चंद्रपूर :- विदर्भात जून महिना अनेकदा उन्हाच्या काहिलीत उलटतो. पण यंदा मे महिन्यातच महाराष्ट्राला मान्सूनची चाहूल लागल्याने उन्हाने होणारी लाहीलाही टळली आणि सर्वसामान्य जनता सुखावली. याच आल्हाददायक वातावरणात, ९ जूनच्या रात्री साडेआठच्या सुमारास आमच्या आनंदवनात वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. सोबतीला ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट आणि मातीचा गंध घेऊन येणारी पावसाची रिपरिप होती. सार्वजनिक भोजनगृहांमध्ये जेवणं आटोपून आनंदवनाचे कार्यकर्ते, कुष्ठमुक्त आणि दिव्यांग बांधव आपापल्या निवासस्थानी परतले होते. आनंदवन रुग्णालयातील रुग्ण आणि वृद्धाश्रमातील निवासीही जेवण करून विसावले होते. रात्रीच्या जेवणानंतर फिरायला बाहेर पडलेली मंडळी घाईघाईने घराकडे परतू लागली होती.
चक्रीवादळाचे रौद्र रूप रात्री साडेनऊनंतर वादळ आणि विजांचा जोर वाढला. वीज गेली आणि सर्वत्र मिट्ट काळोख पसरला. बाहेर नेमके काय सुरू आहे, याचा अंदाज बांधणे कठीण झाले. आनंदवनात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या अनुभवी व्यक्तींनीही इतके तीव्र वादळ पाहिले नव्हते. तरीही, माणूस आशावादी असतोच. फारतर झाडांच्या काही फांद्या पडतील किंवा एखादी विजेची तार तुटेल, असा नेहमीचाच अंदाज सर्वांनी बांधला होता. पण, रात्री ११.०० वाजता अचानक अभूतपूर्व असे चक्रीवादळ घोंगावू लागले. सर्वदूर मेघगर्जना आणि विजांचे तांडवनृत्य सुरू झाले. चक्रीवादळाचा जोर इतका होता की त्याने पावसालाही इकडे-तिकडे भिरकावून दिले. गडद अंधारात, विजांच्या सततच्या लखलखाटात प्रकाशमान क्षण, वाऱ्याचा गोंगाट, काहीतरी कोसळतेय, तुटतेय, उन्मळून पडतेय असे भासवणारे, कानठळ्या बसवणारे आवाज... अदृश्य असूनही विनाशाचा अंदेशा देणारे ते क्षण होते. आता काही खरे नाही असे वाटत असतानाच निसर्गाचे हे तांडव रात्री साडेअकरा नंतर हळूहळू शांत झाले. 'मोठे संकट टळले, फारसे नुकसान झाले नसावे,' असा आम्हालाही दिलासा मिळाला. नुकसानीचा भयावह प्रत्यय पण, सूर्योदयासोबत रात्रीच्या त्या चक्रीवादळाचे विनाशकारी परिणाम समोर आले. आमच्या हातमाग, सतरंजी आणि हस्तकला विभागाच्या छताचे काही पत्रे पार उडून गेले होते, तर काही वाकले होते. हे विभाग म्हणजे येथील रहिवाशांच्या कष्टाचे, आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहेत. आनंदवनातील कुष्ठमुक्त आणि दिव्यांग रहिवाशांनी मेहनतीने तयार केलेली कित्येक पोस्टर्स, सदिच्छापत्रे, सतरंज्या, हातमागावर विणलेल्या विविध वस्तू आणि कच्च्या मालाचे पावसाचे पाणी आणि धुळीमुळे प्रचंड नुकसान झाले. हा केवळ आर्थिक फटका नव्हता, तर अनेक दिवसांच्या मेहनतीवर फिरलेले पाणी होते. ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याच; पण आनंदवनाच्या स्थापनेपासून इथे असलेले आणि नंतर लावलेले असे ७० ते ८० वृक्ष मुळासकट उन्मळून पडले होते. ही झाडे केवळ सावली देत नव्हती, तर आनंदवनाच्या इतिहासाची, वाढीची मूक साक्षीदार होती. अनेक घरांची कौले फुटली. दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राच्या छताचे पत्रे उडून गेले. निसर्गाच्या या आकस्मिक क्रोधाने पक्ष्यांची घरटी पडून त्यांची