ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डाॅ.धनराज डाहाट यांचं निधन (Veteran Ambedkarite writer Dr. Dhanraj Dahat passes away)
नागपूर :- नागपूरातील आंबेडकर साहित्यिक, विचारवंत आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे सामाजिक कार्यकर्ता धनराज डहाट यांचे आज ७ मे रोजी पहाटे दुखद निधन झालेले आहे.त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर समतानगर अंबाझरी येथून दुपारी 4:00 वाजता निघेल व अंतिम संस्कार अंबाझरी घाटावर करण्यात येणार आहे. धनराज डाहाटांचं जाणं आकस्मिक म्हणून अधिकच यातनादायी आहे. डाहाटांना विनम्र अभिवादन! त्यांनी अनेक विषयांचा तलस्पर्शी अभ्यास केला होता.त्यातून त्यांची तडजोडविहीन बुलंद आणि धारदार आंबेडकरवादी भूमिका तयार झाली होती. त्यांच्या गंभीर वैचारिक लेखनातून त्यांच्या याच तीक्ष्ण आणि विधायक प्रज्ञेचा उद्घोष ऐकायला येतो. डाॅ धनराज डाहाट हे आंबेडकरी चर्चाविश्वातील एक मान्यताप्राप्त विशेषनाम आहे. अभेद्य आंबेडकरनिष्ठा असंच या विशेषनामाचं वर्णन करता येतं. हा एवढा प्रकांड अभ्यासक एकाचवेळी नम्रही होता, निगर्वीही होता आणि पराकोटीचा बाणेदारही होता. वैचारिक लेखन आणि प्रत्यक्ष चळवळ या गोष्टी डाॅ. डाहाटांनी पूर्ण अविभाज्यच मानल्या होत्या. आंबेडकरी चळवळीची ऊर्जा त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अन्वर्थकता प्रदान करीत होती. कृती आणि उक्तीमधील एकसंधता जपणारे डाहाट हे आंबेडकरी चळवळीमधले आदरणीय एकसंध प्रज्ञावंत होते. आंबेडकरवादी चर्चाविश्वाला गौरव वाटावा असं आंबेडकरलाॅजिक त्यांच्या सर्वच आविष्कारांमधून प्रकट झालं आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या आंदोलनात ते सुरुवातीपासूनच अग्रेसर होते.डाॅ. डाहाट प्रज्ञावंत योद्धे होते. त्यांच्या मृत्यूमुळे एक कलदार माणूस आणि कसदार वैचारिक लेखक काळाच्या पडद्याआड गेला आहे. काटोलमध्ये उगवलेला धनराज नावाचा एक ज्वलंत निर्धार नागपूर या महानगरात उजेडाच्या फांद्यांनी डेरेदार झाला आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण आंबेडकरवादी चर्चाविश्वात सर्वमान्यतेचा शिलेदार झाला. डाॅ. धनराज डाहाटांचं जाणं संपूर्ण आंबेडकरवादी चळवळीला अंतर्मुख करणारं आहे. एक ज्वलंत आणि डोळस आंबेडकरनिष्ठा म्हणजे धनराज डाहाट.. धनराज डाहाटांना विनम्र अभिवादन!
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या