बुध्दपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आढळले ६३ वाघांसह ५ हजार ५०२ वन्यप्राणी. (Animal census on the night of Buddha Purnima, 5,502 wild animals, including 63 tigers, were found in Tadoba-Andhari Tiger Reserve.)

Vidyanshnewslive
By -
0
बुध्दपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आढळले ६३ वाघांसह ५ हजार ५०२ वन्यप्राणी. (Animal census on the night of Buddha Purnima, 5,502 wild animals, including 63 tigers, were found in Tadoba-Andhari Tiger Reserve.)


चंद्रपूर :- बौद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर व बफर क्षेत्रात निसर्ग अनुभव कार्यक्रमात बफर व कोर क्षेत्रात ६३ वाघ, १३ बिबट्यासह अस्वल, हरिण, निलगाय, चौशिंगा, कोल्हा, कोंबडी, मोर यांच्यासह दोन्ही क्षेत्रात एकूण ५ हजार ५०२ वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. ताडोबा व्यवस्थापनाने पंधरा दिवसापूर्वी पासून याची तयारी सुरू केली होती. यासाठी बफर क्षेत्रातील ८१ मचाणी सज्ज करण्यात आल्या असून ६ वनपरिक्षेत्रात ही गणना होत आहे. यामध्ये मोहरली, मूल, चंद्रपूर, शिवणी, पळसगाव आणि खडसंगी वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे. एका मचाणीवर दोन पर्यटक आणि एक गाईड अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मचाणीचा अनुभव घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा करण्यात आली होती. त्यानुसार १६२ पर्यटकांची निवड करण्यात आली. यावर्षी कोअर क्षेत्रात ९६ मचाणी उभारण्यात आल्या असून यावरुन १८३ वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांरी सहभागी झाले होते. बफरच्या ८१ मचाणीवर १६२ पर्यटक तर कोर क्षेत्रात ९६ मचाणीवर वन अधिकारी सहभागी झाले होते. 


           पूर्वी व्याघ्रगणाना प्रक्रिया सामान्य नागरिकांसाठी निःशुल्क होती. मात्र काही वर्षांपासून यावर आता शुल्क आकारण्यात येत आहे. त्यातही हा मचाणीचा अनुभव ताडोबा व्याघ्रप्रकल्पात सर्वाधिक महागडा आहे. यासाठी प्रति व्यक्ती साडे चार हजार शुल्क आकारण्यात आले. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी हे परवडण्यासारखे नाही. शिवाय स्थानिक नागरिकांना देखील यात कुठलीही सूट नाही. त्यामुळे मागील दोन वर्षापासून सातत्याने शुल्क आकारण्यावरून वाद होत आहे. बौद्ध पौर्णिमेला रात्रीचा प्रकाश हा सर्वाधिक असतो. या स्वच्छ प्रकाशात पाणवठ्यावर येणारे प्राणी सहज बघितले जाऊ शकतात. इंग्रजकालीन काळात व्याघ्रगणनेसाठी या पद्धतीचा उपयोग केला जायचा. सायंकाळपासून सकाळपर्यंत मचाणीवर बसून पाणवठ्यावर आलेले प्राणी आणि त्यांची संख्या आणि या प्राण्यांची विशेष ओळख टिपून त्यांची नोंद केली जाते. यातून या जंगल परिसरात नेमके किती वाघ आणि इतर प्राणी आहेत, एखाद्या दुर्मिळ प्राण्याचे अस्तित्व येथे आहे का याची माहिती होण्यास ही व्याघ्रगणना अत्यंत महत्वाची समजली जायची. मात्र, ही पद्धत तितकी तंत्रशुद्ध नव्हती. शिवाय यात अनेक त्रुटी होत्या. आता व्याघ्रगणनेसाठी जीपीएस, ट्रॅप कॅमेरे, वाघाचे ठसे अशा आधुनिक आणि अद्यावत प्रणालीचा उपयोग करून ही प्रक्रिया केली जाते. मात्र असे असतानाही सामान्य नागरिकांना याचा अनुभव घेता यावा यासाठी अजूनही ही पारंपरिक पद्धत सुरू ठेवण्यात आली आहे. पर्यटकांना सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वनविभागाच्या मदतीने १६ प्रवेशद्वारांवरून मचाणीवर पोचवले आहे. तर कोर क्षेत्रातील ९६ मचाणीवर वन कर्मचारी सहभागी झाले होते. बफर व कोर दोन्ही मिळून ६३ वाघांची नोंद घेण्यात आली तर १३ बिबटे दिसले. यासोबतच अस्वल ९३, रानकुत्रा ९६, मुंगूस १००, रानमांजर ७, चौशिंगा २७, माकड ८५७, सांबर ५५३, रानगवा ८८२, रानडुकर ३८१, चितळ १७३७, निलगाय ८७, मोर ५५१, रानकोंबडा ५३, ससा १४, सायळ २७, चिंकारा १३, तडस १, उडती खार ५, उदमांजर ५०, जवादी मांजर २९, मगर ६, चांदी अस्वल ३, भेडकी ९८ व इतर ५६ प्राणी दिसून आले. कोर क्षेत्रात सर्वाधिक ३ हजार ७४६ तर बफर क्षेत्रात १७५६ वन्यप्राणी दिसले, दोन्ही मिळून ५ हजार ५०२ प्राणी नोंद घेण्यात आली अशी माहिती मुख्य वनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)