भीमा कोरेगावची लढाई म्हणजे शौर्याचा रणसंग्राम, पेशवे साम्राज्याची अखेरची रात्र (The Battle of Bhima Koregaon was a battle of valor, the final night of the Peshwa empire.)
वृत्तसेवा :- नोहेंबर १८१७ रोजी पेशवा दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यात खडकी येथे लढाई झाली, आणि बाजीराव पेशव्याची महाराष्ट्रावर असलेली जुलमी सत्ता पुढे लवकरच अल्पावधीत संपुष्टात आली. हे युद्ध होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ३१ डिसेंबर १८०२ रोजी पेशवे व ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेला तह बाजीरावाने मोडला. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बडोद्याच्या गायकवाडांना पेशवे काही देणे लागत होते. त्यासंबंधाने इंग्रजांच्या संरक्षणाखाली पेशव्यांशी बोलणी करण्याकरीता गंगाधरशास्त्री हे वकील म्हणून पुण्याला आले. परंतु, त्यांचा पंढरपूर येथे संशयास्पदरीत्या खून झाला. हा खून बाजीराव पेशव्याच्या सांगण्यानुसार त्रिंबकजी डेंगळे यांनी केला, असे गायकवाडांच्या वतीने इंग्रजांनी आपले म्हणणे मांडले व त्रिंबकजी डेंगळेला पकडून ठाण्याच्या तुरुंगात त्यांनी ठेवले. परंतु तो तेथून पळाला. त्याला पकडून आपल्या ताब्यात देण्यास बाजीराव पेशवा टाळाटाळ करीत आहे, असे वाटल्याने ८मे१८१७रोजी इंग्रजांनी पुण्याला आपल्या सैन्याचा वेढा दिला. त्यावेळी नाईलाजास्तव बाजीरावास इंग्रजांशी दि.१३ जून १८१७ रोजी तह करून इंग्रजांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागल्या. या तहास ' पुण्याचा तह 'असे म्हटले जाते. या तहाने पेशव्यांचा फार मोठा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला. तहानुसार इंग्रजांनी पेशव्यांसाठी प्रशिक्षित केलेली आपली पलटण परत घेतली. अशा प्रकारे, या तहाने इंग्रजांची सत्ता वाढत गेली व पेशव्यांची सत्ता कमी होऊ लागली.ही बाब बाजीरावाच्या मनाला लागून राहिली व त्यासाठी तो मार्ग शोधू लागला. या कामी त्याने हैदराबादहून त्याला भेटण्यास आलेला निजामाचा वकील सर जॉन माल्कम याचा सल्ला घेतला असता, पेशव्यांनी इंग्रजांशी इमानेइतबारे वागून नेहमी त्यांना मदत व सहकार्य करावे, असा सल्ला दिला. त्याप्रमाणे उत्तर भारतातील पेंढाऱ्यांचे बंड मोडून काढण्याच्या कामी इंग्रजांना मदत करण्यासाठी बाजीराव सैन्य ठेवू लागला. परंतु, पेशव्यांच्या पुणे दरबारात असलेला इंग्रजांचा रेसिडेंट एल्फिन्स्टन याचा मात्र बाजीरावावर विश्वास नसल्याने, बाजीराव हा नवीन सैन्य जमवून आपल्यावर हल्ला करीन, असा एल्फिन्स्टन याचा समज झाला. बाजीरावाच्या लष्कराची छावणी पुण्यातच गारपिराच्या आसपास पडू लागली. परंतु, गारपिरावर कर्नल बर याच्या कमांडखाली इंग्रजांच्या पलटनी अनेक दिवसांपासून आपला तळ ठोकून होत्या. या इंग्रजी लष्करात नेटिव्ह इन्फन्ट्रीच्या सहाव्या, आणि सातव्या रेजिमेंटमधील मिळून १२०० शिपाई होते व त्यांच्याकडे दोन तोफाही होत्या. हे सर्व लष्कर सध्या जिथे पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय आहे, त्याच्या सभोवतालचा परिसर, म्हणजेच गारपिरावर होते. इंग्रजांच्या या छावणीच्या सभोवताली पेशव्यांच्या लष्करी छावण्या येऊन पडल्या. व गोसावी लोकांच्या छावण्या वानवडीच्या मैदानावर उतरल्या. त्याचप्रमाणे संगमावरील रेसिडेंट मि. एल्फिन्स्टन याचा बंगला व भांबुर्डे गावच्या (सध्याचे शिवाजी नगर) दरम्यान विंचूरकरांचे घोडदळ, पायदळ आणि तोफखाना यांचा तळ येऊन पडला. अशा प्रकारे इंग्रजांची फौज ही पेशव्यांच्या लष्कराकडून हळूहळू चोहोबाजूंनी वेढली गेली.अशा रीतीने पेशव्यांच्या सैन्याची जय्यत तयारी झाल्यानंतर, इंग्रजांच्या छावणीवर ताबडतोब हल्ला चढवावा,असे सरदारांचे मत होते, परंतु बाजीरावाने हा बेत रहित केला.
