अन धम्मदीक्षेसाठी बुद्ध मुर्ती उपलब्ध झाली (A Buddha statue was made available for An Dhammadiksha)

Vidyanshnewslive
By -
0
अन धम्मदीक्षेसाठी बुद्ध मुर्ती उपलब्ध झाली (A Buddha statue was made available for An Dhammadiksha)

​​​​​​​
वृत्तसेवा :- लाखो समाजबांधवांसोबत बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली. या सोहळ्यामागं अनेक हात काम करत होते. बाबासाहेबांनी आदल्या रात्रीच दीक्षा समारंभात बुद्धमूर्ती आणायला सांगितल्यानं कार्यकर्त्यांवर कसा बाका प्रसंग ओढवला होता, त्याविषयीच्या आठवणी जागवताहेत आता ९७ वर्षांचे साक्षीदार के.एन.खरे. १४ ऑक्टोबर १९५६. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या ५ लाख अस्पृश्य समाजबांधवांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. ११ तारखेलाच बाबासाहेबांचं माईसाहेबांसमवेत नागपूरात आगमन झालं. बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याच्या तयारीची सर्व जबाबदारी बौद्ध जन सभेच्या नागपूर शाखेकडे होती. वामनराव गोडबोले हे या सभेचे प्रमुख होते. नागपुरात आल्या आल्या बाबासाहेबांनी या सोहळ्याच्या तयारीबाबत बैठका घेतल्या. श्याम हॉटेलची रूम  नंबर ११६ म्हणजे बाबासाहेबांची 'वॉर रूम'च जणू. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष होतं. धम्म दीक्षा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भिक्षूंनी परित्राण पाठाला सुरवात केली. श्याम हॉटेलच्या रूम नंबर ११६ च्या खिडकीतून बाबासाहेब बाहेर बघत होते. स्त्री, पुरुष, बालकांचे हजारोच्या संख्येतील जत्थे दीक्षाभूमीकडे जात होते. जवळच थांबलेल्या वामनराव गोडबोले यांना बाबासाहेब म्हणाले, 'बौद्ध धर्माच्या इतिहासात पहिल्यांदा एकाच वेळी लाखो लोकांचा समुदाय धम्मात प्रवेश घेत आहे. उद्या सोहळ्याच्या प्रमुख मंचावर तथागत गौतम बुद्धांची एक मोठी मूर्ती ठेवा. सोहळ्यासाठी आणलेली मूर्ती कुठंय?' एव्हाना रात्र झाली होती. आता बुद्ध मूर्ती कोठून आणायची, असा पेच गोडबोले यांना पडला. कारण मूर्तीची अशी कोणतीच व्यवस्था आम्ही केलेली नव्हती. त्यांनी बाबासाहेबांना तसं सांगितलं. बाबासाहेब त्यांना म्हणाले, 'गेल्या वर्षी तुम्ही नागपूरमध्ये बुद्धजयंतीला मूर्तीची हत्तीवरून मिरवणूक काढली होती, ती मूर्ती मंचावर असावी, असं मला वाटतं.’ गोडबोले बाबासाहेबांना म्हणाले, 'माफ करा, पण ती बुद्धमूर्ती नव्हती. ते एक मोठ्या आकाराचं कट आऊट होतं. ते सध्या स्टेजवर लावलं आहे.' 'अरे, पण तथागतांच्या मूर्तीशिवाय कसं होईल?' बाबासाहेब गोडबोलेंना म्हणाले. 'मला हे आधीच माहीत असतं तर मी माझ्या दिल्लीच्या घरून निघताना तिथली मूर्ती सोबत आणली असती. पण आता तर रात्र झालीय. दुकानं बंद झाली असतील आणि मला वाटत नाही की नागपूरात बुद्धांची मूर्ती मिळेल'. लाखो लोक दीक्षाभूमीवर जमले होते. उद्या सकाळी एका ऐतिहासिक सोहळ्याला सुरवात होणार होती. अखिल विश्वाला अहिंसा, प्रेम आणि करुणेचा संदेश देणारे महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्तीच अद्याप मंचावर नव्हती. घड्याळाचा काटा मध्यरात्रीकडे सरकत होता आणि इकडे बाबासाहेबांच्या मनातही चिंतेची काजळी रात्रीच्या वाढत्या काळोखासोबत अधिक गडद होत चालली होती. पण हार मानतील ते बाबासाहेब कसले? नागपूर शहरात त्यावेळी उपलब्ध असलेली सुरेख विशाल बुद्धमूर्ती मध्यरात्रीनंतर सोहळ्याच्या मुख्य मंचावर विराजमान झाली. बाबासाहेबांनी केलेला एक फोन, दिलेलं एक पत्र यामुळे हे शक्य झालं. ६८ वर्षांपूर्वीचा हा आठवणींचा पट उलगडला के. एन. उर्फ कृष्णराव