जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक, सण उत्सव शांततेत पार पाडणे ही आपली सामुहिक जबाबदारी - प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे (District level peace committee meeting, it is our collective responsibility to celebrate festivals peacefully - In-charge District Collector Dr. Nitin Vyavare)

Vidyanshnewslive
By -
0
जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक, सण उत्सव शांततेत पार पाडणे ही आपली सामुहिक जबाबदारी - प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे (District level peace committee meeting, it is our collective responsibility to celebrate festivals peacefully - In-charge District Collector Dr. Nitin Vyavare)


चंद्रपूर :- आगामी काळात जिल्ह्यात गणेशोत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहिहांडी, पोळा, ईद – ए- मिलाद असे सर्वधर्मीय सण-उत्सव साजरे होणार आहे. हे सर्व उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. ही आपली सर्वांचीच सामुहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले. नियोजन सभागृह येथे जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाच्या वतीने आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्यासह, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे अध्यक्ष, मुर्तीकार, डीजे चालक मालक आदी उपस्थित होते. शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवाचा’ दर्जा दिला आहे, असे सांगून डॉ. व्यवहारे म्हणाले, उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभाग नोंदवून बक्षीसे मिळवावीत. गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी घाट निश्चित करून विसर्जनस्थळी पूर्ण व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने प्रथमोपचार व्यवस्था, औषधांची उपलब्धता चोख ठेवावी. प्रादेशिक परिवहन विभागाने मिरवणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष द्यावे. गणेशोत्सवात वीज पुरवठा खंडीत होणार नाही, तसेच मंडळांना वीज जोडणी महावितरण कंपनीने उपलब्ध करून द्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे असलेल्या रस्त्यांची डागडुजी करावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने मिठाई, अन्न पदार्थांची तपासणी करावी, अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिल्या.
              डीजे मुक्त गणेशोत्सवसाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा अपर पोलिस अधिक्षक कातकडे प्रशासन म्हणजे केवळ शासकीय विभागच नव्हे तर आपण सर्वजण म्हणजे प्रशासन होय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पर्यावरणपुरक गणेशोत्सव, रक्तदान शिबीर, प्लॅस्टिक निर्मुलन, वृक्षारोपण, गरीब शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप असे सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा. तसेच डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी केले. पुढे ते म्हणाले, डीजे ऐवजी लेझीम नृत्य, ढोल ताशे असे पारंपरिक वाद्ये वाजवावीत. गणेश मंडळांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून गर्दीला आळा घालता येईल. तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा लक्षात येताच तात्काळ पोलिसांशी संपर्क करा, असे त्यांनी सांगितले. शांतता समिती सदस्यांच्या सुचना : 1. सण उत्सवाच्या दरम्यान विद्युत पुरवठा अखंडीत सुरू राहावा, 2. डीजे चा आवाज मर्यादीत असावा, 3. मिरवणुकीसाठी रस्त्यांची तात्काळ डागडुजी करावी, 4. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, 5. अफवा पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी, 6. मुर्तीची उंची मर्यादेपेक्षा जास्त असू नये, 7. मिरवणुकीदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर ध्वनीक्षेपक बंद ठेवावे, 8. मुर्ती विक्री चांदा क्लब ग्राऊंडवरच व्हावी, 9. लेझर लाईटवर बंदी आणावी, 10. सजावटीमध्ये प्लॅस्टिक, थर्माकॉलच्या वापरावर प्रतिबंध करावे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)