चंद्रपूर :- देशाच्या अखंडतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वॉक फॉर युनिटी या विशेष पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही शौर्य, सेवा आणि एकतेचा संदेश देणारी रॅली शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ः३० वाजता भव्य स्वरूपात पार पडणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पटेल हायस्कुल समोरून होणार असून रॅली पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे समाप्त होईल, पोलीस अधिकारी/अंमलदार, एनसीसी कॅडेट, एनएसएस विद्यार्थी, इतर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध समाजसेवी संघटना तसेच नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे. कार्यक्रमाचा मुख्य हेतू राष्ट्रीय एकता, सामाजिक सौहार्द आणि देशप्रेमाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे, सरदार वल्लभभाई पटेलांच्या विचारांप्रमाणे, अखंड भारताची भावना जनमानसात रुजवणे हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था व विविध शासकीय कार्यालयांना आवाहन करण्यात येते की, राष्ट्रीय एकतेच्या या पवित्र यात्रेत पाऊल टाका, कारण भारताची शक्ती त्याच्या एकतेत आहे. या दिवशी सर्व सहभागींच्या हातात तिरंगा आणि मुखी एकच घोषवाक्य असेल - राष्ट्रीय एकतेसाठी चालूया...! या कार्यक्रमातून नागरिकांना एकतेचा, सामूहिक जबाबदारीचा आणि देशहिताचा संदेश देण्यात येईल. सरदार पटेलांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन, पोलीस दल आणि समाज यांच्यातील बांधिलकी अधिक दृढ करण्याचे हे एक प्रतीकात्मक पाऊल ठरणार आहे. कार्यक्रमाचे तपशील शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ वेळ सकाळी ६:३० वाजता स्थळ पटेल हायस्कुल समोर, श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, चंद्रपूर मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक - गांधी चौक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा - जयंत टॉकीज - जटपुरा गेट - प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक - बसस्थानक - पोलीस मुख्यालय, चंद्रपूर ही रॅली केवळ उत्सव नाही, तर भारतीय एकतेच्या दृढ पायाचा पुनःस्मरण आहे. सरदार वल्लभभाई पटेलांच्या लौह इच्छाशक्तीने जसा देश एकसंध झाला, तसाच आजचा युवक, पोलीस दल, आणि प्रत्येक नागरिकही समाजातील फाटे मिटवून एकसूत्र भारत या ध्येयासाठी उभा राहावा - हा या कार्यक्रमाचा वास्तविक संदेश आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या