वृत्तसेवा :- बोधिसत्व, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तुमच्या कट्टर जातीवादी पूर्वजांनी अगदी शेवटपर्यंत छळले, खर तर आम्ही याचा बदला आजही घेतला पाहिजे पण बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिला आणि आम्ही बुद्धाच्या मोठ्या करुणेने तुम्हाला माफ केले.
"आंबेडकर धर्मांतरासाठी नागपूरला जाऊ शकतात मग तारखेला कोर्टात हजर का राहू शकत नाहीत?" डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढी दुःख, अडचणी त्यांच्या वाट्याला आल्या तेवढ्या अन्य कोणत्याही महापुरूषाच्या आयुष्यात आलेल्या नाहीत. त्यांचे संपूर्ण आयुष्यच दुःख, संघर्ष, उच्चवर्णीयांकडून होणारे अवमान, छळ सहन करण्यात गेले. असाच अडचणीत टाकणारा, त्यांचा छळ करणारा एक कठीण प्रसंग आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या वाट्याला आला. बाबासाहेबानी १९५६ च्या सुरवातीला राजगृहाचा विस्तार करण्यासाठी "मावानी" नावाच्या एका ठेकेदाराकडून कोटेशन घेऊन त्याला काम दिले. त्याप्रमाणे त्या ठेकेदाराने काम पूर्ण करून पैशाचा तगादा लावला. वास्तविक पाहाता त्याने जेवढे कोटेशन दिले होते, तेवढेच बाबासाहेबांचे बजेट होते. परंतु काम पूर्ण झाल्यावर त्याने ४० हजार रूपये वाढवून मागितले. त्यामुळे ही वाढलेली रकम देण्यावरून वाद झाला आणि मुळात बाबासाहेबांजवळ त्यावेळी तेवढे पैसे ही नव्हते. त्यामुळे तो ठेकेदार कोर्टात गेला. कोर्टाने बाबासाहेबांना नोटीस पाठवली. बाबासाहेबांचे वास्तव्य त्यावेळी दिल्लीला होते. हा प्रसंग धर्मांतरानंतरचा आहे. बाबासाहेब काठमांडू येथील जागतिक बौद्धधम्म परिषदेला जाण्यापूर्वी कांही दिवस अगोदर घडलेला. बाबासाहेबानी त्यांच्या ओळखीच्या काळे नावाच्या वकीलाना फोन करून कोर्टकेस चालविण्यास सांगितले. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे आपण प्रवास करू शकत नाही व त्यामुळे मी मुंबई येथील कोर्टात हजर राहू शकत नाही असा अर्ज देण्यास काळे वकिलाना सांगितले. त्याप्रमाणे काळे वकिलानी सर्व सोपस्कार करून ते कोर्टात हजर राहिले. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या न्यायमूर्तीकडे ही केस होती ते महाशय कट्टर हिंदुत्ववादी तसेच आंबेडकरविरोधी होते. त्यानी दोन आठवड्याच्या आत ४० हजार रूपये भरण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर त्यानी असा ही शेरा मारला की, "आंबेडकर धर्मांतरासाठी नागपूरला जाऊ शकतात मग तारखेला कोर्टात हजर का राहू शकत नाहीत?". डाॅ. बाबासाहेब आंबेडकराना या देशात कोणकोणत्या प्रसंगाना तोंड द्यावे लागले व प्रतिगामी शक्तीनी त्याना अखेरपर्यंत कसे छळले याचे हे एक उदाहरण.
काळे वकिलांनी कोर्टाचा आदेश बाबासाहेबाना तारेने कळविला. आता अडचण पैशाची होती. बाबासाहेबांच्या मदतीने सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नौकरीला लागलेले पुरणचंद नावाचे एक इंजिनियर होते. बाबासाहेबानी त्याना बोलावून घेतले व त्यांच्याकडे ४० हजार रूपयाची मागणी केली. दुसऱ्या दिवशी पुरणचंद यानी त्यांच्या मुलीच्या हस्ते वीस हजार पाठवून दिले. नंतर बाबासाहेबानी मुंबईला पीईएसचे रजिस्ट्रार कमलाकांत चित्रे याना फोन करून पैशाची अडचण सांगितली. चित्रे यानी राजगृहाचा कांही भाग काॅलेजच्या वापरासाठी देण्याच्या अटीवर उर्वरित वीस हजार PES कडे असलेल्या शिल्लक रकमेतून देण्याचे कबूल केले. दुसऱ्या दिवशी रोख रक्कम वीस हजार सोबत घेऊन माईसाहेब एकट्याच विमानाने मुंबईला गेल्या. प्रकृती अस्वास्थामुळे व विमानाच्या तिकीटासाठी पैसे नसल्यामुळे बाबासाहेब त्यांच्या सोबत मुंबईला गेले नाही. माईसाहेबानी चित्रे यांची भेट घेतली. चित्रे यानी माईसाहेबांना वीस हजार रु. दिले. लगेच माईनी ही रक्कम कोर्टात जमा केली व त्या लगेच विमानाने दिल्लीला परत आल्या. कारण तेथे बाबासाहेब एकटेच होते व ते माईची वाट पहात होते. बाबासाहेब जरी PES चे संस्थापक व अध्यक्ष असले तरी संस्थेकडे असलेल्या रक्कमेतून त्यानी कधीही स्वखर्चासाठी एक रुपया देखील वापरला नाही.
संदर्भ : डाॅ.आंबेडकरांच्या सहवासात.
लेखिका : डाॅ.सविता आंबेडकर.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या