१७ सप्टेंबर हा अनागारिक धम्मपालांचा जन्मदिवस जो जगभर "पालि भाषा गौरव दिन" धम्मपालांच्या १६१ वी जयंती निमित्त.... (September 17th is the birthday of Anagarika Dhammapala, which is celebrated worldwide as "Pali Language Glory Day" on the occasion of Dhammapala's 161st birth anniversary....)

Vidyanshnewslive
By -
0
१७ सप्टेंबर हा अनागारिक धम्मपालांचा जन्मदिवस जो जगभर "पालि भाषा गौरव दिन"  धम्मपालांच्या १६१ वी जयंती निमित्त.... (September 17th is the birthday of Anagarika Dhammapala, which is celebrated worldwide as "Pali Language Glory Day" on the occasion of Dhammapala's 161st birth anniversary....)

वृत्तसेवा :- अनागारिक धम्मपाल यांनी दिलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती संघर्षाला १३० वर्षे होत आहेत. आजही महाबोधी महाविहार संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात नाही. अनागारिक धम्मपालांचा जन्म १७ सप्टेंबर १८६४ मध्ये श्रीलंकेतील एक अतिश्रीमंत बौद्ध कुटुंबात झाला. त्यांचे जन्म नाव डॉन डेविड ठेवण्यात आले होते. त्यांच्या वडिलांचे डॉन कॅरोलीस हेववितरणे हे श्रीलंकेतील एक प्रतिष्ठित व्यापारी होते व आईचे नाव मल्लिका गुणवर्धणे होते. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या डॉनने शाळेत उत्तम प्रगती केली. त्याचा धार्मिक ओढा पाहून, त्याच्या आईने त्याला बौद्ध धर्माचा सविस्तर अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले. वयाच्या १६ व्या वर्षी डेविडची भेट कर्नल ऑलकॉट आणि मॅडम ब्लावातस्की यांच्याशी झाली. या दोघांनी त्यावेळेस श्रीलंकेमध्ये थिऑसॉफिलिकेल सोसायटी स्थापन केली होती व स्थानिकांच्या प्रश्नवर झटत होते. त्यावेळी श्रीलंकेमध्ये ख्रिस्ती मिशनरी सामान्यजनांना अतिशय हीन वागणूक देत. सर ऑलकॉट आणि मॅडम ब्लावातस्की यांच्याबरोबर फिरताना डॉन डेविडला श्रीलंकेतील गरीब, कष्टाळू व अन्याय, अत्याचारग्रस्त लोकांचे लाचारीचे जीवन अगदी जवळून पाहता आले. या बद्दल त्याला प्रचंड यातना झाल्या. स्वावलंबी होण्यासाठी त्याने तेथील शिक्षण खात्यामध्ये नोकरी सुरु केली. त्याचबरोबर बौद्ध धम्माच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी डेविड पालि भाषा शिकला. श्रीलंकेतील लोक आपला मूळ बौद्ध धम्म विसरले आणि जो पर्यंत या धम्माचा प्रसार होणार नाही तो पर्यंत ते गुलामगिरीत राहणार हे जाणल्यामुळे डेव्हिडने श्रीलंकेत बौद्ध धम्माला पुनर्जीवित करण्याचे ठरविले. वयाच्या १९ व्या वर्षी, त्याने घराचा त्याग केला आणि अनागारिक झाले. अनागारिक म्हणजे जो चीवर धारण न करता, संसार न करता, आयुष्यभर धम्मासाठी गृहत्याग करतो. यात त्याच्या घरच्यांनी त्याला उत्स्फूर्त साथ दिली. त्याने स्वतःचे नाव बदलून धम्मपाल केले. अनागारिक धम्मपालांनी नंतर गावोगावी जाऊन लोकांमध्ये बौद्ध धम्माचे विचार पेरायला सुरुवात केली आणि त्याच बरोबर त्यांना पारतंत्र्याची जाणीव देखील करून दिली. ब्रिटिश सरकारने त्यावेळेस लोकांना दारूच्या व्यवसायात गुंतविले होते त्यामुळे गरीब जनतेला पैश्याच्या अमिषा बरोबरच दारूचे व्यसन देखील लागले. धम्मपालांनी सरकारच्या विरोधात आवाज उठविला आणि अनेक दारूचे कारखाने बंद पाडण्यास भाग पडले. जेथे जुनी विहारे होती तेथे जाऊन त्यांची साफसफाई केली आणि तेथे बौद्ध धम्माचे तसेच पालि भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. काही गावात नवीन विहारे बांधली. बौद्ध धम्माच्या पुनर्जीवितासाठी ते अहोरात्र झटत होते. त्याच दरम्यान त्यांना बुद्धभूमी भारत पाहण्याची ओढ लागली. १८९१ मध्ये ते भारतात पहिल्यांदा आले व काही महत्त्वाच्या बौद्ध स्थळांना भेट देण्यास