25 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
चंद्रपूर :- बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) 25-26 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवार, दिनांक 25 जुलै 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरिता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. पूर्व आणि उत्तर विदर्भात सर्वात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्याच्या अंदाजानुसार 26 तारखेला पावसाचे प्रमाण सर्वात अधिक असण्याची शक्यता आहे. 25-26 जुलै दरम्यान पूर्व विदर्भात धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सखोल भागांमध्ये पुराची स्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार 25 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात "रेड अलर्ट" दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2) (5) व (18) नुसार 25 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी. तसेच नागरीकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर संपर्क क्र. 07172 - 250077 येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या