पेशवे व इंग्रज यांनी एकमेकांस आदेश पाठविले की, जमवाजमव केलेले सैन्य त्यांनी दूर पाठवून द्यावे, अन्यथा परिणामास तयार राहावे.इंग्रजांकडून मेझर फोर्ड व पेशव्यांकडून विठोजी नाईक यांनी हे निरोप परस्परांना दिले. तथापि, दोन्हीकडूनही हे म्हणणे मान्य न केले गेल्याने पेशव्यांचे सैन्य खडकीस इंग्रजांवर हल्ल करण्यासाठी ५ नोव्हेंबर १८१७ रोजी दुपारी ३ वाजता पुण्यातून बाहेर पडले. रेसिडेंड मि. एल्फिन्स्टन हा संगमावरील आपल्या रेसिडेन्सिमधून आपल्या ५०० सैन्यासह खडकीला सुरक्षित पोहचला व त्याने ताबडतोब लढाईस सुरुवात करण्याचे आदेश दिले व दापोडी येथे मेजर फोर्डलाही आपल्या सैन्यासह खडकीच्या सैन्याला येऊन मिळण्याचा तातडीचा निरोप पाठविला.मराठ्यांचे पायदळ , घोडेस्वार तोफा वगैरे सर्व लष्कर चतु:श्रुंगीजवळ गणेशखिंडीच्या डोंगरापासून, संगमावरील रेसिडेन्सिच्या जागेपर्यंत मधल्या मैदानात चोहोकडे पसरले होते.त्यात बापू गोखले, मोरे , दीक्षित, मराठे, चिंतामणराव पटवर्धन , तासगांवकर, मिरजकर, आप्पाजी पाटणकर,घोरपडे, पुरंदरे, राजेबहाद्दर व अक्कलकोटवाले इ. राजे व सरदार होते.पेशव्यांची फौज फारच मोठी होती. त्यामानाने इंग्रजांचे लष्कर लहान असून, ते कर्नल बर याच्या नेतृत्वाखाली पेशव्यांच्या सैन्याला खडकीच्या मैदानावर तोंड देण्यासाठी सज्ज झाले होते. इंग्रज सैन्याच्या मध्यभागी युरोपियन पलटन,रेसिडेंटने आपल्याबरोबर आणलेले शिपाई आणि सहाव्या रेजिमेंटच्या दुसऱ्या बटालियनपैकी एक तुकडी , तसेच मुळा नदीच्या बाजूला सातव्या रेजिमेंटची पहिली बटालियन , तर खडकी गावाजवळ पहिल्या रेजिमेंटपैकी दुसरी बटालियन होती. आणि दोन्ही टोकाला एक एक तोफही होती.दापोडीहून खडकीकडे आगेकूच करीत असलेल्या मैजर फोर्डच्या सैन्याला खडकीपर्यंत जाऊ न देण्यासाठी पेशव्यांचे मुख्य प्रधान, मोरे, दीक्षित व रास्ते त्या दिशेला वळले.त्यांनी मेजर फोर्डवर हल्ला करण्याचे ठरवले. मोरे, दीक्षितांचे घोडेस्वार मेजर फोर्ड याच्या उजव्या बाजूच्या शिपायांजवळ येत चालले आहेत, असे पाहून व पेशव्यांचे स्वार आपल्या माऱ्याच्या टप्प्यात आले असल्याचे पाहून मेजर फोर्ड याने आपल्या बटालियनला तोफांमधून व बंदुकीतूनगोळीबार सुरू करण्याविषयी हुकूम दिला.त्यामुळे मोरे व दीक्षितांचे सैन्य खडकीच्या बाजूला वळले. तेथेही त्यांच्यावर तोफगोळ्यांचा भडीमार झाला. त्यात मोरे व दीक्षित तोफगोळा लागल्याने ठार झाले.त्यामुळे त्यांच्या सैन्यात धांदल उडाली व सैन्य मागे फिरले . मेजर फोर्ड च्या मार्गातील अडथळा दूर झाल्यामुळे तो कर्नल बर यांच्या सैन्याला येऊन मिळाला. पेशव्याकडील अरब व गोसावी यांनी सातव्या रेजिमेंटची पहिली बटालियन व सहाव्या रेजिमेंटची दुसरी बटालियन यांच्यावर हल्ला चढविला या हल्ल्याचे नेतृत्व पेशव्यांच्या सैन्यातील पोर्तुगिज सेनापती डी. पिंटो याच्याकडे होते. परंतु, तो या हल्ल्यामध्ये ठार झाल्याने इंग्रज सैन्य प्रतिहल्ल्यासाठीपुढे सरसावले .