नारायणराव खरे यांनी. धम्म दीक्षा सोहळ्याच्या आयोजनात जे हजारो कार्यकर्ते राबले. त्यापैकीच ते एक. जगाच्या इतिहासातील एकमेव रक्तविहिन क्रांती म्हणून ज्या क्षणांना गौरवलं जातं, त्या क्षणांचे साक्षीदार. आज के. एन. खरे यांचं वय आहे ९७ वर्षे. शरीर थकलंय. स्मृती अजूनही लख्ख आहेत. आठवणीतील एकेक फूल शब्दांच्या माळेत गुंफतो म्हटलं तर शब्द जरा अडखळतात. पण वयाच्या एकतीशीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जवळून बघणं, ऐकणं इतकंच नव्हेतर त्यांच्यासोबत राहून धम्मामध्ये प्रवेश घेणं हे सारे क्षण विसरण्यासारखे कसं असू शकतात. जे जे आठवतं ते ते सारं खरे काका उत्साहानं सांगतात. सगळा पट उलगडून दाखवताना ते आताच हा प्रसंग घडून गेलाय एवढे तल्लीन होऊन जातात. के. एन. खरे नागपुरातील वेस्ट हाय कोर्ट रोडवरील सुरेंद्र नगरमधे राहतात. ४५ वर्षांपूर्वी ते रेल्वे खात्यातून रिटायर झाले. आज धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर जमले आहेत. ६८ वर्षांपूर्वीच्या धम्म दीक्षा सोहळ्याची पूर्वसंध्या आणि तेव्हा या ऐतिहासिक सोहळ्याची लगबग... हे सारं चित्र आजही आपल्या डोळ्यासमोर असल्याचं खरे काका सांगतात.
           त्या ऐतिहासिक क्षणांच्या स्मरणरंजनात रमलेले के. एन. खरे १३ ऑक्टोबर १९५६ च्या मध्यरात्री बुद्धमूर्ती कशी उपलब्ध झाली ते सांगत होते. खरे काका सांगतात, 'धम्म दीक्षा सोहळ्याला मंचावर बुद्धमूर्ती तर हवीच होती. आता इतक्या रात्री मूर्ती कुठून आणायची हा विचार गोडबोले यांच्या मनाची धडधड वाढवीत होता. इतक्यात गोडबोले यांनाच एक मार्ग सापडला. नागपूरमध्ये सरकारी मध्यवर्ती संग्रहालय आहे. हे संग्रहालय 'अजब बंगला' म्हणून आजही ओळखलं जातं. तिथे भगवान बुद्धांची एक धातूची मूर्ती असल्याचं गोडबोलेंना आठवलं. पण इतक्या रात्री संग्रहालय उघडणार कोण आणि कसं. कारण संग्रहालय सुरक्षेच्या दृष्टीने रात्री उघडणं अवघडच होतं. त्यांनी ही गोष्ट बाबासाहेबांना सांगितली.’ बाबासाहेब म्हणाले, 'चिंता मिटली. ती मूर्ती आपल्याला मिळणार'. गोडबोले म्हणाले, 'पण आता इतक्या रात्री ते कसं होणार?'. बाबासाहेबांनी गोडबोलेंना सांगितलं, की 'धम्म दीक्षा सोहळ्यासाठी मी परवा नागपूरला येत असताना विमानप्रवासात मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला माझ्या सोबत होते. या सोहळ्याला शक्य ती सर्व मदत करण्याची ग्वाही त्यांनी मला दिली आहे. मी आताच मुख्यमंत्र्यांना फोन करतो.' महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी सीपी अँड बेरार राज्याची नागपूर ही राजधानी होती. 'सेन्ट्रल प्रॉव्हिन्स अँड बेरार' म्हणजेच मध्य प्रांत आणि वऱ्हाड असं ते राज्य होतं. शुक्ला हे तत्कालीन मुख्यमंत्री. डॉ. बाबासाहेबांनी लागलीच मुख्यमंत्र्यांना श्याम हॉटेलच्या आपल्या खोलीतून फोन केला. त्यांना सर्व हकीकत सांगितली. मुख्यमंत्री शुक्ला यांनी बाबासाहेबांना आश्वस्त करत 'तुम्ही तुमचं एक पत्र घेऊन कुणालातरी अजब बंगल्यावर पाठवा आणि हवी ती मूर्ती घेऊन जा. मी सर्व व्यवस्था करतो,' असं सांगितलं. बाबासाहेबांनी लिहिलेलं ते पत्र घेऊन मी रात्रीच अजब बंगला गाठला. त्याआधीच मुख्यमंत्री शुक्लांनी संग्रहालयाचे क्युरेटर एस. एस. पटवर्धन यांना फोन करून बुद्ध मूर्ती देण्याचे आदेश दिले होते. ती मूर्ती आणि त्या सोबत असलेल्या सिंहाच्या दोन मूर्ती घेऊन आम्ही गोडबोलेंचं ऑफिस गाठलं. हा सारा किस्सा सांगताना के. एन. खरे यांच्या चेहऱ्यावर तोच आनंद होता, जो ती मूर्ती मिळाल्यावर १३ ऑक्टोबर १९५६ च्या मध्यरात्री होता. पण केवळ इतक्यातच