पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा 17 सप्टेंबर रोजी मोरवा येथे आयोजन जिल्हास्तरीय शुभारंभ (District level launch of the Chief Minister's Samruddhi Panchayat Raj Abhiyan organized at Morwa on 17th September by the Guardian Minister)

Vidyanshnewslive
By -
0
पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा 17 सप्टेंबर रोजी मोरवा येथे आयोजन जिल्हास्तरीय शुभारंभ (District level launch of the Chief Minister's Samruddhi Panchayat Raj Abhiyan organized at Morwa on 17th September by the Guardian Minister)


चंद्रपूर :- ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व उत्कृष्ट कामगिरीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या पुरस्कार योजनेस मान्यता दिली आहे. सन 2025-26 पासून हे अभियान तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर राबविण्यात येणार आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उइके यांच्या हस्ते जिल्हास्तरीय शुभारंभ बुधवार,17 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता चंद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत मोरवा येथे होणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश गावा-गावात विकासाची निकोप स्पर्धा निर्माण करणे, सुशासन प्रस्थापित करणे व गावांना आत्मनिर्भरतेकडे नेणे हा आहे. ग्रामपंचायतींच्या मूल्यमापनात लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन, जलसमृद्धी, स्वच्छता, शिक्षण, महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे, डिजिटल सेवा, कर व पाणीपट्टीची 100 टक्के वसुली, मतदार नागरिकांचे अप, आयुष्यमान भारत कार्ड व विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यांचा समावेश असेल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आकर्षक प्रोत्साहनपर निधी देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्रथम तीन क्रमांकांना 15 लाख, 12 लाख व 8 लाख, जिल्हास्तरावर 50 लाख, 30 लाख व 20 लाख, विभागस्तरावर 1 कोटी, 80 लाख, 60 लाख व राज्यस्तरावर 5 कोटी, 3 कोटी व 2 कोटी रुपये अशी बक्षिसे निश्चित करण्यात आली आहेत.
           17 सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून सर्व ग्रामपंचायतींना राज्याचे मुख्यमंत्री संबोधित करणार असून त्याचे थेट प्रक्षेपण ग्रामसभेमध्ये दाखविले जाणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विधानसभाक्षेत्रनिहाय आमदार आपल्या क्षेत्रातील एका ग्रामपंचायतीत या अभियानाचा शुभारंभ करीत आहेत. ग्रामपंचायती सक्षम करणे, तळागाळापर्यंत योजनांची पोहोच वाढविणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे या उद्दिष्ट्यांनी या अभियानाचे गुणांकन केले जाणार आहे. ग्रामीण विकासात समाजातील सर्व घटक, स्वयंसेवी संस्था व युवक मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)