चंद्रपूर :- जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे महेश कोंडावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण उमप, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक, शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता अन्न व औषध प्रशासन विभागाने घेऊन, वेळोवेळी बंद व सुरू असलेल्या कारखान्यांना भेट द्यावी. मेडिकल स्टोअर्समध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत का? याबाबत तपासणी करावी. कृषी तसेच वनविभागाने खसखस किंवा गांजा पिकाची लागवड होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. खाजगी कुरियर, टपाल तसेच बसेसमध्ये येणाऱ्या पार्सलमध्ये अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्यास तपासणी करावी, याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी. पोलीस विभागाला अंमली पदार्थ आढळून आल्यास तो पदार्थ अंमली आहे किंवा कसे ? याबाबत नार्कोटिक्स डिटेक्शन किटद्वारे प्राथमिक चाचणी करून घ्यावी. गावातील सरपंच व पोलीस पाटलांना शेतकऱ्यांमार्फत अंमली पदार्थांची लागवड होत आहे का याबाबत तपासणी करण्याच्या सूचना द्याव्यात. असे निर्देश संबधित यंत्रणाना बैठकीत दिले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या