चंद्रपूर :- भरघोस गुणांसह राष्ट्रीय मानांकन प्राप्त करणा-या दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन पाहणी केली. संस्थेचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढविल्याबद्दल अधिकारी व कर्मचा-यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच जिल्यातील इतर आरोग्य संस्थांनी सुद्धा राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन समितीचे (एन.क्यू.ए.एस.) मानांकन पात्र होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल मुनेश्वर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित जैस्वाल यांच्यासह केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य क्षेत्रात गुणवत्तेचे अनन्यसाधारण महत्व असते. या गुणवत्तेचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्याकरिता अनेक पद्धती आहेत. त्यापैकी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन समितीचे (एन.क्यू.ए.एस.) मानांकन हे सर्वोत्कृष्ठ मानले जाते. या मानांकन प्राप्त आरोग्यसंस्थेद्वारे रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात येतात. आयुष्मान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापूरला (NQAS) मार्फत केल्या गेलेल्या मुल्याकंनामध्ये मानांकन प्राप्त झालेल आहे. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक मध्ये आरोग्य संस्थेत एकूण 6 विभाग असतात. यात बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, प्रसूती विभाग, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, प्रयोगशाळा विभाग, सामान्य प्रशासन विभाग याचा समावेश आहे. या प्रत्येक विभागामध्ये किमान 70 टक्के गुणांकन प्राप्त करणे अत्यावश्यक असते. यामध्ये आधी राज्य पातळीवर यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर मुल्यांकन करण्यात येते. मूल्यांकनामध्ये प्रा. आ. केंद्र, दुर्गापूर ला 94.64 टक्के गुणांकन मिळून जिल्यामध्ये एन.क्य.ए.एस. पात्र संस्थेचा प्रथम मान मिळाला.
सध्यस्थितीत चंद्रपूर जिल्यातील 11 आरोग्य संस्था राज्य पातळीवर एन.क्यू.ए.एस. साठी पात्र झाल्या असून त्यापैकी 3 संस्थांचे राष्ट्रीय पातळीवर मुल्याकंन पूर्ण झाले आहे. प्रा. आ. केंद्र, गंगालवाडी आरोग्य संस्था अटी व शर्तीच्या अधीन राहून पात्र ठरलेली आहे. तसेच प्रा. आ. केंद्र, नांदा फाटा या संस्थेचे राष्ट्रीय पातळीवर मुल्याकंन पूर्ण झाले असून निकाल लागायचा आहे. उर्वरित ८ आरोग्य संस्था - प्रा. आ. केंद्र राजोली (मुल), कळमना (बल्लारपूर), नेरी (चिमूर), वाढोणा (नागभीड), नवेगाव पांडव (नागभीड), बाळापुर (नागभीड), मोहाडी नलेश्वर (सिंदेवाही), माढेळी (वरोरा) यांचे NQAS मूल्यमापन माहे नोव्हेंबर मध्ये होण्याचे नियोजित आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी कळविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या