आपला पैसा - आपला अधिकार मोहिमेचा लाभ घ्यावा प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचे आवाहन (Take advantage of the Aap Paisa - Aap Adhikar campaign, appeals from District Collector in-charge Dr. Nitin Vyavare)

Vidyanshnewslive
By -
0
आपला पैसा - आपला अधिकार मोहिमेचा लाभ घ्यावा प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचे आवाहन (Take advantage of the Aap Paisa - Aap Adhikar campaign, appeals from District Collector in-charge Dr. Nitin Vyavare)

दावा न केलेल्या रक्कमेसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा

चंद्रपूर - भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागांतर्गत सुरू असलेल्या “आपला पैसा - आपला अधिकार” या विशेष मोहिमेचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यात प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात करण्यात आला. या मोहिमेचा उद्देश आर्थिक क्षेत्रातील दावा न केलेल्या ठेवी व मालमत्तेचे कार्यक्षम व जलद वितरण सुनिश्चित करणे हा असून, 1 ऑक्टोबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या प्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक व्यवस्थापक महेश थुल, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष पोरकुटे, बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक गौरव विश्वकर्मा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक शेखर बारापात्रे, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत सांगवी, तसेच जिल्ह्यातील सर्व बँका, वित्तीय संस्थांचे जिल्हास्तरीय समन्वयक, अधिकारी व दावेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे म्हणाले की, ही मोहिम केंद्र सरकारची अतिशय लोकहिताची व जनसहभागातून राबविण्यात येणारी संकल्पना आहे. नागरिकांचे कोट्यवधी रुपये निष्क्रीय खात्यांत पडून आहेत. अनेक शासकीय संस्थांची खाती देखील या स्वरूपात आहेत. सर्व नागरिकांनी, संस्थांनी व वारसांनी आपल्या बँकांशी संपर्क साधून आपली दावा न केलेली रक्कम परत मिळवावी, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. ते पुढे म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून व्यवहार नसलेली बँक खाती निष्क्रीय होतात व अशा खात्यांतील रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार गोठविली जाते. या रक्कमा दावा न केल्यास बँकांकडे जमा राहतात. अशा परिस्थितीत “आपला पैसा - आपला अधिकार” मोहिमेअंतर्गत नागरिकांना त्यांचे हक्काचे पैसे मिळविण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
         डॉ. व्यवहारे यांनी यावेळी सर्व बँकांना ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याचे व माहिती देण्याचे निर्देश दिले. तसेच, ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत ठेवावेत, जेणेकरून भविष्यात बँकांकडून संपर्क सुलभ होईल व निष्क्रीय खात्यांची संख्या कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले. जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक आशिष पोरकुटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “ग्राहकाने दोन वर्षांपर्यंत कोणतेही व्यवहार न केल्यास खाते निष्क्रीय होते, आणि दहा वर्षांपर्यंत व्यवहार न झाल्यास ते खाते ‘दावा न केलेले’ म्हणून वर्गीकृत केले जाते. त्यामुळे प्रत्येक खातेदाराने आपल्या सर्व खात्यांमध्ये वेळोवेळी व्यवहार करून ते सक्रिय ठेवणे आवश्यक आहे.” चंद्रपूर जिल्ह्यातील आकडेवारीनुसार, एकूण 3 लाख 76 हजार 242 निष्क्रीय खात्यांमध्ये सुमारे 88 कोटी रुपयांची रक्कम दावा न केलेल्या स्वरूपात पडून आहे. यात वैयक्तिक, संस्थात्मक तसेच शासकीय संस्थांची खाती समाविष्ट आहेत. सदर मोहिमेअंतर्गत प्रत्येक बँक शाखेत विशेष बूथची स्थापना करण्यात आली असून, संबंधित दावेदारांनी अथवा त्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेशी संपर्क साधून आपली रक्कम परत मिळवावी, असे आवाहन सर्व बँक व्यवस्थापकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या हस्ते काही पात्र दावेदारांना दावा मंजुरी पत्रांचे वाटप करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तर कार्यक्रमांचे संचालन जिल्हा अग्रणी बॅंकेचे अधिकारी प्रतीक गोंडणे केले असून कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक गौरव विश्वकर्मा यांनी केले.
                                                       
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)