नगराध्यक्ष पदासाठी ५५ इच्छुकांच्या मुलाखती तर भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 14 नोव्हेंबरला ठरण्याची शक्यता (Contest for candidacy in Congress Interviews of 55 aspirants for the post of Mayor, BJP's candidate for Mayor likely to be decided on November 14)
चंद्रपूर :- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा पहायला मिळत आहे. दहा नगरपालिका व एक नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी ५५ इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी मुलाखती दिल्या, तर ६०० इच्छुक उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज केले आहेत. दाताळा येथील साईराम सभागृहात नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. यानंतर काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा प्रभारी आमदार अभिजित वंजारी, जिल्हा निरीक्षक मुजीब पठाण, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, प्रवीण पडवेकर यांनी उमेदवारांचा ओघ बघता काँग्रेससाठी पोषक वातावरण असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले. पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी राहणार, की नाही हा प्रश्न होता. मात्र, आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे आम्ही स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे तसेच इतर मित्रपक्षांशी आघाडी केली आहे. मनसे समविचारी पक्ष नाही. तसेच मनसेकडून आघाडीचा प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे तूर्त मनसेसंदर्भातील निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार असलो तरी वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात सर्व बाबी स्पष्ट होतील, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. नगराध्यक्षपदासाठी प्रत्येक पालिकेतून सात ते आठ इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत. घुग्घुस, बल्लारपूर, ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक इच्छुक आहेत. नगरसेवकपदासाठी शनिवारपासून नगरपालिका स्तरावर मुलाखतींना सुरुवात होत आहे. मुलाखतींचा सोपस्कार पार पडल्यानंतर १२ व १३ नोव्हेंबरला काँग्रेस निवड मंडळाची बैठक होईल. तिथे अंतिम निर्णय होईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. खासदार धानोरकर यांनीही महाविकास आघाडीसाठी सकारात्मक वातावरण असल्याचा विश्वास व्यक्त केला. जिल्हा प्रभारी वंजारी यांनी मुलाखतींचा कार्यक्रम अतिशय योग्य पद्धतीने पार पडल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष धोटे यांनी नगराध्यक्षपदासाठी ५० ते ५५ इच्छुक उमेदवार असल्याने स्पर्धा वाढली असल्याची माहिती दिली. राजुरा पालिकेत नगराध्यक्षपदासाठी केवळ दोन इच्छुक उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार १४ नोव्हेंबरला ठरणार राज्यातील नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार १४ नोव्हेंबरला घोषित केले जाणार आहे. भाजपने यापूर्वीच संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्या. मावळत्या पालिका सत्तेत अनेक ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष राहून चुकले. परिणामी आता हेच यश कायम राखण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे असेल. त्याची प्रमुख जबाबदारी भाजपचे आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण दैवतळे, बंटी भांगडिया यांच्यावर आहे. त्यामुळे अपेक्षित निकाल द्यावाच लागणार, असा दबाव आहेच. तूर्त प्रदेश प्रतिनिधीने मुलाखती आटोपल्यानंतर आता जिल्ह्यांतर्गत मुलाखत सुरू झाल्या आहेत १४ नोव्हेंबरला बहुतांश उमेदवार घोषित होतील, पण वाद असलेल्या ठिकाणी एक-दोन दिवस उशीर होऊ शकतो.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या