पम कर्नल बर याने त्यांना थांबविले व गोळीबार करण्याचा आदेश दिला. बापू गोखले हा यशस्वीरीत्या पुढे घुसला . परंतु त्याचा घोडा जखमी झाल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली. त्यावेळी त्याच्या मागे असलेले दुसरे सरदार पुढे सरसावले,व त्यांनी आपल्या सैन्याची जोरदार मुसंडी मारली. पुढे त्यांना दलदल व चिखलाने भरलेला खोल ओढा लागला व ते या दलदलीच्या चिखलात एका पाठोपाठ एक असे येऊन पडले.अशा प्रकारे या लढाईत हल्ले-प्रतिहल्ले होत राहिले.यात दोन्हीकडचे अनेक सैनिक ठार झाले, तर कित्येक जखमी झाले. ही लढाई चालू असतांना हळू हळू अंधार पडू लागल्याने संध्याकाळी सातच्या सुमारास ही लढाई संपली व पेशव्यांचे सैन्य पुणे शहराकडे परत गेले.पेशव्यांचे सैन्य माघारी फिरल्यानंतर मेजर फोर्ड हा देखील आपल्या सैन्यासह दापोडील परतला. आणि कर्नल बर हा आपल्या ब्रिगेडसह कूच करून रात्री आठ वाजता खडकी येथील आपल्या छावणीत परतला. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला असला, तरी इंग्रजांचे संपूर्णपणे वर्चस्व राहिले नाही पुढील आठ दिवस दोन्हीकडूनही कसलीच कारावाई झाली नाही. परंतु या कालावधीत इंग्रजांनी मात्र आपल्या पलटणींची जय्यत तयारी करून घेतली. नदीच्या उतारवाटेने पलिकडे जाणाऱ्या इंग्रज सैन्याला प्रतिबंध करण्याकरता पेशव्यांच्या काही सैन्याने अडथळे नदीच्या पात्रात निर्माण केले होते. या सैन्यात अरबांचे घोडेस्वार होते. त्यामुळे पेशव्यांचे आणखी काही सैन्य त्यांच्या मदतीला धावून आले व इंग्रज आणि पेशवे सैन्यात नदीपात्रातच काही चकमकी झडल्या. तथापि, पेशव्यांच्या या हल्ल्याला न जुमानता इंग्रज सैन्य नदी ओलांडून पैलतीरावर पोहचले. इंग्रज सैन्याच्या या भागाचा प्रमुख लेफ्टनंट कर्नल मिलने हा होता.या सैन्यात मुंबईची युरोपियन पलटन, रेसिडेंटच्या तैनातीतील सैन्य आणि पहिल्या, सहाव्या व सातव्या नेटिव्ह पलटनीतील एक एक बटालियन होती. हे सैन्य १६ नोव्हेंबर १८१७ रोजी मध्यरात्री पैलतीरावर पोहचले. त्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ रोजी पहाटे जनरल स्मिथ याच्या छावणीतील सैन्य संगमाजवळच्या नदीतील उतारवाटेने पलिकडे पुण्याला पेशव्यांच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी निघाले.अशा रितीने इंग्रजांची एकत्र आलेली दोन्ही सैन्ये वेगवेगळ्या बाजूने पेशव्यांच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी निघाली.