चंद्रपूर शहरातील रहेमत नगर पाणी शुध्दीकरण केंद्रावर क्लोरिन गॅस गळती, दोषींवर तातडीने कारवाई करा.- खा. प्रतिभा धानोरकर (Chlorine gas leak at Rahemat Nagar Water Purification Center in Chandrapur city, immediate action should be taken against the culprits.- Kha. Pratibha Dhanorkar)
चंद्रपूर :- काल दुपारी फायर कंट्रोल रुमकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या रहेमत नगर पाणी शुध्दीकरण केंद्रावर क्लोरिन गॅस (Chlorine Gas) गळती झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. गळतीचे प्रमाण लक्षात घेत जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व महानगरपालिका यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. प्रशासनाने तत्परता दाखवत त्या परिसरातील प्रभावित घरातील सदस्यांना ताबडतोब सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके, अग्निशमन दल तसेच वैद्यकीय यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इरई नदी काठावरील तसेच रहमान नगर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नयेत. श्वसनास त्रास होणाऱ्या, वृद्ध व लहान मुलांना तातडीने सुरक्षित व स्वच्छ ठिकाणी हलवावे. गळतीग्रस्त भागाजवळील नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस व महानगरपालिका यंत्रणा घटनास्थळी मदत कार्य हाती घेत असून नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांत राहून पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात क्लोरीन गॅस गळती झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून, नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी बोलताना खासदार धानोरकर यांनी सांगितले की, “गॅस गळतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेची गय केली जाणार नाही.” गॅस गळतीचे नेमके कारण काय, याबाबतची सखोल आणि तातडीने चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा. घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर आणि तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. स्थलांतरित केलेल्या नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत पुरवावी. ज्या नागरिकांना श्वसनाचा किंवा इतर कोणताही त्रास झाला असेल, त्यांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करावी. खासदार धानोरकर यांनी या प्रकरणावर आपण स्वतः लक्ष ठेवून असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या