निवडणूकीची घोषणा पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यात नगरपालिका निवडणुकीची शक्यता, 15 ते 20 जानेवारीदरम्यान राज्यात महापालिकांची रणधुमाळी (Election announcement: Municipal elections likely to be held in the first phase next week, municipal elections in the state to be held between January 15 and 20)

Vidyanshnewslive
By -
0
निवडणूकीची घोषणा पुढील आठवड्यात पहिल्या टप्प्यात नगरपालिका निवडणुकीची शक्यता, 15 ते 20 जानेवारीदरम्यान राज्यात महापालिकांची रणधुमाळी (Election announcement: Municipal elections likely to be held in the first phase next week, municipal elections in the state to be held between January 15 and 20)

मुंबई :- प्रभाग रचना, इतर मागासवर्गांचे आरक्षण यांसारख्या विविध मुद्द्यांवरून गेली अनेक वर्षे रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तसेच महापालिकांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त सापडला आहे.  पुढील आठवड्यात 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती आदींच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून देण्यात आली. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. 
          मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ ते २० जानेवारी २०२६ च्या आत घेण्याचा आयोगाचा प्रयत्न राहणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदतकार्यात गुंतलेली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. दरम्यान, राज्यात प्रथमच मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (ईव्हीएम) तुटवडा भासू नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मशिन पुरवठ्यासाठी मध्य प्रदेश सरकारशी करार केला आहे. याशिवाय 'इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'कडून ५० हजार ईव्हीएम खरेदी केली आहेत. तसेच भारत निवडणूक आयोगाकडेही 'ईव्हीएम'ची मागणी करण्यात आल्याचे समजते. जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ची मुदत दिली आहे. निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी १० दिवस आधी पार पाडल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. तिन्ही टप्प्यांत पार पडणाऱ्या या निवडणुकांतील मतांची मोजणी एकत्रित होणे शक्य नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रत्येक टप्प्यातील निवडणुकांची मतमोजणी दुसऱ्या दिवशी होईल. निवडणूक यंत्रणेवरील ताण आणि मर्यादित मनुष्यबळ लक्षात घेता प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर मतमोजणी होईल, असेही खात्रीलायकरित्या समजते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)