परभणीच्या आंदोलकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना (Shocking incident of death of Parbhani protester in judicial custody
वृत्तसेवा :- तब्बल पाच दिवस अस्वस्थ परभणी कालपासून पूर्वपदावर येत असल्याने मी आजपासून नेमकं काय झालं ? कसं झालं ? का झालं ? याचे परिणाम काय होतील ? ह्या प्रश्नांचा उलगडा करण्याचा मी तटस्थ प्रयत्न करणार होतो. पण सकाळीच आंदोलक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची बातमी धडकली अन् नवीनच ज्वलंत प्रश्नांची मालिका डोक्यात घिरट्या घालत आहे... सोमनाथ हे LL.B. च्या तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी. उद्यापासून त्यांची परीक्षा होती अन् ते जेलमध्ये ! त्यांनी परीक्षेसाठी जामीनची विनंती करूनही ती नाकारण्यात आली हे येथे उल्लेखनीय. एका कायद्याच्या विद्यार्थ्याला कायदा हाती घेतल्याने काय परिणाम भोगावे लागतात हे त्यांना समजत नसेल का ? हा पहिला प्रश्न. सोमनाथ हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता असल्याने समस्त कायद्याची जननी असलेल्या संविधान विटंबनेच्या निषेध आंदोलनात ते उतरले हा त्यांचा गुन्हा आहे का ? हा दुसरा प्रश्न. खूनासारख्या गुन्ह्यात जेल भोगत असलेल्या इसमालाही परीक्षेसाठी सोडलं जातं. सोमनाथ सूर्यवंशी यांना का सोडलं नाही ? (विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी LL.B. ची परीक्षा देण्यासाठी अमरदीप रोडे खून प्रकरणात एका विद्यार्थ्याला परभणीतच सोडले होते...) हा तिसरा प्रश्न ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे सरकार आणि स्थानिक प्रशासनाला द्यावी लागतील नव्हे दिलीच पाहिजे. आणि ती उत्तरे मिळणार नसतील तर आंबेडकरी समाजाला कायदा शिकवणा-या सरकारलाच आंबेडकरी जनतेसाठी कायद्याचे राज्य मान्य नाही हे त्यांना वाटणं अगदीच स्वाभाविक आहे...संविधानाच्या सन्मानार्थ शहिद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण अभिवादन ! अखेरचा जय भीम !!
संकलन :- भीमप्रकाश गायकवाड, 'मूकनायक', रविराज पार्क, परभणी
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 94217170688
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या