पिल्लांचेही बळी घेतले. झाडांच्या फांद्या पडून विजेच्या तारा ठिकठिकाणी तुटल्याने ९, १० व ११ जूनच्या तीन पूर्ण रात्री आणि १० व ११ हे दोन दिवस, जवळपास ७० तास आनंदवन १००% विजेविना होते. विहिरी आणि बोअरवेल्सचे पंप बंद पडल्याने पाणीपुरवठा जवळजवळ ठप्प झाला आणि रहिवाशांचे अतोनात हाल झाले. आरोग्य आणि भोजन व्यवस्थेवर खूप ताण पडला. इस्पितळ, वृद्धाश्रम आणि भोजनगृह येथील जनरेटर्स सतत सुरू ठेवावी लागल्याने १२०० लिटर्स अतिरिक्त डिझेल खर्ची पडले. आनंदवनाची जीवनशैलीच सामुदायिक आणि एकसंध असल्यामुळे, अशा मूलभूत सुविधांच्या अभावाने सर्वांवर परिणाम झाला. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आनंदवनाचा विद्युत विभाग आणि आपत्कालीन यंत्रणा दिवसरात्र झटत होती. पण ६३१ एकर विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेल्या आनंदवनाची निवासी लोकसंख्या १५०० पेक्षा अधिक असल्याने सर्वांना जीवनावश्यक सुविधा पुरवताना आरोग्य, भोजन, पाणीपुरवठा इत्यादी विभागांची दमछाक झाली. तरीही, असुविधांकडे दुर्लक्ष करत लहान-थोर सर्वांनी आपुलकी आणि कौटुंबिक जबाबदारीच्या भावनेतून श्रमदान करत कार्यपरिसर पुन्हा नीटनेटका करण्यासाठी हातभार लावला. बाबांच्या शिकवणीनुसार, संकटातही एकजुटीने काम करण्याची ही भावना आजही इथे कायम आहे. आनंदवनाच्या २०% भागात वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. आज तो सुरळीत होईल अशी आशा आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु आर्थिक नुकसान प्रचंड झाले आहे. दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे!
निसर्गाचा संदेश वृक्षांनाही भावना असतात याची प्रचीती वारंवार येते तशी यावेळीही आली! आमच्या “मुक्ती-सदन” वसाहतीतील एका कुटुंबाच्या घरापुढील अंगणात असलेला एक विशाल आणि मजबूत आंब्याचा वृक्ष मुळासकट उन्मळून पडला. पण तो घरावर न पडता अंगणातच पडला. या कुटुंबाने कदाचित त्या वृक्षाला जीव लावला असावा, त्यामुळे स्वतःच्या अंतिम क्षणी त्याने चक्रीवादळाला त्या कुटुंबाच्या गळ्याला नख लावण्यापासून रोखले असावे. अशाच इतरही चार घरांवर तुटून पडू शकणाऱ्या फांद्या बाजूच्या वृक्षांनी झेलल्याने मोठी हानी टळली. सांगायचे हेच आहे की, आजवर आनंदवन आणि महारोगी सेवा समितीच्या इतर प्रकल्पांत वृक्षांच्या फांद्या तर कधी वृक्षही पडले, पण त्यांनी कधीच जीवितहानी घडवली नाही. हे आनंदवनच्या निसर्गाशी असलेल्या सहजीवनाचे एक अदृश्य नातेच दर्शवते. अखेरीस काय, यातून कुठेतरी निसर्ग आपली परीक्षा पाहतोय असे वाटून गेले. "हवामान बदल" ही हलक्यात घेण्याची बाब नाही हे यातून प्रकर्षाने जाणवले. कदाचित असेही असावे की, "अभी भी सुधरो बे!" अशी चेतावणी निसर्ग देत आहे, "तुम्ही नाही तर मीच तुमचा कायमचा बाप आहे," असे तो ठासून सांगत आहे, आणि "इथे राहायचे असेल तर 'सहअस्तित्त्वाची' व्याख्या खऱ्या अर्थाने समजून घेत मानवाला तिचा अंगीकार करावाच लागेल," असा इशारा देत आहे! आनंदवनने हे आव्हान स्वीकारले असून, नेहमीप्रमाणेच नव्या उमेदीने उभे राहण्याचा निर्धार केला आहे.
विश्लेषण :- कौस्तुभ आमटे, महारोगी सेवा समिती, वरोरा.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या