तब्बल ४१ वर्षानंतर झाल्या भेटी गाठी स्नेहमिलन सोहळ्यात भारावले गुरूजन-विद्यार्थी (The Gurujan-students were overwhelmed at the meeting after 41 years)
आरमोरी :- दोन वर्षापूर्वी एस.एस.सी. १९८३ हा वॉट्सअप ग्रुप तयार झाला. संवादाची देवाण-घेवाण होत असतांना १९८३ च्या एस.एस.सी. च्या विद्यार्थ्यांनी दोन दिवसीय स्नेहमिलन सोहळा घेतला. या कार्यक्रमात त्या काळी शिकलेल्या विद्यार्थ्यांनी गुरूजनांचा औक्षवन करून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि याच बॅचचे विद्यार्थी प्रा. डॉ. विजय सोरते लिखित 'मी एक अंधारटिंब' कवितासंग्रह भेट देऊन सत्कार केला. हे सर्व महात्मा गांधी विद्यालय आरमोरी येथील विद्यार्थी आहेत. या सोहळ्यात यशवंतराव सोरते, ताराचंद नागदेवे, पांडूरंग सोनकर, ए. एच. खान, पांडूरंगजी ठाकरे, मधुकरराव भोयर, वसंतराव खोब्रागडे आणि सुरेश कुंभारे या सत्कारमूर्तीनी भावविवश होऊन सत्कार स्विकारला. प्रारंभी दिवंगत शिक्षक आणि दिवंगत विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गुरूजनांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि दिप प्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. गुरूजन भावना व्यक्त करतांना म्हणाले, "आमच्या शिक्षकी पेशाची ही पावती असून हा क्षण आयुष्यभर विसरणार नाही. विद्यार्थी घडावा, त्याचे जीवन सुगंधमय व्हावे म्हणून आम्ही शिक्षा केली, तुम्ही मोठमोठ्या पदावर आहात, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहात आमची स्वप्नपूर्ती झाली, आमचे जीवन धन्य झाले, आजची पिढी बघता असे उपक्रम समाजात राबविल्या जावेत." हे ऐकत असतांना साऱ्यांचेच डोळे पाणावले. अविनाश खेवले, योगेश कापकर, प्रकाश गजभिये, रवि इंदूरकर यांनी मनोगत व्यक्त करतांना जुन्या शालेय आठवणींवर उजाळा दिला. सुमारे १५० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयसिंग गहेरवार, देवराव जवंजालकर, रवि इंदूरकर, अलाद्दीन माखानी, मेघराज दहिकर, विजय सोरते व अविनाश खेवले यांनी अथक परिश्रम घेतले व इतर विद्यार्थ्यांनी सुध्दा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान दिले हे एक टिमवर्क होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि गुरूजनांच्या आयुष्याचा प्रवास डॉ. विजय सोरते यांनी उलगडून दाखविला. प्रास्ताविक अविनाश खेवले यांनी केले तर आभार रजनी धकाते हिने मानले. या कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचा परिचय मेळावा, आर्केस्ट्रा आणि दुसऱ्या दिवशी शाळेला भेट देऊन जुन्या बाकावर बसण्याचा आनंद लुटला. याही प्रसंगी विद्यार्थी भावविवश होत म्हणाले, "बिते हुए दिन कभी नही आएंगे।"
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या