सुरुवात केली. या स्थळांची दुरावस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटले. त्याकाळी बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा काही शैव पंथाच्या महंतांच्या हातात असलेला पाहून त्यांनी तो सोडवून घेण्याचे ठरविले. बौद्ध धम्मात या महाविहाराचे महत्त्व त्यांनी तेथील महंतांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र महंतांनी त्यांना हाकलून लावले. हे काम अत्यंत कठीण आहे हे धम्मपालांना उमजले. बुद्धगये मध्ये वर्षभर राहून त्यांनी अनेकवेळा महाविहाराला भेटी दिल्या व तेथे वंदना करण्यास सुरुवात केली. अनेकवेळा तेथील महंत त्यांना हुसकावून लावीत व त्यांच्या बरोबर आलेल्या परदेशी पाहुण्यांना टाकून बोलत. एकदा तर चाळीस पन्नास महंतांची माणसे त्यांच्या अंगावर धावून आली. त्यांच्या तिसऱ्या भेटीत, ते बुद्धरुपा समोर मेणबत्ती पेटवत असताना महेंद्र गीर नावाच्या इसमाने बुद्धरुप काढण्याचा प्रयत्न केला. धम्मपालांनी स्थानिक पोलीस चौकीत तक्रार केल्यानंतर प्रकरण थोडे शांत झाले. येथे स्थानिक संस्था स्थापन करून महाविहाराच्या अधिकाराचा प्रस्ताव टाकणे गरजेचे आहे हे जाणून धम्मपालांनी महाबोधी सोसायटीची स्थापना बुद्धगया येथे केली. त्यानंतर श्रीलंकेतील काही मित्रांशी बोलणी करून, देणगीसाठी ते श्रीलंकेला गेले. धम्मपाल श्रीलंकेत अनेक लोकांना भेटून भारतातील महाबोधी महाविहाराची सत्य परिस्थिती कथन केली. याच दरम्यान त्यांनी जगातील अनेक वृत्तपत्रात महाबोधी महाविहाराची दुरावस्था बाबत लेखन केले. त्यामुळे जागतिक स्थरावर बुद्धगया येथील महाविहारच्या दुरावस्थे बद्दल चर्चा होऊ लागली. श्रीलंकेतील वास्तव्यात त्यांनी गरीब मुलामुलींसाठी शाळा सुरु केल्या. तेथील धम्म जागृती आपल्या विश्वासू सहकाऱ्यांकडे सुपूर्द करत पुन्हा भारतात आले. महाबोधी महाविहारात बुद्धरुपा समोर नतमस्तक होत असतानाच त्यांनी दृढ निश्चय केला कि जो पर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात येत नाही तो पर्यंत ते मायदेशी परतणार नाहीत आणि शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा चालू ठेवतील. अनागारिक धम्मपाल यांच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. १८९३ साली शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत त्यांना बौद्ध धम्माचे प्रतिनिधित्व करण्याची विनंती करण्यात आली. याच प्रवासात आणि शिकागो मध्ये त्यांची स्वामी विवेकानंदांशी भेट झाली आणि दोघात बौद्ध धम्मात असलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता बद्दल चर्चा झाली. या चर्चेने विवेकानंद खूप प्रभावित झाले. शिकागो येथील परिषदेत अनागारिक धम्मपालांनी मांडलेले जागतिक सहिष्णुता, बंधुता आणि शांती बद्दलचे बौद्ध विचार प्रभावशाली होते आणि तेथील वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली. बुद्धगयेत परतल्यावर त्यांचा महाविहार संबंधीचा लढा चालूच राहिला. एकीकडे तेथील पंडे त्यांना मज्जाव करत असत तर दुसरीकडे स्थानिक ब्रिटिश पोलिसांकडून बोटचेपे भूमिका होती. एका भेटीत त्यांच्या लक्षात आले कि मूळ बुद्धरुप महाविहारातून हलवून बाहेरील पांचपांडव मंदिरात ठेवण्यात आले होते. बुद्धरुप झाकून चेहऱ्यावर कुंकू लावण्यात आले होते. धम्मपालांनी प्रचंड विरोध केला. त्याच दिवशी संध्याकाळी ते राहत असलेल्या गेस्ट हाऊस मध्ये त्यांच्यावर मारेकरी सोडण्यात आले. धम्मपाल आणि त्यांचे काही सहकारी यात जखमी झाले. दाद मिळत नसल्याचे पाहून, या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रे आणि महाबोधी मासिकामध्ये अनेक लेख लिहिले. याच साली त्यांनी महेंद्र गीर, महंत आणि त्याच्या सहकाऱ्या विरोधात कोर्टात केस टाकली. 


