बाबूपेठ येथे तथागत गौतम बुद्ध मूर्ती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण
चंद्रपूर :- भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आज आपल्या परिसरात उभा राहत आहे. ही केवळ मूर्ती नाही, तर पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणारा विचारांचा दिवा आहे. गौतम बुद्धांनी शांती, समता आणि करुणा यांचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांच्या या विचारांना आपल्या सामाजिक संघर्षात आत्मसात केलं. त्यामुळे आज समाजात समतेचे बीज रुजवण्यासाठी आपल्याला भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारस्वरूप वारसा पुढे नेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. बुद्ध जयंती निमित्त बहुउद्देशीय त्रिशरण बौद्ध मंडळ आणि भीमाबाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बाबूपेठ येथे भगवान बुद्ध मूर्ती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते.या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेविका महानंदा वाळके, गणेश गेडाम, अशोक आक्केवार, अनिकेत पोहणकर, प्रकाशित बुजाडे, रोहित वनकर, रामकुमार अक्कापेल्ली, प्रवीण बुजाडे, गुणवंत वनकर, अब्बास शेख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने पवित्र असलेले हे चंद्रपूर आहे. नागपूरनंतर देशात फक्त चंद्रपूर येथे त्यांनी दीक्षा दिली. त्यांनी दिलेल्या दीक्षाभूमीची उपेक्षा आता संपणार आहे. १०० कोटी रुपयांमधून नागपूरच्या धर्तीवर चंद्रपूर येथील दीक्षाभूमीचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील ५७ कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजनही पार पडले आहे. आम्ही ५ कोटी रुपये खर्च करून ११ बुद्धविहार येथे अभ्यासिकांच्या कामाला सुरुवात केली आहे. एकाच वेळी बुद्धविहारांमध्ये ११ अभ्यासिका उभारणारी चंद्रपूर ही राज्यातील एकमेव विधानसभा ठरली आहे.बाबूपेठ येथील धम्मभूमी महाविहार येथे कोट्यवधी रुपये खर्च करून ग्लोबल पॅगोडाच्या धर्तीवर विपश्यना केंद्र तयार केले जाणार आहे. चंद्रपूर येथील मनापा अभियंते आणि शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई येथील पॅगोडा येथे भेट देऊन त्या वास्तूचा अभ्यास केला आहे. येत्या काळात मतदारसंघातील सर्व बुद्धविहारांचा सर्वसमावेशक विकास करण्याचा आमचा ठाम मानस आहे. तथागत बुद्धांचे विचार म्हणजे शांती, समता आणि करुणा या तीन आधारस्तंभांवर उभे असलेले संपूर्ण मानवतेसाठी मार्गदर्शक तत्त्वज्ञान आहे. आज जगभरात अस्वस्थता, हिंसा आणि विषमता दिसून येत आहे. अशा काळात बुद्धांचे विचार जगाला योग्य दिशा देण्याचे सामर्थ्य राखून आहेत. त्याचप्रमाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ कायदेच नव्हे, तर समाजहितासाठी विचारांची दिशा दिली. त्यांनी बुद्धांचे तत्त्वज्ञान आत्मसात करून समाजात जागृती, आत्मसन्मान आणि बंधुत्वाची भावना रुजवली. त्यांच्या कार्यामुळेच आज आपण अभिमानाने उभे राहू शकतो.आज या ठिकाणी उभे राहिलेले हे अर्धाकृती पुतळे पुढील पिढ्यांनाही विचारांची प्रेरणा देतील. हे स्मारक केवळ शिल्प नाही, तर विचार जागवणारी जागा आहे. अशा उपक्रमातूनच समाज एकत्र येतो, जागृत होतो. असे कार्यक्रम नियमित आयोजित करण्याचे आवाहनही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते गौतम बुद्धांच्या मूर्तीचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या