परभणी : परभणी जिल्ह्यात सोमनाथ सूर्यवंशी या
तरुणाचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. मात्र, हे आरोप सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने फेटाळून लावले आहेत. तसंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली १० लाखांची मदतही त्यांनी नाकारली आहे. या घटनेत पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. यांच्याबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की "सोमनाथ सुर्यवंशी हे कायद्याचं शिक्षण घेत होते. त्यांना जाळपोळीच्या घटनेत अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना कोठडीत मारहाण झालेली नाही. त्यांना श्वसनाचा आजार होता असं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. मात्र, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून १० लाखांची मदत देण्यात येणार आहे", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. "मला दहा लाखांची गरज नाही" सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई काय म्हणाल्या? "मुख्यमंत्र्यांचं बोलणं मला मान्य नाही. माझ्या मुलाला मारहाण करून त्याचा जीव घेतला. यावर मला न्याय पाहिजे. मंत्र्यांच्या आश्वासनांवर माझा विश्वास नाहीय. मला १० लाख रुपये नको. ते १० लाख रुपये मंत्र्यांच्या खिशातच ठेवा. नाहीतर कोणत्या तरी पोलिसाला खाऊ घाला. नाश्ता करायला द्या. खाऊपिऊन मारायला ताकद येते. मला माझा मुलगा पाहिजे", असा खेद त्यांच्या आई वत्सला सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या, "माझ्या मुलाला कसलाच आजार नव्हता. तो एक नंबर होता. कसलं इंजेक्शन नाही की गोळी नाही. कसलेच उपचार त्याच्यावर सुरू नव्हते." नाहीतर मी इथेच जीव देईन "पोलीस अधिकाऱ्याला निलंबित न करता त्याला जन्मठेप द्या. १० ते १५ तारखेपर्यंत ज्यांनी माझ्या मुलाचा बळी घेतलाय त्या प्रत्येकाला जन्मठेप द्या. मला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर मी इथेच जीव देईन", असा आक्रमक पवित्राही त्यांनी घेतला. "गरिबांवर अन्याय झाला आहे. आम्ही इथून गरिबांची मुले शिक्षण शिकायचं की गुन्हेगार्चाय मार्गावर जावं हे फडणवीसांनी सांगावं. माझ्या भावाची हत्या केलीय, तर हा अन्याय पुढे असाच सुरू राहणार. त्यामुळे प्रत्येक गरीब घरातील मुलं गुन्हेगारच बनतील. फडणवीसांनी चुकीची बाजू न घेता आम्हाला न्याय द्यावा. फडणवीसांनी विचार केला पाहिजे की याजागी त्यांचं कुटुंब असतं तर त्यांनी असा निर्णय घेतला असता का?" अशी प्रतिक्रिया सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भावाने दिली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या