश (Major action! Kidney racket network exposed; Chandrapur police achieve great success in uncovering an international gang.)

Vidyanshnewslive
By -
0
मोठी कारवाई ! किडनी रॅकेटचे जाळे उघड ; चंद्रपूर पोलिसांना आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात मोठे यश (Major action! Kidney racket network exposed; Chandrapur police achieve great success in uncovering an international gang.)

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात राहणाऱ्या एका गरीब शेतकऱ्याच्या तक्रारीतून सुरू झालेला तपास आता देशभर पसरलेल्या आंतरराष्ट्रीय किडनी विक्री रॅकेटचा मोठा पर्दाफाश करत आहे. सावकारी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या रोशन कुडे या शेतकऱ्याने कंबोडियात जाऊन आपली किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सुरुवातीला हा गुन्हा केवळ कंबोडियाशी संबंधित असल्याचे वाटत होते, मात्र तपास पुढे जाताच भारतातील नामांकित रुग्णालये, डॉक्टर आणि दलालांची साखळी उघड झाली आहे. या प्रकरणात रोशन कुडे हा पीडित शेतकरी असून, चंद्रपूर पोलिसांनी क्रिष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू आणि हिमांशु भारद्वाज या दोन आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हिमांशु भारद्वाज याने स्वतःची किडनीदेखील याच रॅकेटमार्फत विकल्याची माहिती समोर आली आहे. तपासात काही नामांकित डॉक्टर आणि रुग्णालयांची नावेही पुढे येत आहेत. 
            या रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रातील चंद्रपूरपासून थेट कंबोडिया, तामिळनाडू आणि दिल्लीपर्यंत पसरले आहेत. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) एक पथक सध्या तामिळनाडूमधील स्टॉर किम्स हॉस्पिटलमध्ये संचालक डॉ. राजरत्नम यांच्या शोधात आहे, तर दुसऱ्या पथकाने दिल्लीतून डॉ. रविंद्रपाल सिंग यांना ताब्यात घेतले आहे रोशन कुडे याने कर्ज फेडण्यासाठी काही काळापूर्वी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याचे उघड झाले. अलीकडेच तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाला गती मिळाली असून, न्यायालयाने डॉ. रविंद्रपाल सिंग यांना 2 जानेवारी 2026 रोजी चंद्रपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दलालांमार्फत पीडितांना परदेशात नेले जाते, बनावट नातेवाईक दाखवून प्रत्यारोपण केले जाते आणि या प्रक्रियेत मोठी आर्थिक उलाढाल होते. तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल्स आणि कागदपत्रांच्या आधारे चंद्रपूर पोलिसांनी या रॅकेटची साखळी उलगडण्यास सुरुवात केली आहे. एका शेतकऱ्याच्या तक्रारीतून सुरू झालेला हा तपास आता देशातील किडनी प्रत्यारोपण क्षेत्रातील मोठ्या गैरव्यवहारावर प्रकाश टाकत आहे. या प्रकरणात आणखी कोणकोणती मोठी नावे समोर येतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)