चंद्रपूर :- शेती करतांना होणारे अपघात तसेच अपघातामुळे उद्भवणारे अपंगत्व या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राज्यात राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील 10 ते 75 वयोगटातील एका सदस्याला अपघात विमा संरक्षण प्रदान करते. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत असून अपघाताच्या घटनेनंतर 30 दिवसांच्या आत विहित कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांचा मृत्यु झाल्यास त्याचे वारसदारांना रुपये दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच वरील अपघातात संबंधित शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये आर्थिक मदत अनुज्ञेय आहे. नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्या/ प्रयत्न, कायद्याचे उल्लंघन करताना झालेल्या घटना, अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली अपघात, उष्माघात, भ्रमिष्टपणा, शरिरातील रक्तस्त्राव, युद्ध, सैन्यातील सेवा, इत्यादी प्रकरणी तसेच अन्य कोणत्याही शासकीय विभागाच्या अपघात अनुदान योजनेचा लाभ घेतल्यास सदर योजना अंतर्गत लाभ मिळणार नाही.
या अपघातांचा समावेश योजनेंतर्गत रस्ता / रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा (जंतुनाशक किंवा अन्य कारणे), विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडणे, सर्पदंश / विंचूदंश, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू, जनावरांमुळे झालेला अपघात, बाळंतपणातील मृत्यू, दंगल व इतर कोणताही अपघात प्रकारांसाठी लाभ मिळू शकतो. अनुदान मिळण्याकरीता पती/पत्नी, अविवाहित मुलगी, आई, मुलगा, वडील, सुन इतर कायदेशीर वारस या प्राधान्य क्रमानुसार असतील. आवश्यक कागदपत्रे : प्रस्ताव सादर करतांना 7/12 उतारा, मृत्यूचा दाखला, गावकामगार तलाठी द्वारा मंजूर वारसांची यादी (गाव नमुना 6 क), ओळखपत्र (आधार/पॅन/बँक पासबुक/मतदार कार्ड), वयाचा दाखला, अपघाताचा अहवाल (एफआयआर, पंचनामा, पोलिस पाटील अहवाल) इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत आवश्यक असून प्रस्ताव 30 दिवसांत सादर न झाल्यास एका साध्या कागदावर अपघाताची सविस्तर माहिती देऊन तात्पुरता अर्ज सादर करता येतो.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या