चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नोकरी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सदर परीक्षा विदर्भातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये न घेता पुणे, नाशिक या दूरच्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे. यामुळे उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या भरती प्रक्रियेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप असून, सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या लिपिक 261 आणि शिपाई 97 अशा 358 पदांसाठी 31,156 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. मात्र, या परीक्षेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. एका उमेदवाराकडून 40 लाख रुपयांपर्यंत पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केला आहे. यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नोकरी भरतीची जाहिरात निघाली. त्यानुसार 21, 22 आणि 23 डिसेंबरला परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र ही परीक्षा चंद्रपूर, नागपूर किंवा विदर्भातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये न घेता पुणे, नाशिक अशा दूरच्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे. राज्यातील 31,156 उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, या परीक्षा प्रक्रियेबाबत अनेक उमेदवारांच्या मनात शंका आहेत. एका जागेचा 40 लाख रुपये असा दर असल्याच्या तक्रारी असून, सदर परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणी अधिवेशनात बोलताना त्यांनी केली आहे.
रद्द झालेल्या परीक्षेतील उमेदवारांना स्थानिक परीक्षा केंद्र द्या - आ. किशोर जोरगेवार आज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या उमेदवारांची परीक्षा होती. मात्र, पेपर देत असताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या. प्रश्नाचे उत्तर लिहिल्यानंतर ते सेव्ह करताच लिहिलेले उत्तर बदलत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यानंतर याची दखल घेत अर्धा तास पेपर झाल्यावर सदर पेपर रद्द करून परीक्षा दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली. मात्र, या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष असून, याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी वरिष्ठ अधिकारी आणि परीक्षा घेणाऱ्या दिल्ली येथील आयटीआय लिमिटेड कंपनीचे ओडीएस प्रविण सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून, आता पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा उमेदवारांच्या स्थानिक केंद्रावरच घेण्यात यावी. त्यांना पुन्हा बाहेर जिल्ह्यात केंद्र देऊन आर्थिक भुर्दंड लादू नये, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. सदर कंपनी व्यवस्थापनाने ही आता पुढील परीक्षा स्थानिक केंद्रावर घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे पुढील वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सोयीच्या केंद्रांवर ही परीक्षा घेतल्या जाणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या