परंतु,हे सैन्य जेव्हा गारपिराकडे आले, पेशव्यांचे सैन्य आपला तळ उठवून रात्रीतून कूच करून तेथून निघून गेले होते. त्यामुळे १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्याच दिवशी तिसरे प्रहरी म्हणजेच दुपारी तीन वाजता शनिवारवाड्यावरील पेशव्यांचा भगवा जरीपटका खाली उतरवून, इंग्रजांचा युनियन जँक शनिवारवाड्यावर फडकावला. लेफ्टनंट कर्नल फिल्समन याने हा तातडीचा संदेश प्राप्त होताच, पुण्याला सैनिकी मदत पाठविण्याचा निर्णय त्वरीत घेतला व त्यासाठी ' सेकंड बटालियन ऑफ दि फर्स्ट रेजिमेंट ऑफ बाँम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री ' ची खास निवड केली. कारण, या बटालियनमधील बहुतांश सैनिक हे लढवय्ये महार सैनिक होते. कॅप्टन फ्रान्सिस स्टाँटन हा या महार सैन्यासह ३१ डिसेंबर १८१७ रोजी रात्री आठ वाजता शिरुर येथून खास कर्नल बर च्या मदतीसाठी निघाला. त्याच्या नेतृत्वाखाली ' पहिल्या बाँम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनचे ' ५०० पायदळ सैनिक, ' पूना इर्रेग्युलर हॉर्स ' चे २५० घोडदळ सैनिक, २ सहा पौंडी तोफा घेतलेले ' मद्रास तोफखान्या ' चे २४ युरोपियन्स गनर्स इतके सैन्य होते. युरोपियन्स सैनिकांचे नेतृत्व लेफ्टनंट चिशोलम याचेकडे होते. २७मैलांचा , थंडीतील रात्रीचा पायी प्रवास करून कॅप्टन स्टाँटन आपल्या सैन्यासह १जानेवारी १८१८ रोजी,नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजता भीमा कोरेगांव येथील भीमा नदीच्या पूर्व तीरावर येऊन पोहचला. सतत दहा तासांच्या अविश्रां प्रवासामुळे त्याचे सैन्य अतिशय थकले होते.
कोरेगांवलगतच्या टेकडीवरून सभोवताली पाहिल्यानंतर त्याला पेशव्यांचे प्रचंड सैन्य दिसले. टेकडीच्या पलीकडे, भीमा नदीच्या पश्चिम तीरावर किनाऱ्याच्या काठाने, सभोवताली पेशव्यांचे अफाट सैन्य लढाईच्या जय्यत तयारीनीशी उभे ठाकले होते. पेशव्यांच्या सैन्यात २३ हजार घोडदळ व ५ हजार पायदळ, असे २८,००० सैन्य होते. त्यात गोसावी, अरब व मराठे होते आणि त्या सैन्याचे नेतृत्व पेशव्यांचा कसलेला व अनुभवी सेनापती बापू गोखले हा करीत होता.या प्रचंड सैन्यापासून आपला बचाव होणे शक्य नाही, असे स्टाँटनला वाटले.परंतु , पेशव्यांच्या अफाट सैन्याला पाडाव करण्याचा ठाम निश्चय करुन, त्यांना हुलकावण्या देत कोरेगांवात त्याने प्रवेश केला. या गावाला त्यावेळी मातीचे गांवकुस होते. गावातील घरे, आणि गावाला असलेले गांवकुस यामुळे पेशव्यांच्या घोडदळाला गावात शिरून लढाई करणे अशक्य होईल, याची कल्पना आल्यामुळे कॅप्टन स्टाँटन याने संपूर्ण कोरेगांव ताब्यात घेतले. गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या गढीच्या बुरूजावर तोफा चढवून, तसेच गावातील गल्ली-बोळांच्या