वैद्यकीय क्षेत्रात क्रांती ! आता सुईमुक्त इंजेक्शनमुळे इंजेक्शनची भिती होणार इतिहासाजमा (A revolution in the medical field! Now needle-free injections will eliminate the fear of injections, a historical record)
वृत्तसेवा :- लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना इंजेक्शनची आजही भीती वाटते. पण आता ही भीती कायमची दूर होणार आहे! कारण, सुईमुक्त इंजेक्शन (नीडल फ्री इंजेक्शन) वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवत आहे. डॉ. गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आधुनिक इंजेक्शन एखाद्या बंदुकीसारखे लोड केले जाते आणि हवेच्या दाबाने त्वचेमध्ये औषध सोडले जाते. यामुळे पारंपारिक इंजेक्शनप्रमाणे कोणतीही वेदना होत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सुईमुळे होणारा टिश्यू ट्रॉमा (ऊतींना होणारी इजा) टाळता येतो, ज्यामुळे इंजेक्शननंतर सूज येण्याची समस्या राहत नाही. विशेष बाब म्हणजे, हे सुईमुक्त इंजेक्शन सुई असलेल्या इंजेक्शन इतकेच प्रभावी आहे. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी लहान मुलांमध्ये या इंजेक्शनचा वापर सुरू केला असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील हे एक महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे इंजेक्शनची भीती खऱ्या अर्थाने इतिहासजमा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या हे सुईमुक्त इंजेक्शन सहा महिने ते वृद्धांपर्यंतच्या लोकांना दिले जात आहे. सहा आठवडे ते सहा महिन्यांच्या बाळांना हे इंजेक्शन देण्यासाठी सध्या चाचण्या सुरू आहेत, ज्या लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हे इंजेक्शन ०.५ मिलीलीटर पर्यंत औषध देण्यासाठी वापरले जाऊ शकते. जर १ मिलीलीटर औषधाची गरज असेल, तर ते दोनदा दिले जाते. सध्या हे इंजेक्शन फक्त द्रवरूपात असलेल्या औषधांसाठी उपलब्ध आहे. हे इंजेक्शन इंट्रामस्क्युलर म्हणजे स्नायूंमध्ये आणि इंट्राडर्मल म्हणजे त्वचेच्या वरच्या थरात (एपिडर्मिसमध्ये) दिले जाऊ शकते. सध्या हे सुईमुक्त इंजेक्शन पारंपारिक इंजेक्शनपेक्षा २०० ते ३०० रुपयांनी महाग असले तरी, याचा वापर जसजसा वाढेल, तसतसा भविष्यात त्याच्या किमती सामान्य होण्याची दाट शक्यता आहे. या इंजेक्शनचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे सुरक्षितता. इंजेक्शन देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला चुकून सुई टोचण्याचा धोका पूर्णपणे टळतो. यामुळे एचआयव्ही आणि हेपेटायटिस बी सारख्या गंभीर आजारांचा प्रसार होण्याची शक्यताही कमी होते. 'नीडल फ्री इंजेक्शन' वापरण्यास अत्यंत सोपे आहे आणि मोठ्या प्रमाणात लसीकरणात ते अत्यंत प्रभावी ठरू शकते, असे डॉ. गावंडे यांनी सांगितले. विशेषत: लहान मुलांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधक लसीकरणात हे सुईमुक्त इंजेक्शन महत्त्वाची भूमिका बजावेल, ज्यामुळे लसीकरण अधिक सोपे आणि कमी भीतीदायक होईल.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या