           महाबोधी महाविहारावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी बुद्धगया येथे एक जमीन विकत घेतली. तेथे मुलामुलींसाठी शाळा आणि धर्मादाय दवाखाना सुरु केला. कोलकत्ता आणि बुद्धगया येथे आजही महाबोधी सोसायटीच्या ८ शाळा, व महाविद्यालय आणि अनेक दवाखाने सुरु आहेत. याच दरम्यान भारतामध्ये पालि भाषेचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी अनेक शाळा महाविद्यालयांना भेटी दिल्या आणि पालि भाषेचे महत्त्व विशद केले. बौद्ध धम्म आणि त्या अनुषंगाने पालि भाषेच्या प्रसारासाठी त्यांनी जगभ्रमंती केली. या दौऱ्यातून त्यांनी महाबोधी महाविहार तसेच अनेक प्राचीन बौद्ध स्थळांच्या स्थिती बद्दल लोकांना सांगितले आणि त्यांना मदत करण्याचे व ब्रिटिश सरकारवर दबाव टाकण्याची विनंती केली. सारनाथ येथील भ. बुद्धांची मूलगंधकुटी त्यांनी शोधून काढली व तेथे एक विहार बांधले. महाबोधी महाविहाराचा कोर्टातील लढा त्यांनी चालूच ठेवला होता. कोर्टात आपली बाजू मांडताना त्यांनी निक्षून सांगितले कि जगाच्या पाठीवर कुठल्याही एका धर्माच्या ट्रस्टी मंडळावर दुसऱ्या धर्माचा अधिकार नाही मात्र बौद्धांच्या अतिशय पवित्र महाबोधी महाविहारावर हिंदू धर्मातील पंडे अधिकार सांगतात. १८९२ साली अनागारिक धम्मपालांनी सुरु केलेला लढा आजही १३३ वर्षांनंतर चालू आहे. जेथे सिद्धार्थाला प्रचंड परिश्रमानंतर बुद्धत्त्व प्राप्त झाले आणि जेथून त्यांनी हे ज्ञान साऱ्या जगाच्या कल्याणासाठी प्रसार करण्याचे ठरविले ते पवित्र महाबोधी महाविहार आजही बौद्ध धर्मियांच्या ताब्यात नाही ही एक शोकांतिका आहे. बौद्ध धम्माबद्दल प्रचंड श्रद्धा असणारा एक परदेशी बौद्ध भारतात येतो आणि महाबोधी महाविहाराच्या मुक्ती साठी, आपले घरदार, व्यवसाय सोडून सतत ४४ वर्षे, आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा देतो, त्याबद्दल जागृती निर्माण करतो, पालि भाषेच्या प्रसारासाठी भारतभर फिरतो हे खरंच आदरणीय कार्य होय. अशा या महान बौद्ध धम्म प्रसाराकास, त्यांच्या १६१ व्या जयंती निमित्त आदरांजली. २९ एप्रिल १९३३ मध्ये वयाच्या ६९व्या वर्षी अनागारिक धम्मपालांचे निधन झाले. बौद्ध धम्म आणि पालि भाषेसाठी घेतलेले प्रचंड कष्टाची आठवण राहावी म्हणून जगभर त्यांची जयंती "पालि भाषा गौरव दिन" म्हणून साजरी करण्यात येते. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात आले तरच खऱ्या अर्थाने बौद्धांच्या अस्मिता जपली जाईल आणि अनागारिक धम्मपालांना आदरांजली अर्पण होईल.     

संकलन :- अतुल भोसेकर, ९५४५२७७४१०

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)