आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रस्तावानंतर सांस्कृतिक मंत्री यांनी तात्काळ दिले निर्देश, (Government approves publication of postage stamp of Barrister Rajabhau Khobragade, After the proposal of MLA. Sudhir Mungantiwar, the Culture Minister immediately gave instructions)
मुंबई -: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. आ. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र व आंबेडकरी चळवळीचे प्रभावी नेतृत्व करणारे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत डाक विभागाने तातडीने टपाल तिकीट प्रकाशित करावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य मंत्री आ. मुनगंटीवार यांनी दिलेल्या प्रस्तावाला विद्यमान सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार यांनी दोन दिवसांच्या आत मंजुरी दिली. त्यासंदर्भातील शासनादेश निर्गमित झाल्यावर मंत्री शेलार यांनी आ. मुनगंटीवार यांना व्यक्तिशः पत्राद्वारे ही बाब कळविली आहे, हे विशेष. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे १९५८ ते १९८४ या कालावधीत राज्यसभेचे सदस्य होते, तर १९६९ ते १९७२ या कालावधीत राज्यसभेचे उपसभापती देखील होते. त्यांच्या कार्याचा गौरव होण्याच्या दृष्टीने जन्मशताब्दीच्या निमित्ताने टपाल तिकीट प्रकाशनाला प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे, असा शासन निर्देश दि. १७ सप्टेंबर २०२५ ला निर्गमित करण्यात आला आहे.
आ. मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल मल्टीपरपज सोसायटी, चंद्रपूरचे सचिव श्री. प्रतीक डोर्लीकर यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रकाशनासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांना विनंती केली होती. आ. मुनगंटीवार यांनी तातडीने या मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यानंतर दोन दिवसांच्या आत त्यावर अंमलबजावणी देखील करण्यात आली. बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या मूल्यांना अभिवादन राज्य शासनाने टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत अभिमानास्पद आहे. हा निर्णय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र, विधीक्षेत्रातील विद्वान आणि आंबेडकरी चळवळीचे प्रभावी नेतृत्व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला व समतेच्या मूल्यांना एक सन्मानपूर्वक अभिवादन आहे, अशी भावना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. “या प्रकाशनाद्वारे त्यांच्या समतेच्या लढ्याला आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या अविरत व्रताला एक नम्र अभिवादन अर्पण केले जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या