हा 'जॉब वेल डन' झालेला नव्हता. कारण बऱ्याच वर्षांपासून ती मूर्ती संग्रहालयात ठेवलेली होती. मूर्तीवर जराही झळाई नव्हती. आता इतक्या रात्री पॉलिश करण्यासाठी ब्रासो कुठून आणायचा, हा पेच निर्माण झाल्याचे खरे आजोबा सांगतात. पण त्यावरही मार्ग निघाला. जवळच #सीताबर्डी पोलीस स्टेशन होते. तिथले शिपाई आपले बिल्ले चमकविण्यासाठी ब्रासो वापरत असतात. तिथून आपण ते मिळवू अशी आयडिया कुणाला तरी सुचली. झालं. मग पोलीस स्टेशन गाठलं. पण फक्त एकदा मागणी करून, आणि ते ही इतक्या रात्री पोलीस यांना ब्रासो देणार हे सोपं नव्हतच. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुख्यमंत्री विजयशंकर शुक्ला यांचा संदर्भ देताच खरे यांना ब्रासो मिळालं आणि अखेर तथागतांच्या मूर्तीवर सोनेरी झळाई आली. सकाळ होण्यापूर्वीच ती मूर्ती धम्म दीक्षा सोहळ्याच्या मुख्य मंचावर विराजमान झाली. सकाळी हजारो लोकांचे थवे नागपूरातील रस्त्या रस्त्यांमधून 'भगवान बुद्ध की जय, डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय, बाबासाहेब करे पुकार, बुद्ध धर्म का करो स्वीकार' अशा घोषणा देत दीक्षा भूमीकडे निघाले होते. आठवणींचा पसारा आवरत खरे आजोबांनी आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला. झालं असं की तेव्हा अस्तित्वात असलेल्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे काही पदाधिकारी जाहीरपणे बौद्ध धम्माची दीक्षा घायला तयार नव्हते. त्यांना काळजी होती ती लगेच होणाऱ्या निवडणुकांची आणि मतांची. शिवाय बौद्ध धर्मात प्रवेश घेतल्यानं राखीव मतदारसंघ आणि इतर सवलतींवर पाणी सोडावं लागेल, ही भीतीदेखील त्यांना सतावत होती. पण बाबासाहेब आपल्या मतावर ठाम होते आणि राजकीय परिणामांची चिंता न करता धर्मांतर करावं, असा त्यांचा आग्रह होता. राखीव मतदार संघांमुळे अस्पृश्य जनतेचं नुकसान झालंय, असं ते म्हणाले. बहुसंख्य हिंदू मतदारांच्या मतांच्या आधारे निवडून आल्याची भावना असल्याने आपलेच प्रतिनिधी अस्पृश्यांसाठी अपेक्षित काम करीत नाहीत, असं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर धर्मांतरानंतर आपण शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे सदस्यत्व सोडणार असल्याचंही त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. पण या अडचणीवरही बाबसाहेबांनीच मार्ग शोधला. १४ ऑक्टोबरच्या धम्म दीक्षा सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी श्याम हॉटेलच्या रूम नंबर ११६ मध्ये बाबासाहेबानी फेडरेशनच्या नेत्यांना बैठकीला बोलवली. वामनराव गोडबोले आणि मला त्यांनी दोन रजिस्टर बुक तयार ठेवायला सांगितलं. त्यावर उपस्थित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे नाव लिहून त्यांची सही घेतली. त्या रजिस्टरमधे लिहिलं होतं की, 'मी आज रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहे'. तेव्हा कुठं फेडरेशनच्या नेत्यांची चिंता मिटली. या बैठकीला दादासाहेब गायकवाड, दादासाहेब रा. सु. गवई, शांताबाई दाणी, बॅरिस्टर खोब्रागडे, बी. सी. कांबळे आदी उपस्थित होते. के. एन. खरे एकेक आठवण अशी जुळवून भरभरून सांगतात. खरंतर, तो दिवस फक्त ऐतिहासिक नव्हता तर कोट्यवधी लोकांच्या जीवनात उगवलेली ती नव्या आयुष्याची पहाट होती. डॉ बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर या सूर्याने ती पहाट त्यांना दाखविली होती. त्याचे साक्षीदार प्रत्येक धम्मचक्र प्रवर्तनदिनाला ती पहाट नव्याने अनुभवत असतात.

संकलन :- संघपाल गौरखेडे

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)