रस्त्यांतून आपल्या मूठभर सैन्याची व्यूह रचना करून त्याने पेशवा सैन्यावर तोफ डागून आपण या लढाईस तयार असल्याचे सूचित केले. काही वेळातच त्याच्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी पेशवा सैन्याने भीमा नदी उतरून कोरेगांव भोवती चोहोबाजूने गराडा घातला. बरेचसे सैन्य गर्दी करून गावात शिरण्यास यशस्वी झाले व लढाईस सुरुवात झाली. सुरुवातीस इंग्रजांनी आपल्या तोफा गढीच्या बुरुजावर चढविल्याने, त्यांचा वापर गावात शिरलेल्या पेशवे सैन्यावर त्यांना करता येईना. म्हणून त्या तोफा मोठ्या मुश्किलीने पुन्हा खाली आणून, नदीच्या बाजूस असलेल्या दरवाजाने त्यातून इंग्रजांनी पेशवे सैन्यावर त्यांचा मारा सुरू केला. त्या माऱ्याने पेशव्यांकडील बरेच सैन्य ठार झाले. या लढाईत इंग्रजांकडून लढणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या रेजिमेंटच्या एकूण ५० सैनिकांना वीर मरण आले, तर २०५ सैनिक जखमी झाले. त्यापैकी इंग्रजांना हे युद्ध जिंकून देण्यास ज्यांनी अति पराक्रम करून आपल्या जीवनाचे बलिदान दिले, अशा २३ महार सैनिकांची नावे, त्यांच्याबद्दल अतीव कृतज्ञता बाळगून, या युद्धात पहिल्या महार सैनिकाला जेथे लढतांना हौतात्म्य प्राप्त झाले, बरोबर त्याच ठिकाणी ३३×३३फूटांच्या चबुतऱ्यावर ६५ फूट उंचीचा, घडीव दगडांचा सूच्याकार स्तंभ उभारून, त्यावर संगमरवरी फलकावर कायम स्वरुपी कोरून त्यांची स्मृती जतन करून ठेवली आहे. कोरेगांवच्या या लढाईत धारातीर्थी पडलेले, व जखमी झालेले ते शूर वीर महार सैनिक, ) १)सोननाक कमलनाक - नाईक.
२) रामनाक येसनाक - नाईक.
३) गोंदनाक कोढेनाक - शिपाई.
४) रामनाक यसनाक - शिपाई.
५) भागनाक हरनाक - शिपाई.
६) अंबरनाक काननाक - शिपाई.
७) रूपनाक लखनाक - शिपाई.
८) गणनाक बाळनाक - शिपाई.
९) काळनाक कोंडनाक - शिपाई.
१०) वपनाक रामनाक - शिपाई.
११) विटनाक धामनाक - शिपाई.
१२) राजनाक गणनाक - शिपाई.
१३) वपनाक हरनाक - शिपाई.
१४) रैनाक वाननाक - शिपाई.
१५) गणनाक धरमनाक -शिपाई
१६) देवनाक आमनाक - शिपाई.
१७) गोपाळनाक बाळनाक -शिपाई.
१८) हरनाक हिरनाक - शिपाई.
१९)जेठनाक दैनाक - शिपाई.
२०) गणनाक लखनाक - शिपाई.
जखमी झालेले वीर सैनिक -
१) जाननाक हिरनाक - शिपाई.
२) भीकनाक रतननाक - शिपाई.
३) रतननाक धाकनाक -शिपाई.
या महार सैनिकांच्या पराक्रमाची गौरवगाथा संपूर्ण जगाला कळावी, म्हणून त्यांच्या या महान पराक्रमाबद्दल भीमा कोरेगांवच्या या विजयस्तंभावर इंग्रजीत पुढील प्रमाणे गौरववाक्य लिहिलेले आहे -
" One of the proudest triumphs of the British Army in the East " .
संकलन :- मा. अशोक नगरे, पारनेर, जि. अहमदनगर.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या