100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा सन्मानित (Chandrapur district ranks first in the state in the 100-day office reform campaign, District Collector Vinay Gowda honored by the Chief Minister)
चंद्रपूर :- राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. त्या अनुषंगाने आज (दि.7) मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले.
यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने बाजी मारली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात 84.29 गुण मिळवत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. कार्यालयीन सुधारणा मोहिमेत अद्ययावत संकेतस्थळ, केंद्र शासनासोबत सुसंवाद, कार्यालयीन स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, कामकाजातील सुधारणा, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी, सुकर जीवनमान, कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात आलेले नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) मार्फत मूल्यमापन करण्यात आले होते. या सर्व निकषांवर परिपूर्ण उतरून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात सर्वोत्कृष्ठ ठरले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या